
मुंबई : राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी राबवली जाणारी "श्रीमंत राजे यशवंतराव होळकर विद्यार्थी विकास योजना" गैरव्यवहाराच्या विळख्यात सापडली आहे. विशेष म्हणजे, हा घोटाळा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या जिल्ह्यातच उघड झाला आहे. या प्रकरणाची मंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूल, आसेगाव यांना १०० विद्यार्थ्यांसाठी मान्यता देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष तपासणीत तेथे एकही विद्यार्थी आढळला नाही, वसतिगृहही अस्तित्वात नव्हते. संगणक बंद, खोल्या अव्यवस्थित आणि सर्व व्यवहार फक्त कागदावरच झाल्याचे उघड झाले. संस्थाचालकाने गेल्या वर्षी अनुदान मिळाल्याची कबुली दिली. त्याचप्रमाणे, गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सायंकाळी ७.३० वाजता केलेल्या भेटीतही विद्यार्थी किंवा वसतिगृह आढळले नाही. तरीही या शाळेने १०० विद्यार्थ्यांसाठी मंजुरी घेऊन सरकारी निधी उचललेला आहे. हा प्रकार केवळ अनुदान लाटण्यापुरता मर्यादित नसून, गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्काशी आणि भविष्याशी खेळणारा आहे.
कठोर कारवाई करणार
"धनगर समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी आम्ही ही योजना राबवत आहोत. मात्र, ज्या शाळा सुविधा पुरवत नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करू आणि त्यांची मान्यता रद्द करू. तसेच, वेळेवर आणि योग्य अहवाल न देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई होईल," असा इशारा मंत्री अतुल सावे यांनी दिला आहे.