बंगालमधील महिला अत्याचार राज्यप्रायोजित – भाजपचा घणाघात

    28-Jun-2025   
Total Views |

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये महिला मुख्यमंत्री असूनही राज्यात होणाऱ्या महिला अत्याचारांविषयी राज्य सरकार असंवेदनशील असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. राज्यात झालेली सामूहिक बलात्काराची घटना ही राज्यप्रायोजित असल्याचे दिसते, असा घणाघात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि खासदार डॉ. संबित पात्रा यांनी शनिवारी पत्रकारपरिषदेत केला आहे.

संबित पात्रा म्हणाले की, ही क्रूर घटना राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे हे संपूर्ण प्रकरण कॉलेज युनियनशी संबंधित आहे. मुख्य आरोपी हा तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा सचिव आहे आणि तो पक्षाचा सक्रिय सदस्य आहे. पीडितेला हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आली. चित्रपटांमध्ये ज्याप्रमाणे राक्षस महिलांशी वागतात, त्याचप्रमाणे तृणमूलचे गुंड पीडितेशी वागले. त्यांनी तिला रुग्णालयात नेले नाही. तृणमूल नेता मनोजित मिश्रा हा यामध्ये मुख्य आरोपी आहेत. त्यामुळे राज्यात महिला मुख्यमंत्री असूनही महिला अत्याचाराची प्रकरणे घडत असून ती राज्यप्रायोजित आहे, असे ते म्हणाले.

भाजपने या घटनेचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी सत्यशोधन समिती स्थापन केल्याचे पात्रा म्हणाले. ही समिती घटनास्थळी जाऊन परिस्थितीचे अवलोकन करणार आहे. समितीमध्ये माजी केंद्रीय मंत्री सतपाल सिंह आणि मीनाक्षी लेखी, खासदार बिप्लब देब आणि मनन मिश्रा यांचा समावेश आहे. चौकशीनंतर समिती लवकरच भाजप अध्यक्षांना आपला अहवाल सादर करणार आहे.

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट गरजेची – सुवेंदू अधिकारी, विरोधी पक्षनेते, प. बंगाल विधानसभा

भाजप नेते आणि बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी म्हणाले की, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि सैन्य आणि निमलष्करी दल तैनात करावे. तृणमूल काँग्रेस हा बलात्कारी, भ्रष्ट आणि देशद्रोहींचा पक्ष आहे. ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये महिला आणि मुली सुरक्षित नाहीत. गेल्या १४ वर्षांपासून हेच घडत आहे. राज्यात हिंदूंना मतदान करण्यापासून रोखले जात आहे. जोपर्यंत ममता बॅनर्जी यांना पराभूत केल्याशिवाय राज्यात शांतता नांदणार नाही.