सावधान... ठाण्यात घोडागाडीची सैर जीवावर बेतु शकते!

    01-Jun-2023
Total Views |
Thane Masunda Talav

ठाणे
: ठाण्यात घोडागाडीची सैर करताय तर सावधान ... ठाण्याच्या तलावपाळीवर अशी सैर करताना एका कुटुंबाचा जीव सुदैवाने वाचला आहे. बुधवारी रात्री व्हिक्टोरियाची रपेट सुरू असताना अतिभारामुळे घोडागाडीच मोडुन पडल्याने प्रवाश्यांसोबतच घोड्याच्याही जीवावर बेतण्याचा प्रसंग ओढवला होता. सुदैवाने, पालिकेच्या सुरक्षारक्षकाने धाव घेत अडकलेल्या प्रवाश्यांची सुटका केल्याने सर्वानाच हायसे वाटले. मात्र, नियम धाब्यावर बसवुन चार पेक्षा अधिक प्रवाशी घेऊन सैर करणाऱ्या घोडागाड्यावर प्रशासनाने अंकुश ठेवण्याची मागणी होत आहे.

ठाण्याची चौपाटी म्हटल्या जाणाऱ्या मासुंदा तलाव येथील तलावपाळीवर घोडागाडीची रपेट पाहायला मिळते.अनेक टांगे आणि व्हिक्टोरियां सायंकाळच्या सुमारास प्रवाश्यांना तलावपाळीवर सैर घडवत असतात. बुधवारी रात्री कोपरीतील कुटुंब व्हिक्टोरियातुन सैर करीत असताना गडकरी रंगायतननजिक अचानक धावती घोडागाडी मोडुन पडली. मधोमध घोडागाडी तुटल्याने घोडा अवघडला तर सैर करणारे सहा जणांचे कुटुंब घोडागाडीतच अडकुन पडले.या कुटुंबातील मुलीचा पाय तुटता तुटता वाचला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी, अशा नियमबाह्य कृतीमुळे घोडा आणि घोडागाडीतुन सैर करणाऱ्या प्रवाश्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अश्वपाल संघटनेने प्रत्येक घोडागाडीवर फक्त चार प्रवाशी घेण्याच्या सुचनांचा फलक लावला आहे.दररोज प्रती फेरी १५० रुपये आणि शनिवारी - रविवारी २०० रुपये आकारण्याच्या सूचनेचाही समावेश आहे. तरीही, अधिक कमाईच्या हव्यासापायी काही घोडागाडीवाले नियम डावलुन चारपेक्षा अधिक प्रवाशी घेत असल्याचे दिसुन येत आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.