मुंबई : 'भारत ही जगातील सर्वात जुनी जिवंत संस्कृती आहे. आपले विचार, आपले तत्वज्ञान अमर आहे. या तत्वज्ञानाचे स्रोत आपले ऋषी, संत आणि आचार्य आहेत. आचार्य विद्यानंद जी महाराज हे भारताच्या या परंपरेचे आधुनिक दीपस्तंभ आहेत. ते म्हणायचे की जेव्हा जीवन सेवेने परिपूर्ण होते तेव्हाच जीवन धार्मिक बनू शकते. त्यांचा हा विचार जैन तत्वज्ञानाच्या मूळ भावनेशी तसेच भारताच्या चेतनेशी जोडलेला आहे.", असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जैन आध्यात्मिक गुरू आचार्य विद्यानंद महाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्त शनिवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आचार्य विद्यानंद महाराजांच्या विचारांनी सरकारच्या कल्याणकारी योजनांना प्रेरणा दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, 'आज आपण सर्वजण भारताच्या आध्यात्मिक परंपरेतील एका महत्त्वाच्या प्रसंगाचे साक्षीदार आहोत. पूज्य आचार्य विद्यानंद जी महाराज, त्यांच्या जन्मशताब्दीच्या शुभ उत्सवात त्यांच्या अमर प्रेरणांनी ओतप्रोत हा कार्यक्रम एक अभूतपूर्व प्रेरणादायी वातावरण निर्माण करत आहे आणि आपल्या सर्वांना प्रेरणा देत आहे. २८ जून रोजी, म्हणजेच १९८७ मध्ये याच दिवशी, आचार्य विद्यानंद जी महाराज यांना आचार्य ही पदवी मिळाली. हा केवळ एक सन्मान नव्हता तर जैन परंपरेला विचार, संयम आणि करुणेशी जोडणारा एक पवित्र प्रवाह होता."
'धर्म चक्रवर्ती' पदवीने पंतप्रधानांचा सन्मान
कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींना 'धर्म चक्रवर्ती' पदवीने सन्मानित करण्यात आले. तेव्हा पंतप्रधान म्हणाले, 'धर्म चक्रवर्ती' या पदवीसाठी मी स्वतःला पात्र मानत नाही, मात्र संतांकडून आपल्याला जे काही मिळते ते आपण प्रसाद म्हणून स्वीकारतो ही आपली परंपरा आहे. त्यामुळे मी हा सन्मान नम्रपणे स्वीकारतो आणि तो भारतीच्या चरणी अर्पण करतो.