मुंबई : भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, दि. १ जुलै रोजी नव्या अध्यक्षाच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे. त्याच दिवशी राष्ट्रीय परिषद सदस्यांच्या नावांचीही घोषणा केली जाईल. ही निवडणूक पक्षाच्या संघटनात्मक पुनर्रचनेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
भाजपचे प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली. दि. २९ जून रोजी राज्य परिषद सदस्यांची यादी जाहीर होणार असून, दि. ३० जून रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत इच्छुक उमेदवारांना प्रदेशाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करता येतील. अर्ज छाननीनंतर दि. १ जुलै रोजी सकाळी १० वाजता अंतिम निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती संचेती यांनी दिली.
कोणाची नावे चर्चेत
- भाजपमध्ये दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका घेतल्या जातात. या प्रक्रियेत बूथपासून ते प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषद सदस्यांपर्यंत निवड केली जाते. राष्ट्रीय परिषद ही पक्षाच्या धोरण निश्चितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते.
- महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे नाव पुढे येत असून, त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नांदेडमधील सभेत त्याबाबत सूचक संकेत दिले होते.