मुंबई : भायखळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्या हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवार, १० जुलै रोजी विधान परिषदेत केली.
विरोधकांसह सत्ताधारी सदस्यांनीही पोलिस प्रशासनावर कठोर प्रश्न उपस्थित करत तपासाची दिशा आणि गंभीरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या चर्चेला उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, “सदर प्रकरणात आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली असून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात ही घटना आर्थिक वादातून घडल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, इतर सर्व शक्यताही तपासल्या जात आहेत. या प्रकरणातील उर्वरित आरोपींची नावे तपासात समोर आली असली तरी अद्याप अधिकृतपणे आरोपी म्हणून त्यांची नोंद करण्यात आलेली नाही. मात्र, कोणालाही वाचवले जाणार नाही.”
विरोधकांनी या प्रकरणातील सीडीआर तपासावर प्रश्न उपस्थित केले असता ते म्हणाले की, “सीडीआर रिपोर्ट तसेच सर्व तांत्रिक पुरावे लवकरात लवकर तपासले जातील. कोणतीही माहिती दडपली जाणार नाही आणि कोणत्याही स्तरावर हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत शासनाने विशेष तपास पथक (एआयटी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा तपास संपूर्ण पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने केला जाईल. दोषींना कोणतीही सूट न देता कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल," असेही मंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....