मुंबई : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण प्रदेश हादरून गेला आहे. हल्लेखोरांनी प्रवासी बस थांबवत प्रवाशांना बाहेर काढले आणि नऊ निष्पाप प्रवाशांना गोळ्या घालून त्यांची हत्या केल्याचे वृत्त समोर येत आहे. प्रशासनाच्या मते हा दहशतवादी हल्ला असल्याचा दावा करण्यात आलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, क्वेट्टाहून लाहोरला जाणारी बस हल्लेखोरांनी थांबवली. त्यानंतर प्रवाशांना जबरदस्तीने बसमधून खाली उतरवण्यात आले, त्यांची ओळख पटवण्यात आली. प्रत्यक्षदर्शींचे असे म्हणणे आहे की, हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेत ९ जणांना गोळ्या घालून त्यांची हत्या केली. सर्व मृतदेह बरखान जिल्ह्यातील रेखानी रुग्णालयात नेण्यात आले.
सध्या सुरक्षा दलांकडून परिसरात शोध मोहीम सुरू आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही, परंतु अधिकाऱ्यांचा असा दावा आहे की हा दहशतवादी संघटनांचा कट आहे. या हल्ल्यामागे परदेशी शक्तींचा हात असल्याचाही आरोप केला जातोय. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, हल्लेखोरांनी रात्रीच्या अंधारात अनेक कम्युनिकेशन टॉवर्स, पोलिस स्टेशन, बँका आणि चेकपोस्टनाही लक्ष्य केले होते.