मुंबई : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या सूचनेनुसार राज्यात ऑपरेशन कालनेमी अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे. साधू-संतांचा वेश परिधान करून लोकांना फसवणाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई होत आहे. देहराडून पोलिसांनी २५ बनावट साधूबाबांना अटक केली असून यात एका बांगलादेशी नागरिकाचाही समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे.
सनातन धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या आणि सामाजिक सौहार्द बिघडवणाऱ्या असामाजिक घटकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिले होते. याअंतर्गत, एसएसपी अजय सिंह यांनी सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारींना त्यांच्या संबंधित भागातील अशा लोकांना ओळखण्याचे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.
एसएसपी अजय सिंह यांनी स्वतः नेहरू कॉलनी परिसरातील साधू आणि संतांच्या वेशात रस्त्याच्या कडेला बसलेल्या लोकांची चौकशी केली. यादरम्यान, संबंधित व्यक्तींना कोणतेही समाधानकारक उत्तर किंवा कागदपत्रे देता आली नाहीत. यानंतर, एसएसपींनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. याच कारवाईदरम्यान, पोलिसांनी साधूच्या वेशात उत्तराखंडच्या सहसपूर परिसरात फिरत असलेल्या बांगलादेशी नागरिक रुकन राकम उर्फ शाह आलम यालाही अटक केली. त्याच्याविरुद्ध सहसपूर पोलिस ठाण्यात परदेशी नागरिक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी म्हणाले की, ऑपरेशन कालनेमी सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. सनातनविरोधी लोक धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. सनातनच्या संरक्षणासाठी सरकारचा हा निर्णय अतिशय स्तुत्य आहे.