नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दहशतवादाला भारताच्या दृढ प्रतिसादावर भर दिला आणि शाश्वत आणि समृद्ध भारत निर्माण करण्याच्या उद्देशाने नऊ प्रमुख संकल्पांवर प्रकाश टाकला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैन आध्यात्मिक गुरू आचार्य विद्यानंद महाराज यांच्या जयंतीच्या शताब्दी समारंभात भाग घेतला. यावेळी त्यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, जैन आध्यात्मिक गुरू आचार्य विद्यानंद महाराजांच्या विचारांनी सरकारच्या कल्याणकारी योजनांना प्रेरणा दिली आहे. पंतप्रधानांनी जैन संताच्या एका प्रवचनाचाही उल्लेख केला आणि त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'ला आशीर्वाद दिला असल्य़ाचे सांगितले. जो कोणी भारतास छेडण्याचा प्रयत्न करतो, त्यास भारत प्रत्युत्तर देतो; असे पंतप्रधान म्हणाले.
कार्यक्रमात पंतप्रधानांनी त्यांचे नऊ संकल्प पुन्हा सांगितले आणि देशवासियांना त्यांचे पालन करण्याचे आवाहन केले. हे संकल्प आहेत - पाणी वाचवा, आईच्या स्मरणार्थ झाड लावा, स्वच्छता, 'व्होकल फॉर लोकल', देशातील विविध ठिकाणी प्रवास करा, नैसर्गिक शेतीचा अवलंब करा, निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा, खेळ आणि योगाचा अवलंब करा आणि गरिबांना मदत करा.