मोदीजींमुळे मिळाला भारताला नवा सन्मान- चंद्रशेखर बावनकुळे

प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत सेवा पंधरवाड्याला सुरुवात

    18-Sep-2023
Total Views |

narendra modi

मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सुत्रे हातात घेतल्यावर भारतात अमुलाग्र बदल झाला. जी-२० संमेलनातून भारताच्या शक्तीचा परिचय संपूर्ण जगाला मिळाला असून नवा सन्मान प्राप्त झाला आहे, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

ते सावनेर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेरी माटी, मेरा देश या उपक्रमात व रक्तदान शिबिरात बोलत होते. त्यांनी सावनेर विधानसभा क्षेत्रातून सेवा पंधरवाड्यातील विविध कार्यक्रमांची सुरुवात केली.

ते म्हणाले, विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक घटकाला सर्वकष गती देण्याचा प्रयत्न आहे. चांद्रयान मोहिमेत भारताला मिळालेले यश ही मोदीजींच्या काळातील मोठी उपलब्धी आहे. सरंक्षण क्षेत्रात भारताची कामगिरी जगाचे पारणे फेडणारी आहे. कोविड काळात भारत जगभरात फार्मा हब म्हणून नावारूपास आला, यावरही त्यांनी लक्ष वेधले.

भाजपा कार्यकर्त्यांनी मोदीजींच्या कामांना गती देण्याचे काम करावे, असे आवाहन करून ते म्हणाले की, भाजपाचे विचार समाजाचे हित व अंत्योदयाच्या विचारातून प्रेरित आहे. कोणताही व्यक्ती सरकारच्या योजनांपासून वंचित राहू नये. कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. यावेळी त्यांनी रक्तदान करणाऱ्या युवकांचे उत्साहवर्धन केले. मेरी माटी मेरा देश अंतर्गत कलशाचा स्वीकार केला.

या कार्यक्रमाला भाजपा नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, रामटेक लोकसभा निवडणूक प्रमुख अरविंद गजभिये, जिल्हा उपाध्यक्ष किशोर चौधरी, अशोक धोटे यांच्यासह सावनेर विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.