मुंबई शहर असो वा उपनगरे, कचर्याचे रस्त्यावर ओसंडून वाहणारे ढीग हे एक सर्वसामान्य चित्र. देशाच्या आर्थिक राजधानीचे आणि राज्याच्या राजधानीचे शहर असलेल्या मुंबईतील ही कचराकोंडीची समस्या वर्षानुवर्षांची. त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना नुकत्याच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेला दिल्या आहेत. त्यानिमित्ताने मुंबईतील घनकचरा व्यवस्थापनाचे आव्हान आणि पालिकेच्या उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
मुंबई महानगरातील घनकचर्याची समस्या सोडविण्याकरिता मुंबई महानगरपालिका सुधारित धोरण तयार करणार आहे. त्याचा मसुदा तयार करण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील कचर्याची विल्हेवाट लावण्यासह त्याची हाताळणी कशी करता येईल याविषयीचा अभ्यास हे सल्लागार करणार आहेत.घनकचरा व्यवस्थापनाकडून यासंबंधीच्या धोरणावर काम करण्यासाठी नेमलेल्या सल्लागाराची मुदत फेब्रुवारी २०२३ मध्येच संपली होती. आता हाच कालावधी एक वर्षांसाठी वाढविण्यात आल्याची माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकार्याने दिली. सल्लागारांमध्ये कचरा व्यवस्थापनतज्ज्ञ, डेटा विश्लेषणतज्ज्ञ यांचादेखील समावेश असेल. या सल्लागारांच्या नियुक्तीवर सुमारे एक कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. कचर्याच्या संकलनावर लक्ष ठेवणे, कचरा उचलून डम्पिंग ग्राऊंडवर नेताना येणार्या अडचणी सोडविण्यासाठी अभ्यास करणे, घनकचरा व्यवस्थापनातील मनुष्यबळ, वाहने आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या योग्य वापरासाठी सूचना करण्यासह कचरा उचलण्यासाठी कोणते नवीन तंत्रज्ञान वापरता येईल, याबाबबतचा अहवाल हे सल्लागार देणार आहेत.
घनकचरा विभागाच्या दैनंदिन कामाचा आढावा घेऊन, तसेच विभाग आणि प्रभाग स्तरावरील इतर यंत्रणांशी समन्वय साधून मुंबई कचरामुक्त करण्याबाबत ते सूचना देतील. त्यांच्या सूचनेनुसार घनकचरा विभाग हळूहळू मुंबईत नव्या धोरणाची अंमलबजावणी करणार आहे.कचर्याची समस्या सोडविण्यासाठी ‘मुंबई महापालिका व्हिजन २०३०’वर काम करीत आहे. याअंतर्गत झोपडपट्ट्या, सोसायट्या, कार्यालये व इतर ठिकाणी निर्माण होणारा सुका कचरा व ओला कचरा वेगळा कसा करायचा आणि त्याची विल्हेवाट कशी लावायची, यावर काम सुरू आहे. कोरोनापूर्व काळात मुंबईत दररोज नऊ हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होत होता. कोरोनाकाळात साडेतीन ते चार हजार मेट्रिक टन कचरा निर्माण झाला होता. सध्या शहरात दररोज सहा ते साडेसहा हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दट्ट्यानंतर पालिका लागली स्वच्छतेच्या कामाला
मुंबईतील सार्वजनिक स्वच्छतेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाईचा दट्ट्या उगारल्यानंतर महापालिकेने सफाईचे काम मनावर घेतले. गल्लीबोळातूनही सफाई करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांकडून पालिका आयुक्तांना नुकतेच देण्यात आले. शहराच्या स्वच्छतेबाबत कोणतीही हयगय केली जाणार नाही. यातून मुंबईच्या विविध भागात, तसेच गल्लीबोळांतही स्वच्छता करण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी अचानक भेटी देऊन सफाई मोहिमेची पाहणी करत आहेत. मुंबईत कुठेही कचरा दिसता कामा नये, राडारोडा व कचरा त्वरित हटवा, शहरातील ज्या ठिकाणी भितींचे सुशोभीकरण करण्यात येत आहे, ते लवकर पूर्ण करावे. होर्डिंग्ज हटविण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले.
मुख्यमंत्री शिंदे काही दिवसांपूर्वी माझगाव डॉक येथून एका कार्यक्रमाहून परतत असताना या भागातील अस्वच्छता पाहून त्यांनी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. मुंबईतील सर्व रस्ते, गल्लीबोळ, छोटे रस्ते स्वच्छ करा, मुंबईत कुठेही रस्त्यावर कचरा दिसता कामा नये, राडारोडा आणि कचरा त्वरित हटवला गेला पाहिजे, यासाठी पालिकेचे सर्व साहाय्यक आयुक्त, स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता कर्मचारी अशा सर्व यंत्रणांना कामाला लावा, असे आदेश त्यांनी यावेळी दिले होते. पालिका प्रशासनातर्फे याची गांभीर्याने दखल घेत दोन अधिकार्यांवर कारवाईचा निर्णयदेखील घेण्यात आला. तसेच स्वच्छता मोहीम वेगाने सुरू करण्याचे निर्देश प्रभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत.
पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार परिमंडळ सहआयुक्त/उपायुक्त, सर्व विभागांचे साहाय्यक आयुक्त दररोज आपापल्या कार्यक्षेत्रात किमान दोन तास पाहणी दौरे केल्यानंतर पाहणीमध्ये केलेल्या स्वच्छताविषयक सूचनांच्या पूर्ततेसाठी पुनर्तपासणी केली जात आहे. स्वच्छता ही नियमित बाब असून, त्यामध्ये सातत्य राखले गेले पाहिजे. या सूत्रानुसार पालिकेचे अधिकारी-कर्मचारी चकाचक मुंबईसाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत, अशी माहिती उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा यांनी दिली.सर्व २४ विभागांत गुरुवार, दि. ७ सप्टेंबर रोजी स्वच्छता कर्मचार्यांनी सामूहिक स्वच्छता उपक्रम राबवून लहान रस्ते, गल्ली आदीमध्ये स्वच्छता केली. ग्रँट रोड, डी विभाग, गोरेगाव पी दक्षिण विभाग, परळ एफ दक्षिण विभागात स्वच्छता अभियान राबविले. मुंबई उपनगरामध्येही कर्मचार्यांनी विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली.
मुंबईची कचराकोंडी फोडण्यासाठी...
मुंबईसारख्या श्रीमंत महापालिकेकडून नागरी प्रश्न सोडवणे फारसे कठीण नाही. मात्र, त्याबाबत असंवेदनशीलता, इच्छाशक्तीचा अभाव, अकार्यक्षमता, खोल नियोजनाचा अभाव, चुकीच्या ठेकेदारांची निवड, सत्ताधारी आणि विरोधातील भांडणे, गैरव्यवहार यामुळे तीव्र समस्या बनत असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिका अधिकार्यांना आयुक्तांकडून निर्देश
गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक स्वच्छता आणि सुस्थितीतील रस्ते या दोन्ही बाबींवर प्राधान्यपणे लक्ष पुरवावे. अंमलबजावणी आणि कार्यवाही करूनही अपेक्षित परिणाम साध्य होत नसेल, तर त्रुटी शोधून त्यावर उपाययोजना कराव्यात. उत्सव कालावधीत पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, तसेच कामगारानी अधिक कार्यतत्पर व सजग राहावे, असे निर्देश पालिकेच्या प्रभारी आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.शहरात निर्माण होणारा कचरा हा विषय इंदोर, बंगळुरुसारख्या शहरामध्ये अत्यंत संवेदनशीलपणे हाताळला जाऊ शकतो, तर तो मुंबईसारख्या इतर शहरामध्ये हाताळला का जाऊ शकत नाही, असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
या काळात पालिका देणार या सुविधा...
१. विसर्जनासाठी १९१ कृत्रिम तलावांची निर्मिती पूर्णत्वाकडे जाणार आहे. आणखी तलावही बांधण्यात येणार आहेत.
२. उत्सवाच्या सोयीसाठी वाहन आधारित फिरते कृत्रिम तलावही तैनात केले जाणार आहेत.
३. मिरवणूक मार्गातील झाडांच्या फांद्याची छाटणी पूर्ण, लोंबवणार्या वायरी काढल्या जाणार.
४. प्रमुख विसर्जन स्थळांवर विनामूल्य पाणी व पार्किंग पुरविले जाणार आहे. विसर्जन स्थळानजीक सशुल्क प्रसाधनगृहे विनामूल्य उपलब्ध केली जाणार आहेत.
५. या काळात स्वच्छतेसाठी २४ प्रभागासाठी विशेष पथके नेमणार आहेत.
६. मुंबईत सध्याच्या घडीला १२ हजार छोटी मोठी गणेशोत्सव मंडळे आहेत. यामध्ये मोठ्या गणेशोत्सव मंडळातील गणपतींच्या दर्शनासाथी येणार्या भाविकांची संख्या खूप जास्त असते. त्यामुळे नियमित सफाई होऊनही त्या भागात प्लास्टिकसह अन्य कचरा होत असतो. कचरा पेट्या असूनही रस्त्यावर कचरा होत असतो, त्यामुळे मोठ्या गणेशत्सवाच्या ठिकाणी विशेष पथक नेमले जाणार आहे. यामध्ये चार ते पाच कर्मचारी स्वच्छतेसाठी तैनात असतील. देखरेख ठेवण्यासाठी कनिष्ठ अधिकारी पण असतील.
स्वच्छतेची जबाबदारी सात अधिकार्यांवर
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेचा निर्णय झाला. घनकचरा विभागाने सात अधिकार्यांची नेमणूक केली आहे. रस्ते, सार्वजनिक शौचालये, कचरा हस्तांतरण केंद्र या ठिकाणी स्वच्छता आहे का, याची पाहणी करण्याची जबाबदारी सात जणांकडे देण्यात आली आहे. दर आठवड्याला अहवाल देणे बंधनकारक राहील. या सात अधिकार्यांनी सकाळी ९ ते ११ या वेळेत नेमून दिलेल्या परिमंडळात फिरून स्वच्छतेची कामे नीट होत आहेत याची पाहणी करावी.
घरगल्ल्या चकाचक
‘स्वच्छ मुंबई’ मोहिमेअंतर्गत महापालिकेने दक्षिण मुंबईतील घरगल्ल्या चकाचक करण्यस प्राधान्य दिले आहे. सुमारे पाच हजारांहून अधिक घरगल्ल्या असून त्या कुलाबा, गिरगाव, ग्रँटरोड परिसरात आहेत जानेवारी अखेर या घरगल्ल्या स्वच्छ करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. घरगल्ल्यांची सफाई करणे कठीण काम असते. या ठिकाणी यांत्रिक पद्धतीने काम सुरू करण्यात आले आहे.
हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी राष्ट्रीय हरित प्राधिकरणाच्या निर्देशानुसार मुंबई पालिकेने आता यांत्रिकी झाडू खरेदीवर भर दिला आहे. शहर व उपनगरातील रस्त्यांची स्वच्छता राखण्यासाठी आता नऊ झाडू आणखी घेण्यात येणार आहेत. शहर व पूर्व उपनगरासाठी चार व पश्चिम उपनगरासाठी पाच ई-यांत्रिकी झाडू खरेदी करण्यात येणार आहेत. नऊ झाडूंची खरेदी व चार वर्षे देखभाल या कामासाठी ४२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पालिकेकडे सध्या २७ यांत्रिकी झाडू आहेत. त्याद्वारे रोज सुमारे २९३ किमी लांबीच्या रस्त्यांची सफाई करण्यात येत आहे. याच धर्तीवर आणखी नऊ झाडू खरेदी करण्यात येणार आहेत.
कचर्यासाठी ३२ कॉपॅक्टर वाहने खरेदी करणार
या नवीन वाहनांमुळे कचरा वाहून नेण्याची क्षमता वाढणार आहे. मुंबईत दररोज ६ हजार, २५ मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. हा कचरा घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून उचलला जातो. मुंबईत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा होणारा कचरा कॉम्पॅक्टर वाहनाच्या माध्यमातून कांजूर व देवनार कचराभूमीत पाठविण्यात येतो. पालिकेच्या २४६ व ठेकेदाराच्या १ हजार, ६९४ वाहनातून दैंनदिन कचरा, गाळ आणि राडारोडा वाहून नेण्यात येतो. या वाहनांमध्ये आता आणखी ३२ नव्या कॉक्पॅक्टर वाहनांची भर पडली आहे. एका कॉम्पॅक्टर वाहनातून सहा मेट्रिक टन कचरा वाहून नेण्यात येतो. ३२ कॉम्पॅक्टर वाहनापैकी शहरासाठी सहा, पश्चिम उपनगरासाठी ११ व पूर्व उपनगरासाठी १५ वाहने उपलब्ध झाली आहेत.अशा तर्हेने मुंबईत कचरा विभाग कचरा निर्मूलनासाठी प्रयत्नशील आहे. पण, या प्रयत्नांत सातत्य ठेवले तरच मुंबईची कचराकोंडी मार्गी लागेल, हे निश्चित.
- अच्युत राईलकर