मुंबई : पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता सरकारने हिंदूंना आकर्षित करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यापूर्वी दिघा येथील जगन्नाथ मंदिराचा प्रसाद राज्यभर वाटण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता पूर्व वर्धमान जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेतील प्रकरणही समोर आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शाळेतील मुस्लिम आणि हिंदू विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या माध्यान्न भोजनात भेदभाव केला जायचा. प्रकरण समोर आल्यानंतर हिंदूंमध्ये तणाव निर्माण झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर अखेर २५ वर्ष चालत आलेली प्रथा बंद पाडण्यात आली.
कोलकातापासून साधारण १५० किमी अंतरावर असलेल्या पूर्वस्थली ब्लॉकमधील किशोरीगंज मनमोहनपूर नावाच्या प्राथमिक शाळेतील हा प्रकार आहे. येथे एकूण ७२ विद्यार्थी आहेत, त्यापैकी २९ मुस्लिम आणि ४३ हिंदू मुले आहेत. सन २००० पासून शाळेने माध्यान्न भोजन तयार करण्यासाठी स्वतंत्र स्वयंपाकघर आणि भांडी ठेवली होती. यासोबत दोन स्वयंपाकी देखील होते. मुलांचे जेवण एकाच गॅस कनेक्शनवर शिजवले जात असले तरी, विद्यार्थ्यांना त्यांच्या धर्माच्या आधारावर जेवण दिले जात होते.
ही बाब जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर संबंधित प्रकाराबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले. परिस्थिती हाताळण्यासाठी, मुख्याध्यापकांनी बुधवारी शाळेत दोन तासांहून अधिक काळ बैठक घेण्यात आली, ज्यामध्ये शिक्षक, ग्रामस्थ, पंचायत सदस्य, जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी आणि पोलिस उपस्थित होते. त्यानंतर ही पद्धत आता बंद करण्यात आली आणि दोन्ही स्वयंपाकी मिळून माध्यान्न भोजन तयार करतील असा निर्णय घेण्यात आला.