नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने पाकिस्तानच्या नुकसानाचे पुरावे दिले आहेत, तसेच पुरावे भारताच्या झालेल्या नुकसानाचे परदेशी प्रसारमाध्यमांनी द्यावे. परदेशी प्रसारमाध्यमांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे खोटे वार्तांकन केले आहे, अशा शब्दात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी शुक्रवारी परदेशी माध्यमांना फटकारले आहे.
आयआयटी मद्रासच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात बोलताना अजित डोवाल यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी भारताच्या बाबतीत वार्तांकन परदेशी माध्यमांच्या पक्षपातीपणावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, परदेशी माध्यमांनी पाकिस्तानने अमुक केले आणि तमुक केले असे दावे केले आहेत. परंतु त्याचे पुरावे देणे त्यांना शक्य झालेले नाही. त्याचवेळी भारताने मात्र सरगोधा, रहिमयार खान आणि चकलालासहित पाकच्या १३ हवाईतळांना उध्वस्त केल्याची छायाचित्रे आणि अन्य पुरावे सादर केले आहेत. त्याचवेळी भारताचेही नुकसान झाल्याचा दावा करणाऱ्या परदेशी माध्यमांनी एकही छायाचित्र अथवा पुरावा दिला नसल्याचे एनएसए डोवाल यांनी स्पष्ट केले.
‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल पुढे बोलताना एनएसए अजित डोवाल यांनी संघर्षादरम्यान भारतीय स्वदेशी संरक्षण क्षमतांनी कशी निर्णायक भूमिका बजावली यावर प्रकाश टाकला आणि अधिक स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज असल्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले, आपल्याला आपले स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय संरक्षण प्रणालींचा वापर केला आहे. ब्रह्मोस, एकात्मिक हवाई नियंत्रण कमांड यंत्रणा, रडार यंत्रणेने अवघ्या २३ मिनिटात पाकला दणका दिल्याचेही डोवाल यांनी अधोरेखित केले.
‘एआय’ जग बदलणार
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ गेमचेंजर असून भारतालाही या क्षेत्रास केंद्रबिंदू बनविण्याची गरज आहे. ‘एआय’मुळे जवळपास दरवर्षी जग बदलत आहे. ‘एआय’चा वापर हा वैशिष्ट्यपूर्म आहे. केवळ संशोधन आणि विकासासाठीच नाही तर मशीन लर्निंग, एलएलएम, संरक्षण, रोबोटिक्स, औषध, वित्त आणि सर्व गोष्टींसाठी देखील आवश्यक असेल, असेही एनएसए डोवाल यांनी आपल्या भाषणात नमूद केले आहे.