
नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षेत्राला बळकटी देणारा एक महत्त्वाचा करार महिंद्रा डिफेन्स सिस्टम्स आणि ब्राझीलच्या एम्ब्राएर एअरोस्पेस कंपनी यांच्यात झाला आहे. या करारानुसार ब्राझीलचे प्रसिद्ध सी‑390 मिलेनियम हे मध्यम क्षमतेचे सामरिक मालवाहतूक विमान भारतात तयार करण्यात येणार आहे.
नवी दिल्लीत ब्राझीलच्या दूतावासात दोन्ही कंपन्यांमध्ये मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग (एमओयू) वर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. भारतीय हवाई दलाच्या ‘मध्यम वाहतूक विमान’ (एमटीए) कार्यक्रमांतर्गत हे विमान प्रस्तावित करण्यात येणार असून, भारतात त्याचे उत्पादनही सुरू होणार आहे.
महिंद्रा ग्रुपचे कार्यकारी सदस्य विनोद सहाय म्हणाले, भारतीय हवाई दलासाठी हे विमान केवळ सामर्थ्यवर्धक ठरणार नाही, तर ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या उद्दिष्टांना चालना देणारेही ठरेल. एम्ब्राएरच्या जागतिक संरक्षण विभागाचे प्रमुख जॅक्स कॉमॅर्ड म्हणाले, भारत हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा भागीदार आहे. आम्ही भारताच्या आत्मनिर्भरतेच्या ध्येयांना पूर्ण पाठिंबा देतो. या करारामुळे भारतात औद्योगिकीकरण, रोजगार व कौशल्य वृद्धीला चालना मिळेल.
सी-३९० ची वैशिष्ट्ये
· सी‑390 मिलेनियम हे विमान २६ टनांपेक्षा जास्त वजन वाहू शकते
· ताशी ८७० किमी वेगाने उड्डाण करू शकते.
· याचा उपयोग सैनिक व मालवाहतूक, वैद्यकीय मदत, शोध व बचाव मोहिमा, हवाई अग्निशमन अशा अनेक कामांसाठी होतो.
· हे विमान उंचावरील आणि खडतर धावपट्ट्यांवरही सहजपणे उतरू शकते.
· ब्राझीलने २०१९ मध्ये, तर पोर्तुगालने २०२३ मध्ये हे विमान सेवेत घेतले आहे.
· याशिवाय हंगेरी, नेदरलँड्स, ऑस्ट्रिया, चेक प्रजासत्ताक आणि दक्षिण कोरियासारख्या देशांनीही याची निवड केली आहे.