शिवार ते शिक्षण - एक यशोगाथा

    06-Feb-2024
Total Views |
Article on Prashant Jadhav
 
परिस्थितीचा अजिबात बाऊ न करता, नातेवाईकांकडे राहून शिक्षण पूर्ण केले. वेळप्रसंगी शेतात मोलमजुरी करून स्पर्धा परीक्षेतही बाजी मारली. तेव्हा, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर शिवारापासून ते शिक्षणापर्यंत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या प्रशांत जाधव यांची ही यशोगाथा...

परिस्थिती कितीही हलाखीची असली तरी त्याचा बाऊ न करता, स्वप्नपूर्तीची जिद्द असेल, तर ध्येय नक्कीच साध्य करता येते. अपयश कितीदा आले तरी खचून न जाता, सातत्याने परिश्रम केल्यास यश हे हमखास आपलेच असते. हे आपल्या कामगिरीतून सिद्ध करणारे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामधील नाळे या छोट्याशा गावातील होतकरु तरुण म्हणजे प्रशांत जाधव. माळमाथ्यासारख्या अवर्षणप्रवण भागात वास्तव्यास असणार्‍या प्रशांत यांनी स्पर्धा परीक्षेला गवसणी घालत लिपिक पदाने मंत्रालय गाठले. सध्या ते मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहेत.
 
प्रशांत यांचे प्राथमिक शिक्षण जेमतेम ५०० लोकवस्तीच्या नाळे गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे माध्यमिक शिक्षण हे चिखल ओहोळ येथे दोन अडीच किलोमीटर पायपीट करून त्यांनी पूर्ण केले. सततच्या शेतीच्या कामात गुंतलेले कुटुंब, वडिलांचं जेमतेम शिक्षण, अशा विपरित परिस्थितीतही प्रशांत यांनी धुळे येथील वरखेडे येथे बारावीपर्यंत शिक्षण घेतले. दरम्यान, शिक्षण घेताना मूळ जन्मजात नाळ शेतीमातीशी घट्ट ठेवून प्रशांत यांनी शेतीची कामे, वखरणी, नांगरणी रात्री-अपरात्री पिकाला पाणी देणे ही कामेदेखील इमानेइतबारे केली. एवढ्यावरच न थांबता, शेतकामासाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने कांदा लागवड, कपाशी वेचणी ही नित्याची कामेदेखील प्रशांत यांनी सुरू ठेवली.

बारावीनंतर पुन्हा पुढे काय, हा प्रश्न प्रशात यांना भेडसावत असतानाच, त्यांच्या धुळे येथील आत्याने (सुरेश कोते यांच्याकडे) मदतीचा हात पुढे करत मोलाची साथ दिली. त्यांच्याकडे राहून प्रशांत यांनी इंजिनिअरिंग, फार्मसीकडे कल असताना ‘जयहिंद’ या संस्थेत कला शाखेची पदवी घेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचे ठरवले. पदवी शिक्षणात उपजत गुणांना संधी मिळाल्यामुळे प्रशांत अनेक छोट्या-मोठ्या पारितोषिकांचे मानकरी ठरले. पदवी शिक्षण घेताना ‘कमवा व शिका’ हा ‘प्लान बी’ त्यांनी यशस्वी करत डीटीपी डिझायनिंग, टायपिंग कोर्सेस पूर्ण केल्याने शिक्षणाला हातभार लावला.

प्रशांत यांच्या चार आतेभावंडांनी शैक्षणिकदृष्ट्या चांगली कामगिरी बजावली होती. कृषी विस्तार अधिकारी, दोन फौजदार, दोन शिक्षक असे घवघवीत यश स्पर्धा परीक्षेत त्यांनी मिळवले होते. ही आतेभावांची प्रेरणा प्रशांत यांना मोठी पाठबळ देणारी ठरली अन् स्पर्धा परीक्षेचाखडतर प्रवास काहीसा सुकर झाला. २०१७ साली ‘पीएसआय’ व विक्रीकर निरीक्षक पदासाठी त्यांनी मुख्य परीक्षा दिली. मात्र, अवघ्या सहा गुणांनी त्यांना हुलकावणी दिली. तरीही अपयशाने न खचून जातात जिद्दीने ‘पीएसआय’च्या शारीरिक चाचणीचा सराव प्रशांत यांनी सुरूच ठेवला. शारीरिक चाचणीत यशस्वी झाल्यानंतर प्रशांत हे मुलाखतीत गुणवत्तेत आले. मात्र, ही निवड क्षणभंगूर ठरली.
 
पुन्हा नवीन आखणी करत जिद्दीने स्पर्धा परीक्षांमध्ये झोकून देत त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करत अखेर यश खेचून आणत मंत्रालयात लिपिक पदाला गवसणी घातली.विशेष म्हणजे, यापेक्षा मोठा पल्ला गाठायचे असल्याचे ते सांगतात. अजूनही त्यांना ‘पीएसआय’ होण्याचे स्वप्न साकारायचे असून, त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे ते सांगतात. अभ्यासाने कंटाळा आला की, शब्दांच्या दुनियेत रमणारे नवकवी प्रशांत बापाचं दुःखही अगदी सहजपणे मांडतात. त्यांच्या या खडतर वाटचालीत त्यांची आत्या, आई, भाऊ, भावजय, बहीण-पाहुणे, आतेभाऊ यांचे भक्कम पाठबळ, आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रेरक ठरल्यानेच ते हे यश मिळवू शकल्याचे ते आवर्जून नमूद करतात.
“कोणत्याही तरुणाने आजच्या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात उतरण्यापूर्वीच आपला ’प्लान बी’ तयार ठेवायला हवा आणि मगच स्पर्धा परीक्षांकडे वळायला हवे. वाढती स्पर्धा आणि अनियमित परीक्षांमुळे वयोमर्यादेची अट ओलांडली झाल्याची शक्यता असते. यासाठी प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणार्‍या उमेदवाराचा ’प्लान बी’ हा असायलाच हवा,” असे प्रशांत सांगतात. तसेच आज सर्वत्र स्पर्धा परीक्षाबाबतीत बोलताना प्रत्येकाच्या तोंडी जिद्द, चिकाटी आणि मेहनत हे तीन शब्द नक्की असतात. परंतु, फक्त बोलण्यापुरते मर्यादित असलेले हे शब्द कधीच उमेदवाराच्या मनात उतरताना दिसत नाही. कोणी तरी ‘मोटीव्हेशनल गुरु’ सांगतो आहे म्हणून आपल्याला या क्षेत्राकडे वळायचे आहे, स्वत:ची कुठलीही आवड नसताना या क्षेत्रात आलात तर अपयश हे नक्की आहे.,” असाही इशारा प्रशांत देतात.

“मी सहन केलेले परिस्थितीचे चटके हे मला यशस्वी करण्यासाठी पुरेसेहोते आणि त्यातून मी इथवर पोहोचू शकलो. ज्यांना कष्ट काय हे माहीत असते, ते सहजासहजी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपले मार्गक्रमण सुरू ठेवतात. त्यामुळे त्यांना यश मिळण्याची शक्यता थोडी जास्त असते,” असा मोलाचा सल्ला ते तरुणांना देतात. प्रशांत जाधव या होतकरू तरुणाला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.

गौरव परदेशी 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.