मुंबई : राहुल गांधी हे फेक न्यूजचे बादशाह असून ते खोट्या, फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच आहे हे आता वारंवार सिध्द होते आहे, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवार, १२ ऑगस्ट रोजी केली.
केशव उपाध्ये म्हणाले की, "वर्षानुवर्षे निवडणुका हरल्यानंतर फेक नॅरेटीव्हचा आधार घेत थयथयाट करायचा आणि त्यालाच सत्य मानत जनतेच्या माथी मारायचे हीच गांधी घराण्याची स्वतःला सर्वांपेक्षा वेगळे आणि श्रेष्ठ समजणारी हुकूमशाही मानसिकता आहे. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील."
"याआधी महाराष्ट्रात कधी ७० लाख तर कधी १ कोटी मतदान झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला. या कथित मतचोरीचे आरोप मुंबई उच्च न्यायालयाने कडक शब्दांत फेटाळून लावले. भारतीय लष्कराबद्दलच्या विधानावर सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना खडेबोल सुनावण्यात आले. राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात माफी मागावी लागली. सावरकर, हिंडेनबर्ग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर नुसतेच आरोप करून त्यांना न्यायालयात काहीच सिध्द करता आले नाही," असे म्हणत केशव उपाध्ये यांनी राहुल गांधी यांच्या फेक नॅरेटिव्हचा पाढाच वाचला.
राहुल गांधींच्या फेक न्यूजचे टप्पे
"हिमाचल, तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकली की, सर्व उत्तम, पण पराभव झाला की, काही तरी सबब शोधायची. त्यांची रितसर तक्रार करायची नाही. न्यायालयात टिकणारे कसलेही पुरावे द्यायचे नाही. मग फेक न्यूज. म्हणूनच, राहुल गांधी फेक न्यूजचे बादशहाच असून त्यांना सतत मुजरे करणारे काँग्रेसी हुजरे आहेत," अशी टीकाही केशव उपाध्ये यांनी केली आहे.