केजरीवाल यांच्या पीएकडून 'स्वाती मालीवाल' यांना मारहाण; पोलिस मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी दाखल

    13-May-2024
Total Views |
 swati maliwal
 
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभव कुमार यांच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. ही घटना अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानी घडल्याचे सांगण्यात येत आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आपच्या राज्यसभा खासदार सोमवार, दि. १३ मे २०२४ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. येथे त्यांना केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभव कुमार यांनी मारहाण केली. त्यांच्यावर हल्ला केला. यानंतर मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना पाचारण केले.
 
मारहाणीच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांचे एक पथक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. स्वाती मालीवाल मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून निघून पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्याचे सांगण्यात आले. सोमवारी सकाळी १० वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात मारहाणीची ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.
 
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सांगण्यावरून विभव कुमारने आपल्यावर हल्ला केल्याचे स्वाती मालीवाल यांनी पोलिसांना केलेल्या फोन कॉलमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी दोन वेळा फोन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पोलीस आल्यावर स्वाती मालीवाल घटनास्थळी दिसल्या नाहीत, असेही सांगण्यात आले. त्या दिल्लीतील सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्या होत्या.
 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांचे स्वीय सचिव विभव कुमार आणि स्वाती मालीवाल यांनी अद्याप या प्रकरणी अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. दिल्ली पोलिसांनीही याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. उत्तर दिल्लीचे डीसीपीही सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात पोहोचले आहेत.