‘सुविद्ये’चा सारथी

    13-May-2024   
Total Views |
Mahadev Govind Ranade

महादेव गोविंद रानडे... अतिशय कर्तृत्ववान आणि ध्येयशील व्यक्तिमत्व. ‘सुविद्या प्रसारक संघ’ आणि महादेव गोविंद रानडे यांची एकमेकांशिवाय ओळख अपूर्णच. त्यांच्या कार्यविचारांचा घेतलेला मागोवा...
 
असु आम्ही सुखाने पत्थर पायातील
मंदिर उभविणे हेच आमुचे शील।
 
भगवंतासाठीचे मंदिर असू दे की, समाजाच्या सज्जन उत्कर्षासाठीचा कोणताही आयाम असू दे, तो उभारण्यासाठी आयुष्य झिजविणे हे ध्येय घेऊन समाजात कार्य करणे, हे महत्त्वाचे आणि कठीण काम. ते कठीण कार्य करणार्‍यांमधले एक नाव म्हणजे महादेव गोविंद रानडे.‘आयुष्याचे एक लक्ष्य ठरवून त्यासाठी काम करणारे युवक हवेत,’ या स्वामी विवेकानंदांच्या वचनानुसार महादेव यांनी समाजाचा शैक्षणिक विकास करून सर्वांगीण शिक्षित, सुसंस्कारित पिढी घडवावी, हे ध्येय निश्चित केले. आज महादेव गोविंद रानडे ‘सुविद्या प्रसारक संघा’चे अध्यक्ष आहेत. या शैक्षणिक संस्थेच्या अंतर्गत बोरिवलीमधील वझीरा परिसरात एक शाळा, गोराई येथे दोन शाळा, मागाठाणे येथे एक शाळा आणि बोरिवलीमधील एक्सर येथे महाराष्ट्रातील सर्वोत्तम ’पर्यावरण आणि स्थापत्यशास्त्र महाविद्यालय’ आहे. येथे शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच त्यांच्यातील खेळाडूंना संधी मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.

उदाहरणार्थ, आधुनिक तंत्रज्ञान शिकण्यासाठी ‘स्टेम लॅब’ ते मल्लखांबापासून मातीतील विविध खेळांचा सराव ते क्रिकेट, फुटबॉलसाठी विशेष नियोजन हे सारे काही या शाळांमध्ये आहे.या सगळ्यासाठी महादेव यांची भूमिका महत्त्वाची आहे. कारण, एखादी संस्था म्हणजे जीता-जागता संस्थामानवच असतो. माणसाच्या जीविताची, संवर्धनाची, विकासाची जशी काळजी घ्यावी लागते, तशीच काळजी संस्थेचीही घ्यावी लागते. ‘सुविद्या प्रसारक संघा’साठी तशी काळजी महादेव यांनी घेतली. गेली ५३ वर्षे संस्था सुरू आहे. मात्र, प्रशासन किंवा नागरिक यांपैकी सर्वांनीच संस्थेच्या निष्कलंक आणि नि:स्वार्थी कार्याची पोचपावती दिली आहे. हे कसे शक्य आहे, तर महादेव यांची कौटुंबिक, सामाजिक पार्श्वभूमी पाहू.

रानडे कुटुंब मूळचे चिपळूणचे. पण, मुंबईत स्थायिक झाले. गोविंद रानडे आणि निर्मला रानडे यांना तीन अपत्ये. त्यापैकी एक महादेव. गोविंद हे कर्तृत्त्ववान ध्येयवादी पुरुष. त्यांनी बोरिवली परिसरातील नागरिकांसाठी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून १९७१ साली ‘सुविद्या प्रसारक संघ’ ही शैक्षणिक संस्था उभी केली. गोविंद हे सुरुवातीच्या काळात गिरगाव भागात संघाचे भाग कार्यवाह होते आणि त्यानंतरही संघ स्वयंसेवकांचा त्यांच्याशी कायम संपर्क होता. त्यामुळे रानडेंच्या घरी सज्जनशक्तीचा राबता होता.

देश हमें देता हैं सब कुछ,
हम भी तो कुछ देना सीखें
 
हे बाळकडू महादेव यांना घरातूनच मिळाले. पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर महादेव हे बँकेत नोकरीला लागले आणि पुढे बँकिंग संदर्भातले व्यावसायिक शिक्षणही त्यांनी पूर्ण केले. या काळातही त्यांना समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा होतीच. पुढे त्यासाठी त्यांनी बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. ‘सुविद्या प्रसारक संघा’त सदस्य म्हणून लक्ष देऊ लागले. संस्थेचा ताळेबंद कसा समाधानकारक राहील, यासाठी त्यांनी काम केले. त्यामुळेच संस्था पुढे भरभराटीला आली, असे आपण म्हणू शकतो. या सर्वच काळात त्यांच्या पत्नीने म्हणजेच माधवी यांनी त्यांना मोलाची साथ दिली. असो.संघ विचारांनी प्रेरित असलेल्या महादेव यांनी गोळवलकर गुरुजींचे सगळे साहित्य वाचले. त्यातील ‘मैं नहीं, तू ही’ हा विचार महादेव यांच्या आयुष्याचे सूत्र झाला. याच विचाराने ते भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधत गेले, ऋणानुबंध जोडत गेले. त्यामुळे महादेव यांच्या आयुष्यात आणि त्यांच्या संस्थात्मक आयुष्यातही नेहमीच सुसंवाद निर्माण होत गेला.

ते ‘नलिनीताई चित्रे महिला विद्या प्रसारक ट्रस्ट, नाशिक’ आणि ‘प्रज्ञा वर्धिनी फाऊंडेशन, मुंबई’चे विश्वस्त आहेत. या दोन्ही संस्थांचे मार्गदर्शक म्हणून महादेव काम करतात. ‘नलिनीताई चित्रे महिला विद्या प्रसारक ट्रस्ट’च्या ‘उडान फाऊंडेशन’अंतर्गत त्र्यंबकेश्वर येथे मुलींसाठी आर्मी बूट कॅम्पचे आयोजन होते. सैन्यभरतीच्या परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या मुलींसाठी येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. ‘प्रज्ञा वर्धिनी फाऊंडेशन’द्वारे युवकांनी खेळांमध्ये प्राविण्य मिळावावे यासाठी प्रशिक्षण देण्यात येते. शिक्षण आणि खेळ या माध्यमातून समाजाचा विकास साधू इच्छिणारे महादेव हे उत्तम लेखकही आहेत. आजपर्यंत त्यांची २८ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
 
महादेव सध्या महाराष्ट्रभरातल्या १०८ ध्येयशील संस्था आणि व्यक्ती यांना लिहितं करून त्यांचे प्रेरणादायी कार्य समाजासमोर यावे, यासाठी ’देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती’ ही लेखमाला संपादित आणि प्रकाशित करीत आहेत. या माध्यमातून समाजासाठी, देशासाठी कार्य करणार्‍या सामाजिक संस्था आणि व्यक्तींचे एकत्रीकरण करण्याचा त्यांचा मानस आहे. आयुष्याचा प्रत्येक क्षण स्वतःसोबतच समाजाच्या उत्कर्षासाठी वापरावा, हेच महादेव रानडे यांचे ध्येय. महादेव म्हणतात की, “यापुढील आयुष्यातही ‘मैं नहीं, तू ही’ म्हणत, समाजातील सज्जनशक्तींना एकत्र करीत त्याद्वारे देशसेवा करायची आहे.” ‘सुविद्ये’चा सारथी असलेले महादेव गोविंद रानडे हे समाजाचे आदर्श आहेत.
 
 
(अधिक माहितीसाठी - महादेव रानडे यांचा संपर्क क्रमांक : ९८२०४९६१८१)



योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.