मुंबई, “मार्क्सचा मार्ग हा हिंसेचा आणि अशाश्वत आहे, तर बुद्धाचा मार्ग करुणेचा, लोकशाहीवादी आणि शाश्वत आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व माजी राज्यसभा सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले. ते ८ ऑगस्ट रोजी वनिता समाज सभागृह, शिवाजी पार्क, दादर येथे झालेल्या “बुद्ध की कार्ल मार्क्स” या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथावरील कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि सामाजिक कार्यकर्ते कृपाल कांबळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत डॉ. जाधव यांनी डॉ. आंबेडकरांनी काठमांडू, नेपाळ येथे केलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या आधारे सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, मार्क्सवादाचा पाया हा हिंसेवर आधारित असून, तो समाज परिवर्तनाचा शाश्वत मार्ग ठरू शकत नाही. त्याउलट बुद्धांनी करुणा, लोकशाही आणि अहिंसा यांना केंद्रस्थानी ठेवून मानवतेला सुरक्षित व दीर्घकालीन यशाचा मार्ग दाखविला.
डॉ. आंबेडकरांचे विचार उद्धृत करत डॉ. जाधव म्हणाले, “गौतम बुद्धांनी विरोधकांना जिंकण्यासाठी सत्तेचा दबाव नव्हे, तर प्रेम आणि आपुलकीचा मार्ग स्वीकारला. तत्त्वज्ञान प्रस्थापित करण्यासाठी रक्तपात व हिंसा यांना त्यांनी ठाम नकार दिला. उलट साम्यवाद तात्काळ फलप्राप्ती देत असला तरी त्याचे यश केवळ दिखाऊ स्वरूपाचे असते. बुद्धाचा मार्ग कदाचित धीमा आणि लांब पल्ल्याचा वाटू शकतो, परंतु त्यात सुरक्षितता, स्थैर्य आणि मानवतेची हमी आहे.”
या कार्यशाळेस विविध क्षेत्रातील मान्यवर, संशोधक, विद्यार्थी आणि वाचनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.