मुंबई : “भारत केवळ एक देश नसून एक महान संस्कृती आहे. भारताने जगाला दिलेले ज्ञान, मूल्ये व वारसा आजही प्रेरणा देत आहेत,” अशा शब्दांत पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेना पॅलाशियास यांनी भारताबद्दलची आपुलकी व्यक्त केली. तब्बल १३ वर्षांनंतर झालेल्या त्यांच्या अधिकृत भारत दौऱ्यादरम्यान मुंबईतील भेट, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना नवसंजीवनी देणारी ठरली आहे. भारतासोबतचा संबंध हा अधिक अर्थपूर्ण असल्याची भावना त्यांनी स्पष्टपणे व्यक्त केली.
इंडियन मर्चंट्स चेंबर सभागृहात झालेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आयएमसीचे अध्यक्ष संजय मारीवाला, पॅराग्वेचे शिष्टमंडळ आणि विविध उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राष्ट्राध्यक्ष पेना म्हणाले, भारत आणि पॅराग्वे या दोन देशांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण, शिक्षण, कृषी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या व्यापक संधी आहेत. त्यांनी पॅराग्वे सरकार आणि उद्योग मंत्रालय यांच्यातील सहकार्याच्या धोरणांचा उल्लेख करत, उद्योग मंत्रालय आणि वाणिज्य मंडळ यांच्यात सामंजस्य करार झाल्याची माहिती दिली. “हा करार व्यक्ती आणि संस्था यांच्यामध्ये एक महत्त्वाचा सेतू म्हणून कार्य करेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.