हस्तलिखितं जगणारे रवींद्र

    14-Mar-2023   
Total Views |
Ravindra Potdukhe
 
हस्तलिखितं हेच जीवन असणारे आणि आपल्या कलांनाही तेवढाच न्याय देणारे हस्तलिखितसंवर्धन तज्ज्ञ जाणकार रवींद्र पोटदुखे यांच्याविषयी जाणून घेऊया...

हस्तलिखित म्हणजे केवळ ताडपत्रं आणि त्याच्यावरील लेखन नव्हे. कोणतंही हस्तलिखित हे ६० वर्षांनी ‘हस्तलिखित’ म्हणून गणलं जातं. अशा जुन्यापुराण्या हस्तलिखितांचे संवर्धन करण्याचे काम रवींद्र पोटदुखे जवळजवळ १५ वर्षे करत आहेत.वाशिम जिल्ह्यातील वाकद या लहानशा खेड्यात शालेय शिक्षण पूर्ण करून रवींद्र यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथे ‘मेटल वर्क’मध्ये पदवी संपादन केली. शिक्षणाची आस असणार्‍या रवींद्र यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून ‘भारतीय प्राच्यविद्या’ (इंडोलॉजी) मध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली. याच काळात भारती विद्यापीठमधील तत्कालीन प्राध्यापक डॉ. अवधूत अत्रे यांच्यामुळे ‘भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट’चे रजिस्ट्रार डॉ. श्रीनंद बापट यांच्याशी ओळख झाली. हस्तलिखितांसाठी पुठ्ठ्यांचे जे ‘शार्प कटिंग’ करावे लागते, ते रवींद्र यांनी केले होते. ती ‘कटिंग’ करण्याची कला डॉ. बापट यांनी हेरून ठेवली.

एक-दीड वर्षांनी जेव्हा ‘भांडारकर इन्स्टिट्यूट’मध्ये केंद्र सरकारच्या अंतर्गत ‘नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट’ हा प्रकल्प सुरू झाला, तेव्हा डॉ. बापट यांनी रवींद्रना ‘कॉन्झर्व्हेशन असिस्टंट’साठी विचारणा केली. येथून खर्‍या अर्थाने रवी यांचा हस्तलिखितांचा प्रवास सुरू झाला.जवळजवळ ३३ हजार हस्तलिखितांवर काम केलेल्या रवींद्र यांनी ‘एनआरएलसी, लखनौ’ येथून ‘केअर अ‍ॅण्ड मेंटेनन्स ऑफ कल्चरल हेरिटेज’चा कोर्स पूर्ण केला. हस्तलिखितांचे संवर्धन आणि जतन करणे हा रवींद्र यांचा मुख्य अभ्यास विषय. याअंतर्गत त्यांनी ५,५०० हस्तलिखितांचे पूर्ण संवर्धन केले आहे. सहा हजार हस्तलिखितांवर संरक्षणात्मक उपचार केले आहेत. ७०० हून अधिक ताडपत्रांवर त्यांनी उपचार केले असून साडेतीन हजार पोथ्यांकरिता त्यांनी संरक्षणार्थ सुती कापडी पिशव्या तयार केल्या. कापडी पिशव्या तयार करताना त्यासाठीचे कापड, शिवणकाम, कापडाचे हस्तलिखितांवर होणारे परिणाम, बांधणी या सर्वांचा विचार करावा लागतो.

१२५ हून अधिक ताडपत्री हस्तलिखितांकरिता ‘अ‍ॅसिडफ्री बॉक्स’ची निर्मिती केली.
रवींद्र ‘फिजिकल’ आणि ’डिजिटल’ दोन्ही प्रकारे कागदपत्रांचे, तसेच छायाचित्रांचे संवर्धन करतात. सिम्बॉयसिस विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियम आणि मेमोरियल, पुणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. सविता आंबेडकर यांची १०० हून अधिक जुनी पुस्तके त्यांनी संरक्षित केली आहेत. तसेच त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या अभ्यास नोट्सचे जतन केले आहे.सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांच्याकडे असणार्‍या १२,५०० कागदपत्रे ज्यामध्ये नकाशे, फाईल्स, पुस्तके, पत्र या स्वरुपातील हस्तलिखितांचे त्यांनी जतन केले आहे आणि अजूनही ते तिथे कार्यरत आहेत. अहमदनगर येथील गोदडनाथ महाराज संस्थानमध्ये असणार्‍या एक हजार दस्तावेजांचे त्यांनी जतन केले आहे. त्यांनी आजवर काम केलेल्या हस्तलिखितांमधील सर्वात मोठे बाड हे ६३ फुटांचे होते, तर सर्वात लहान हस्तलिखित हे ७ सेमी बाय ९ सेमी एवढे होते.त्यांनी आजवर केलेल्या कार्यातील सर्वात उल्लेखनीय कार्य म्हणजे, आज आपण जे संत ज्ञानेश्वरांचे छायाचित्र पाहतो, ते प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांच्या आश्रमातील अत्यंत जीर्णावस्थेत होते. त्याचे रवींद्र यांनी त्या तैलचित्राचे पुनर्नवीकरण केले आणि ते चित्र आज सर्वत्र वापरले जाते.

बाळाजी बाजीरावांचे पत्र, शहाजानचा फतवा, महात्मा गांधींचे पत्र, लोकमान्य टिळकांचे पत्र अशा विविध ऐतिहासिक वारसा असणार्‍या दस्तावेजांचे संग्रहीकरण, संरक्षण, जतन आणि संवर्धन रवींद्र करतात.२०१० पासून ते कोर्प्स अर्काईव्ह अ‍ॅण्ड म्युझियम, सीएमई पुणे येथे ‘कॉन्झर्व्हेटर’ म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांनी म. गांधी सेवा संघ लायब्ररी वर्धा येथे ‘कॉन्झर्व्हेटर’ म्हणून कार्य केले आहे. तसेच ’भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट’मध्ये ते ‘मॅन्यस्क्रिप्ट कॉन्झर्व्हेटर’ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे आजवर दोन शोधनिबंध बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच त्यांनी ‘प्राचीन जागतिक वैदिक संस्कृती’, ‘साहित्य-सावित्री’,‘धम्मवाक्य’ अशा विविध पुस्तकांकरिता मुखपृष्ठ साकारले आहे. तसेच ’कशीळींरसश खपवळर -ढरालरीं’ या ब्राह्मी लिपीवरील आधारित पुस्तकाकरिता त्यांनी ब्राह्मी लिपी तक्ता साकारला.


त्यांना कलाक्षेत्रातील योगदानाकरिता बक्षिसे आणि पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामध्ये साई चित्रकला महाविद्यालय, पुणे येथे ‘ऑब्जेक्ट’ आणि ‘टूडी डिझाईन’करिता प्रथम क्रमांक त्यांना प्राप्त झालेला. ‘कला अंश ग्रुप, धुळे’ येथे झालेल्या राज्यस्तरीय ‘ग्राफिक्स’ स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांक मिळाला. ‘महाराष्ट्र स्टेट आर्ट एक्झिबिशन, सांगली’ येथे पार पडलेल्या प्रदर्शनात ‘मेटल वर्क्स’ प्रकारात २००१ मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.खरंतर आज हस्तलिखितांचे जतन हा कळीचा मुद्दा आहे. केवळ पैशांचा विचार न करता हस्तलिखितांमधील वारशाच्या जतनाचे महत्त्व ओळखून रवींद्र त्यासाठी कार्यरत आहे. त्यांच्या या कार्याचे हस्तलिखित स्वरुपात जतन होण्याकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा...!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

वसुमती करंदीकर

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात संस्कृतमध्ये पीएच.डी करत आहे. प्राच्यविद्या शास्त्र, संस्कृत वृत्तपत्रविद्या यामध्ये पदविका: ब्राह्मी, मोडी, हस्तलिखितशास्त्र, मायथॉलॉजी यांचे सर्टिफिकेट कोर्स विशेष श्रेणीसह पूर्ण केले आहेत. मुंबई विद्यापीठाचे विद्यापीठ स्तरावरचे बुद्धिबळाचे सुवर्ण तर कथा लेखनाचे रौप्य पदक प्राप्त. आतापर्यंत ८ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.