मुंबई : मुबंईतील सर्वात जुन्या बाजारपेठेपैकी एक असलेल्या ‘क्रॉफर्ड मार्केट’च्या मासे विक्रेत्यांच्या स्थलांतराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबई महापालिकेने फेब्रुवारीत काढलेल्या परिपत्रकात मासे विक्रेत्यांना स्थलांतराच्या नोटीसा बजावल्या होत्या. महापालिकेच्या या परिपत्रकात मासे विक्रेत्यांकडून ही जागा पाच दशकांहून अधिक काळ व्यापली गेल्याचे म्हटले आहे.
मुंबईच्या ‘क्रॉफर्ड मार्केट’मधील ३५०हून अधिक मासे विक्रेत्यांनी सोमवारी महानगरपालिकेने त्यांना बजावलेल्या नोटिसावंर आक्षेप घेतला आहे. विक्रेत्यांनी सांगितले की, "महापालिकेने फेब्रुवारीत आणि आता दुसऱ्यांदा आम्हाला पाच दशकांहून अधिक काळ मासे विक्री करत असलेली जागा खाली करून नजीकच्या फूटपाथवर स्थलांतरित व्हा अश्या नोटीसा बजावल्या आहेत."
विक्रेत्यांनी ही कारवाई चुकीच्या पद्धतीची म्हणत, राज्य मच्छीमार समितीने ही कारवाई तात्काळ रद्द करावी अशी मागणी केली आहे. याबाबत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी बोलताना, "जर महापालिकेने विक्रेत्यांना स्थलांतराच्या नोटीसा पाठवणे थांबवले नाही तर कोळी समाज महापालिका मुख्यालयात आमरण आंदोलन करेल." असा इशारा त्यांनी मुंबई महापालिकेला दिला आहे.
क्रॉफर्ड मार्केटच्या या भागात दररोज सुमारे १५० ते २०० मासळी वाहतूक करणारी वाहने आणि हजारो विक्रेत्यांची ये-जा असते. महापालिकेच्या सुचनेनुसार विक्रेत्यांनी हा परीसर खाली करून महात्मा ज्योतिबा फुले मार्केटमध्ये स्थलांतर कराण्यास सांगितले आहे, परंतू विक्रेत्यांच्या म्हणाण्यानुसार, "महात्मा ज्योतिबा फुले मार्केटमध्ये स्थलांतर केल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन ग्राहकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल."
महापालिका सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू यांनी विक्रेत्यांचे आरोप फेटाळून लावत स्पष्ट केले की, "विक्रेत्यांना महात्मा ज्योतिबा फुले मार्केटमध्ये हलवले जात नाही तर क्रॉफर्ड मार्केट परिसरातील तात्पुरत्या ट्रान्झिट स्ट्रक्चरमध्ये हलवले जात आहे. त्यांना अखेर क्रॉफर्ड मार्केट विस्तार प्रकल्पांतर्गत कायमस्वरूपी इमारतीत हलवले जाईल." असे वळंजू म्हणाले.