मुंबई : महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वरळी येथील जाहीर सभेतील कथित भडकाऊ भाषणावरून त्यांच्या विरुद्ध पोलिस महासंचालकांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ॲड. नित्यानंद शर्मा, ॲड. पंकज कुमार मिश्रा आणि ॲड. आशिष राय यांनी संयुक्तपणे ही तक्रार केली असून, राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमान्वये कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, दि. ५ जुलै २०२५ रोजी वरळीडोम येथील सभेत राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरुद्ध आक्रमक आणि द्वेषमूलक विधाने केली, ज्यामुळे राज्यातील सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. त्यांनी भाषणात परप्रांतीयांविरुद्धच्या घटनांचे व्हिडिओ न काढण्याची सूचना केली, जी पुरावे नष्ट करण्यास प्रवृत्त करते आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम १९२, ३५३, ३५१(२), ३५१(३) आणि ६१(२) यांचे उल्लंघन करते. या भाषणानंतर मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीयांवर हल्ले, धमक्या आणि मराठी बोलण्यासाठी जबरदस्ती केल्याच्या अनेक घटना घडल्या, ज्यामुळे सामाजिक तेढ वाढली आहे. तक्रारकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची, मनसे कार्यकर्त्यांच्या कृत्यांची सखोल तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची, तसेच राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांमुळे मुख्य सूत्रधारांवर राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमान्वये कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याशिवाय, सर्व भारतीय नागरिकांचे संवैधानिक हक्क, विशेषतः जीवन, स्वातंत्र्य, समानता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला तातडीने निर्देश द्यावेत आणि अशा विघटनकारी कृत्यांचा राज्य सरकारने स्पष्ट निषेध करून असंवैधानिक प्रवृत्तींना सहानुभूती देणार नाही, असा संदेश द्यावा, असेही तक्रारीत नमूद आहे.