नवी दिल्ली: साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्यांना बेकायदेशीर बेटिंग अॅप्सना प्रोत्साहन देणे चांगलेच महाग पडले आहे. या बाबत ईडीने विजय देवरकोंडा, राणा दग्गुबती, प्रकाश राज यांच्यासह २९ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. सार्वजनिक जुगार कायदा, १८६७ चे उल्लंघन करून बेकायदेशीर बेटिंग अॅप्सना प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत, विशाखापट्टणम, मियापूर, सूर्यपेट, पंजगुट्टा आणि सायबराबाद येथे अभिनेत्यांसह २९ व्यक्तींविरुद्ध पाच वेगवेगळ्या एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. गुन्हे दाखल करण्यात आलेले सर्वजण हे जंगली रमी, ए२३, जीटविन, परिमॅच, लोटस३६५ या बेकायदेशीर बेटिंग अॅप्सना प्रोत्साहन देणारे प्रमुख घटक असल्याचे ईडीने आपल्या जवाबात म्हटले आहे. या सर्व बेकायदेशीर बेटिंग अॅप्समधून मोठ्या प्रमणात मनी लाँडरिंग होत असल्याचा दाट संशय ईडीने व्यक्त केला आहे.
या सर्व अभिनेत्यांवर ईडीची कारवाई
विजय देवरकोंडा,प्रकाश राज, मंचू लक्ष्मी, राणा दग्गुबती, प्रणीता, निधी अग्रवाल या साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्यांसह टीव्ही इंडस्ट्रीतील श्रीमुखी, वर्षानी सौंदरराजन, सिरी हनुमंथू, अनन्या नागेला,नयनी पवानी, नेहा पठाण, शोबा शेट्टी, अमृता चौधरी, वासंती कृष्णन, श्यामला, पांडू, पद्मावती, इम्रान खान आणि विष्णू प्रिया तर निर्माते बय्या सनी यादव, चवतेजा, हर्षा साई, रिथू चौधरी, बंडारू शेषानी सुप्रीता, अजय, सनी, सुधीर आणि यूट्यूब चॅनल लोकल बॉय नानी चा मालक किरण गौड या सर्वांवर ईडीने केली आहे. या प्रकरणात नाव असलेल्या व्यक्तींना लवकरच चौकशीसाठी बोलावले जाईल असे ईडीने जाहीर केले आहे.
ईडीच्या दाव्यानुसार, आतापर्यंत या सर्व बेकायदेशीर बेटिंग अॅप्समधून 3 कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याच्या तक्ररी ईडीला प्राप्त झाल्या आहेत.