रबात (मोरोक्को) : (Muslim Country Morocco Bans Animal Sacrifice on Bakrid) आफ्रिकेतील इस्लामिक देश असलेल्या मोरोक्कोमध्ये बकरी ईदच्या दिवशी प्राण्यांच्या कुर्बानी देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुस्लिम बहुल राष्ट्र असलेल्या मोरोक्कोचा राजा मोहम्मद सहावा यांनी हा निर्णय घेतला आहे. इस्लाममध्ये बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्याला खूप महत्त्व देण्यात आले आहे. मोरोक्कोच्या लोकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. त्यामुळे आता या निर्णयाची जगभरात चर्चा होत आहे. मोरोक्कोतील पशु बाजार बंद करण्यात आले असून राजाने बकरीसह कोणत्याही प्राण्याची कुर्बानी न देण्याचा आदेश दिला आहे.
राजा मोहम्मद सहावा यांनी आर्थिक आणि पर्यावरणीय संकट हे या बंदीमागील कारण असल्याचे सांगितले आहे. गेल्या ७ वर्षांपासून देशात तीव्र दुष्काळ पडत आहे. पिके घेतली जात नाहीत. जनावरांना चारा आणि पाण्याची कमतरता भासत आहे. यामुळे जनावरांची संख्या ३८ टक्क्यांनी कमी झाली आहे. त्याचबरोबर चाऱ्याच्या किमतीत ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा परिणाम शेतकरी आणि पशुपालकांवर झाला आहे. याशिवाय मांसाच्या किमतीत वाढ झाली आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांना 'कुर्बानी'ची व्यवस्था करणे कठीण झाले आहे. राजा मोहम्मद सहावा हे मोरोक्कोचे धर्मप्रमुख देखील आहेत. त्यांनी म्हटले आहे की "या वर्षी परिस्थिती बिकट आहे, अशा परिस्थितीत बकरीदला कुर्बानी न देणे इस्लामच्या तत्वांनुसार आहे. राजाच्या मते, इस्लाममध्ये कुर्बानी चांगली मानली जाते परंतु ती अनिवार्य नाही. म्हणून, 'प्रतिकात्मक कुर्बानी' देखील देता येते.
प्राण्यांची खरेदी-विक्री थांबवण्यासाठी पशु बाजार आणि मंडई बंद करण्यात आल्या आहेत. देशभरातील राज्यपालांना आणि स्थानिक प्रशासनांना याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारने नागरिकांना पारंपारिक कुर्बानीऐवजी प्रार्थना आणि दानधर्माद्वारे हा सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षा दलांनी घरांवर छापे टाकून कुर्बानीसाठी आणलेले प्राणी ताब्यात घेतले आहेत, ज्यामुळे सार्वजनिक स्तरातून संताप आणि निषेध व्यक्त होत आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\