धरतीच्या ’कॅनव्हास’वर शिवरायांची भव्य व्यक्तीचित्राकृती

21 हजार स्वे. फूट मैदान; भव्य कलाकृतींचे विहंगावलोकनानेच होते पूर्ण दर्शन

    09-Mar-2023
Total Views |
A magnificent portrait of Shiva Raya

नाशिक : सागराची शाई अन् धरतीचा कागद केला तरी शिवरायांचे कर्तृत्व लिहणे शक्य होणार नाही. हिमालयाची उंची लाभलेल्या राजाला पिंपळगाव बसवंत येथील ‘छत्रपती ऐक्य ग्रुप’ने जाणत्या मानवंदना देण्यासाठी शब्दश: अर्थाने धरतीचा ‘कॅनव्हास’ करून 21 हजार स्वेअर फूट जागेत नैसर्गिक ‘ग्रीन लॉन्स‘(हिरवळ) आणि टाकाऊ प्लास्टिक-फायबरपासून भव्य कलाकृती साकारली आहे.
 
 
‘छत्रपती ऐक्य’चे विकास संगपाळ व गणेश डेरे यांच्या पुढाकाराने विश्वविक्रमी कलाकृती साकारली आहे. पिंपळगाव बसवंत येथील ’रेडियंट इंटरनॅशनल स्कूल’च्या मैदानावर तब्बल दोन दिवस ऊन, वादळ आणि पाऊस अशा आव्हानांवर मात करून हे विक्रमी निर्माण करण्यात आले. याद्वारे शिवजयंती(तिथीनुसार)निमित्त शिवरांना मानवंदना दिली जात आहे. ‘बेस्ट फ्रॉम वेस्ट’ संकल्पनेतून कलाकृतीत टाकाऊ प्लास्टिकसह नैसर्गिक हिरवळ वापरली आहे. प्रसिद्ध चित्रकार उद्देश पघळ यांनी ही कलाकृती साकारली. हे भव्य चित्र विश्वविक्रमासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती ग्रुपचे विकास संगपाल यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली.
 
‘रेडियंट स्कूल’चे संचालक शिखर श्रीवास्तव यांनी शाळेचा मैदान कलाकृतीसाठी उपलब्ध करून दिले. अमोल अकोलकर, गुंजण चव्हाण, पीयुष मेंगाणे, लौकिक बुरड, यशोदीप डेरे, दीपक गुंजाळ, अमित डेरे, सार्थक कावळे, संकेत डेरे आदी तरुणाई यासाठी अहोरात्र मेहनत घेत होते.

निर्मितीतून समाधान अन् आनंद

भव्य कलाकृतींचे निर्मिती माझी ’पॅशन’च झाली आहे. यापूर्वी पाच कलाकृतींची विश्वविक्रमी चित्र म्हणून नोंद घेतली गेली. ही कलाकृतीही ’लिम्का बूक’मध्ये नोंद होण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. पावसांनी जमीन ओली होती. सर्व आव्हानांवर मात करून आमचे राजे भव्य रुपात साकारता आले याचे समाधन अन् आनंद आहे.
उद्देश पघळ (आर्टीस्ट)

शिवरायांना मानवंदना अन् संघ भावना

चित्रकृतींतून शिवरायांना अभिनव मानवंदना देण्याची इच्छा होती. यासह भव्य कलाकृतीद्वारे, तरुणाईला एकत्र करून संघभावना (टीमवर्क), गटनेतृत्व, आव्हानांवर मात करत उद्देश साध्य करण्याचे प्रात्यक्षिक उपक्रमातून देता आले.
विकास संगपाळ
आयोजक, छत्रपती ऐक्य ग्रुप, पिंपळगाव बसवंत

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.