मोठा गौप्यस्फोट! "ठाकरेंनी आमदारकीच्या तिकीटासाठी पैसे घेतले!"

आमदार नितेश राणेंनी केला गंभीर आरोप

    07-Feb-2024
Total Views |

Uddhav Thackeray


मुंबई :
मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर मंत्रिपदासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला होता. याला आता भाजप आमदार नितेश राणे यांनीदेखील दुजोरा दिला आहे. दीपक केसरकर यांच्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे पदांसाठी आणि आमदारकीसाठी पैसे घेतात यावर आता शिक्कामोर्तब झालं असल्याचे ते म्हणाले आहेत. बुधवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
दीपक केसरकरांच्या वक्तव्याबद्दल बोलताना नितेश राणे म्हणाले की, "उद्धव ठाकरे पदासाठी पैसे घेतात हा आरोप सर्वात आधी २००४ मध्ये राणे साहेबांनी केला. दीपक केसरकर सांगतात की, त्यांनी दिलेला चेकचे पैसे हे अकाऊंटमध्ये दिसणार आहेच. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या लोकांनी याबद्दलचे स्पष्टीकरण द्यायला हवे. दीपक केसरकर यांच्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे पदांसाठी आणि आमदारकीसाठी पैसे घेतात यावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे," असे ते म्हणाले.
 
निवडणुक आयोगाचा निकाल राऊतांना सुखावणारा!
 
"ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:च्या कष्टाने आणि घामाने वाढवला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वलय मिळवून दिलं त्या अजितदादा पवारांना पक्ष आणि पक्षचिन्ह निवडणुक आयोगाने दिले आहे. हा निर्णय जेवढा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुखावणारा होता, त्यापेक्षाही जास्त संजय राजाराम राऊतांना सुखावणारा आहे. मी सातत्याने हेच सांगत आहे की, संजय राऊत ज्या घरामध्ये पाऊत टाकत आहेत त्या त्या घराला फोडण्याचं काम करत आहे. आधी ठाकरेंच्या घरात वाद लावले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये वाद लावून त्यांचं घर फोडलं. त्यानंतर शरद पवारांच्या जवळ जाऊन त्यांच्या घरात आज यशस्वीपणे वाद लावला आहे. आता त्यांचा डोळा काँग्रेसवर आहे. संजय राऊत घाणेरडं आणि गलिच्छ राजकारण करत आहेत," असा घणाघातही नितेश राणेंनी केला आहे.
 
पुढे ते म्हणाले की, "निवडणुक आयोगाने केवळ पक्षाच्या आमदार आणि खासदारांची संख्या बघितली नाही. आज कुठल्याही जिल्ह्यात गेल्यावर कळेल की, तिथली राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना नेमकी कुणाबरोबर आहे. पण ज्यांनी स्वत:च्या हाताने आपल्या मालकाचा पक्ष संपवला त्यांनी दुसऱ्यांबद्दल बोलण्याची हिंमत करु नये. शेवटी 'अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा' याचं उत्तर 'अकेला देवेंद्र फडणवीस ही काफी है' हे आमच्या ताईला यानिमित्ताने काल कळलं असेल," असा टोलाही त्यांनी सुप्रिया सुळेंचं नाव न घेता लगावला आहे.
 
संजय राऊतांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, "मुघलांच्या वंशजांनी आणि औरंग्याच्या पिल्लावळांनी आमच्या देवेंद्र फडणवीसांवर बोलण्याची हिंमत करु नये. 'अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा' हे यांच्याच ताई बोलायच्या. पण आता 'अकेला देवेंद्र फडणवीस ही काफी है' असं म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. म्हणून देवेंद्र फडणवीसांना तुम्ही पहिल्या दिवसापासून ओळखलं असतं तर आज ओसाड गावाचे पाटील बनण्याची वेळ आली नसती," असा टोलाही त्यांनी लगावला आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.