
नवी दिल्ली, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मंगळवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची बिजिंग येथे भेट घेतली. पूर्व लडाखमधील तणावानंतर परराष्ट्र मंत्री पाच वर्षांनी चीन दौऱ्यावर गेले आहेत.
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने शी जिनपिंग यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी भारत-चीन द्विपक्षीय संबंधांमध्ये अलिकडच्या काळात झालेल्या सुधारणांबद्दलही माहिती दिली. दोन्ही देशांच्या नेत्यांचे मार्गदर्शन या संदर्भात खूप महत्वाचे आहे आणि ते संबंधांना एक नवीन दिशा देण्यास मदत करत आहे, असेही जयशंकर यांनी म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्री शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेसाठी चीनमध्ये आहेत. त्यांनी सोमवारी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या संभाषणात त्यांनी सांगितले की, गेल्या ९ महिन्यांत भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये चांगली प्रगती झाली आहे. विशेषतः सीमेवरील तणाव कमी झाला आहे आणि शांततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता दोन्ही बाजूंनी तणाव कमी करणे आणि इतर प्रलंबित समस्या सोडवण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
भारत आणि चीनने त्यांच्यातील मतभेदांना वादात रूपांतरित करू नये यावर परराष्ट्रमंत्र्यांनी भर दिला. ते म्हणाले की स्पर्धा कधीही संघर्षाचे रूप घेऊ नये. भारत आणि चीनमधील स्थिर आणि रचनात्मक संबंध केवळ आपल्यासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी फायदेशीर आहेत. परस्पर आदर, परस्पर हित आणि संवेदनशीलतेच्या आधारावर हे संबंध हाताळण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.