माफी मागणे हेच राहुल गांधींचे प्रारब्ध – केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा घणाघात

    26-Jul-2025   
Total Views | 5

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मागासवर्गीयांबाबत दिलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात वादंग माजला असताना केंद्रीय कृषीमंत्री व भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांनी राहुल गांधींवर आणि काँग्रेस पक्षावर खरमरीत टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या प्रारब्धात केवळ माफी मागणेच आहे. त्यांचे प्रत्येक विधान देशासाठी घातक ठरते आणि नंतर त्यांना पावलोपावली माफी मागावी लागते, असा घणाघात त्यांनी केला.

भोपाळ येथे बोलताना केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले, राहुल गांधी यांना महत्त्वाचे प्रश्न खूप उशीरा समजतात. त्यांनी आणीबाणीसाठी माफी मागितली, शीखविरोधी दंगलीसाठी माफी मागितली, नंतर राफेल प्रकरणावरूनही मागितली. आता त्यांनी ओबीसी समाजाबद्दलही माफी मागितली. त्यामुळे त्यांची आजची जी भूमिका आहे, त्याबद्दल ते १० वर्षांनी पुन्हा माफी मागतील, असा सणसणीत टोला केंद्री मंत्री चौहान यांनी लगावला.

काँग्रेस पक्षाच्या मागासवर्गीय समाजाबाबतच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चौहान म्हणाले,
काँग्रेसने ओबीसी समाजासाठी काय केले आहे, याची इतिहास तपासण्याची गरज आहे. मंडल आयोगाच्या शिफारशींना गोठवून ओबीसी कल्याण रोखण्याचे काम काँग्रेसने केले आहे. त्यामुळे आता केवळ राजकीय सोयीसाठी माफी मागण्याचे प्रकार होत आहेत.त्यांनी काँग्रेसवर ‘राष्ट्रविरोधी मानसिकता’ जोपासल्याचा आरोपही केला. ते म्हणाले,काँग्रेस आता फक्त मोदींचा विरोध करत नाही, तर थेट देशविरोधात भूमिका घेत आहे. काँग्रेसने पूर्व कारगिल युद्धावर प्रश्न उपस्थित केले आणि आता ‘ऑपरेशन सिंदूर’ सारख्या महत्त्वाच्या सैनिकी कारवाईवरही टीका केली. हे भारतीय लष्कराच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखे आहे. त्यांच्या नेत्यांची विधानं पाकिस्तानसारख्या देशात भारताच्या विरोधात दाखवली जात आहेत. ही अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे, असेही शिवराजसिंह चौहान यांनी नमूद केले.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121