मुंबई : ओडिसाच्या जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेला सुरुवात झाली की, मणिपुर येथे कांग उत्सवाची धुमधाम सुरु होते. कांग हा मणिपूरमधील मेईतेई समुदायाद्वारे साजरा केल्या जाणाऱ्या प्रमुख हिंदू सणांपैकी एक आहे. याची रचना साधारण जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेसारखीच असते. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची रथावर बसून यात्रा काढली जाते. कांग उत्सवादरम्यान केले जाणारे विधी सुद्धा जगन्नाथ पुरी रथयात्रेसारखेच असतात.
यंदाचा कांग उत्सवाला २७ जून पासूनच सुरुवात झाला. या शुभ प्रसंगी, मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी इम्फाळ येथील श्री श्री गोविंदाजी मंदिराला भेट दिली, जे राज्याच्या राजधानीत स्थित एक प्रमुख वैष्णव मंदिर आहे. मणिपूरच्या माजी राजघराण्यातील विद्यमान सदस्य आणि भाजप खासदार सानाजाओबा लेशेम्बा यांनीही इम्फाळ मंदिरात कांग उत्सवादरम्यान प्रार्थना केली.
कांग उत्सव हे नाव कांग या शब्दावरून आले आहे जे भगवान जगन्नाथ आणि त्यांच्या भावंडांच्या रथाचा संदर्भ देते. देवतांना फुले, फळे आणि तुपात भिजवलेले कापसाचे लहान गोळे ज्याला बारती म्हणतात, ते अर्पण केले जातात. भक्त 'खुबाकिसेई' नावाचे कीर्तन देखील गातात आणि विविध ठिकाणी सामुहिक भोजन व्यवस्थेची सोय केलेली असते. कांग यात्रेची सुरुवात इम्फाळमधील श्री गोविंदाजी मंदिरापासून होते आणि कांगला किल्ल्याच्या पश्चिम प्रवेशद्वारावरील सनाथोंग येथे पोहोचल्यानंतर ती मंदिरात परत जाते.
श्री गोविंदाजी मंदिर हे या प्रदेशातील वैष्णव संस्कृतीचे केंद्र मानले जाते, तर मेईतेई भाषेत सनाथोंग म्हणजे 'सोनेरी दरवाजा'. हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कारण मिरवणुकीदरम्यान भाविक रथाभोवती गाणी गातात आणि नृत्य करतात. संपूर्ण उत्सवात स्थानिक मेईतेई समुदाय मोठ्या प्रमाणात सहभागी असतो.
रथयात्रेव्यतिरिक्त, उत्सवाच्या दहा दिवसांत दररोज संध्याकाळी, विविध मंदिरांमध्ये भाविकांकडून जयदेव चोंगबा नावाचे एक अनोखे भक्ती कीर्तन सादर केले जाते. जयदेव चोंगबामध्ये, पुरुष आणि स्त्रिया वेगवेगळे वर्तुळ बनवतात आणि 'पुंग' या मणिपुरी संगीत वाद्यावर नृत्य करतात. त्यानंतर पारंपारिक पोशाखात सजलेल्या महिला आणि तरुणी भक्ती नृत्य सादर करतात.