पुढच्या काळात राज्याचा महसूल विभाग देशातील क्रमांक एकचा विभाग ठरणार : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    02-Jun-2025
Total Views |
 
Chandrashekhar Bawankule
 
नागपूर : पुढच्या काळात महाराष्ट्राचा महसूल विभाग हा देशातील क्रमांक एकचा विभाग ठरेल, असे काम आम्ही सुरु केले आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. सोमवार, २ जून रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
 
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "महसूल खात्यात अजून डझनभर निर्णय होणार आहेत. महसूल खाते हे अधिक आधुनिक आणि लोकाभिमुख करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. पुढच्या काळात महाराष्ट्राचा महसूल विभाग हा देशातील क्रमांक एकचा विभाग ठरेल, असे काम आम्ही सुरु केले आहे."
 
 
"येत्या काळात फिरते सेतू केंद्र तयार करण्याचा आमचा विचार आहे. जात प्रमाणपत्रापासून तर मृत्यू प्रमाणपत्रापर्यंत सर्वच बाबी गावागावांत पोहोचवण्यासाठी आम्ही काम करतो आहोत. सर्व सेवा ऑनलाईन होऊन लोकांना घरपोच सेवा मिळावी यासाठी सरकारने तयारी केली आहे. पुढच्या १५० दिवसांत महाराष्ट्रातील सर्व सेवा ऑनलाईन करा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांना सांगितले आहे," असे बावनकुळेंनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले की, "देवेंद्र फडणविसांनी नेहमीच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष मजबूत करण्याचे काम केले आहे. मुख्यमंत्र्यांनी विभाग पातळीवर मुख्यमंत्री सहायता कार्यालय उघडले आहेत, जेणेकरून रुग्णांची हेळसांड होणार नाही, केंद्र आणि राज्य सरकारच्या दोन्ही योजना रुग्णांना मिळतील आणि पैशा अभावी कुणाचाही जीव जाणार नाही," असेही ते म्हणाले.
 
आपापल्या नेत्यांसोबत बसून वाद सोडवता येतात!
 
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत बोलताना ते म्हणाले की, "महायूतीमध्ये आलबेल ठेवण्याची भाजपची जबाबदारी आहे. यासाठी मी आणि मुख्यमंत्री नेहमीच पुढाकार घेतो आहे. पालकमंत्रीपदाचा तिढासुद्धा लवकरच सुटेल अशी व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी केली आहे. रायगडच्या महायूतीतील सर्व पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपापसातील वाद चव्हाट्यावर नेण्यापेक्षा आपापल्या नेत्यांसोबत बसून ते वाद सोडवता येतात. जाहीर वक्तव्य करणे महायूतीत योग्य नाही. एखाद्या पक्षाला सल्ला देण्याइतका एवढा मोठा मी नाही. पण रस्त्यावर वाद न होता आपापल्या नेतृत्वाशी बोलून वाद संपवले पाहिजे, असे मला वाटते," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.