मुंबई : आज धनत्रयोदशी. धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजे तेरावा दिवस. आश्विन महिन्याचा तेरावा दिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आयुर्वेदाची देवता धन्वंतरीची पूजा केली जाते. तर धन्वंतरी हे पृथ्वीवरील आद्य वैद्यराज होते. समुद्रमंथनातून जी चौदा रत्ने निघाली त्यांपैकी एक होते धन्व॔तरी. त्यांच्या हातात एक कमंडलू होता जो अमृताने भरलेला असतो अशी कल्पना आहे. त्यांच्या कृपेमुळे देवांना जीवनदान मिळाले म्हणून त्यांना देवांचा वैद्य म्हणून ओळखले जाते. धन्व म्हणजे शल्य म्हणजेच सर्जरी आणि अन्त म्हणजे शेवट. ज्याला शल्यतंत्रामधील म्हणजेच सर्जरीमधील सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व काही ज्ञात आहे असा धन्वंतरी. या धन्वंतरी देवतेची पूजा आपण धनत्रयोदशीच्या दिवशी करतो. शेवटी आपले आरोग्य ही एक संपत्तिच असते म्हणून या आरोग्यदेवतेची पूजा धनत्रयोदशीच्या दिवशी आपण करतो. धन्वंतरी देवतेसोबतच धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदिच्या वस्तुंची खरेदी केली जाते. या शिवाय या दिवशी झाडू खरेदी करण्यालाही विशेष महत्त्व आहे. धनत्रयोदशीला झाडू खरेदी करण्याची फार पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. आपल्याकडे झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते. आपण झाडूने घरातील केर काढून बाहेर टाकतो. त्या केरासोबत झाडू घरातील दारिद्र्य, वाईट गोष्टी व नकारात्मकता गोष्टी सुद्धा घराबाहेर काढून टाकते असा समज आहे. या दिवशी झाडू खरेदी केल्याने घरात सुख-शांती येते आणि संपत्ती वाढते. यासोबतच काही लोकांचा असाही विश्वास आहे की, या दिवशी घरात झाडू आणल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सकारात्मकता पसरते. धनत्रयोदशीच्या दिवशी एका पाटावर धन्वंतरी, लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा ठेवून त्यांची पूजा केली जाते. त्यांच्या प्रतिमांसोबतच घरातील मौल्यवान वस्तुंचीही पूजा केली जाते.