मुंबई : मुंबई पोलीस दलाला सक्षम बनवत फडणवीस सरकारने शहराच्या सुरक्षेला नवी ताकद दिली आहे. गस्त अधिक प्रभावी, प्रतिसाद अधिक जलद आणि तपास अचूक व्हावा, यासाठी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात तब्बल ४ हजार ४८९ नव्या वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. गृह विभागाचा हा निर्णय पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.
या नव्या ताफ्यात बीपी कार, एसयूव्ही, आर्मर्ड व्हेईकल्स, जीप, मोटारसायकली, मोबाईल स्कॅनर, डॉग व्हॅन, कमांड पोस्ट, मोबाईल हॉस्पिटल, वॉटर टँकर, ट्रक आणि इतर अत्यावश्यक व विशेष कार्यक्षम वाहने समाविष्ट आहेत. ही सर्व वाहने मुंबई पोलीस आयुक्त आणि त्यांच्या अधिनस्त युनिट्ससाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विशेष पोलीस आयुक्त पदाची नव्याने निर्मिती, वाढती पोलीस ठाणी आणि वाहतूक यंत्रणेतील गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
सद्यस्थितीत पोलिसांकडे असलेल्या ८० अतिरिक्त जीप्स निर्लेखित केल्याशिवाय नवीन जीप्स खरेदी करता येणार नाही, अशी अट आहे. यापुढे सर्व प्रकारच्या वाहनखरेदीसाठी राज्यस्तरीय वाहन आढावा समितीची मंजुरी अनिवार्य राहील. तसेच, सर्व वाहनांची माहिती https://mahavahan.maharashtra.gov.in या पोर्टलवर नोंदवणे अनिवार्य असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सामान्य मुंबईकरांसाठी काय बदलेल?
आपत्कालीन प्रतिसाद अधिक जलद : अपघात, हिंसाचार, आग लागणे किंवा गुन्ह्याच्या घटनांवेळी पोलीस तातडीने पोहोचू शकतील.
गस्तीत सातत्य : ज्या भागांमध्ये पोलिसांची गस्त कमी होती, तिथे आता नियमित गस्त शक्य होईल.
वाहतूक नियंत्रणात सुधारणा : वाहतूक शाखेसाठी स्वतंत्र वाहने मिळाल्याने वाहतूक कोंडी, चुकीचे पार्किंग, अपघात यावर वेळीच उपाय करता येईल.
गुन्हेगारीवर लक्ष : आर्मर्ड व्हेईकल्स, मोबाईल स्कॅनर, डॉग व्हॅन यामुळे तपास आणि अटकेची कारवाई अधिक प्रभावी होईल.
आपत्कालीन सुविधा : गर्दीच्या ठिकाणी किंवा मोर्चा-प्रदर्शनांदरम्यान आपत्कालीन वैद्यकीय सुविधा अधिक तत्पर होतील.
मंजूर वाहनांचा तपशील
वाहन प्रकार | संख्या |
बी.पी. कार | ३० |
कार/एस.यू.व्ही. | १२२ |
आर्मर्ड व्हेईकल्स/मार्क्समन/रक्षक | ९२ |
आर.आय.व्ही. | १५ |
जीप/मोबाईल स्कॅनर | १,४९६ |
मोटारसायकल | १,९४६ |
लाईट व्हॅन | २७३ |
द्रुप कॅरिअर/बस | २२८ |
प्रिझन व्हॅन | ७९ |
मॅकलिफ्टन क्रेन/स्मॉल क्रेन | १०५ |
रेकर | ५ |
इनव्हेस्टिगेशन व्हॅन | १२ |
वॉटर/कॉग्बी टँकर | १५ |
ट्रक | ११ |
कंट्रोल कमांड पोस्ट | ७ |
वरुण वाहन | ५ |
मोबाईल हॉस्पिटल/हर्स व्हॅन/डेल्टा व्हॅन/ॲम्ब्युलन्स | ३३ |
डॉग व्हॅन | ९ |
व्ही.व्ही.आय.पी. जामर | ६ |
एकूण | ४,४८९ |