नुकत्याच संपन्न झालेल्या ‘जागतिक दिव्यांग दिना’निमित्ताने दिव्यांग असल्याचा अजिबात बाऊ न करता, आर्थिक परिस्थितीला तोंड देणार्या दीपक गवारी यांच्या जीवनप्रवासाविषयी...
आपल्या दोन्ही नयनकमलांनी हे सुंदर जग पाहू न शकणार्या दिव्यांगांच्या नशिबी संघर्ष हे तसे पाचवीला पूजलेले. अशा दिव्यांगांना नाही म्हटले तरी जगण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. मात्र, आपल्या दिव्यांगत्वाचा बाऊ न करता, गरिबी असूनही हार न मानणारे दीपक गवारी. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मोगरे गावात त्यांचा जन्म झाला. जन्मतःच दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले दीपक. आज वयवर्षे ३० असलेल्या या युवकाने केवळ शिक्षण आणि संघर्षाच्या बळावर जगण्याची कला अवगत केली आणि स्वावलंबनातून उदरनिर्वाहाचा मार्ग प्रशस्त केला. अंबडच्या ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’मध्ये कंत्राटी पद्धतीवर दीपक सध्या नोकरी करतात. विशेष बाब म्हणजे, घोटी ते नाशिक असा दररोजचा प्रवास बसमधून ते एकट्याने करतात.
दीपक यांचे शालेय शिक्षण नाशिकरोड येथील शासकीय अंध शाळेत झाले. दीपक यांना संगणकदेखील उत्तम प्रकारे हाताळता येत असून, त्यांनी टेलिफोन ऑपरेटरच्या कोर्ससह मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे कोर्सदेखील पूर्ण केले आहेत. याचे सारे श्रेय दीपक त्यांची आई कलाबाई गवारी, मेहुणे रघुनाथ सारुकते व बहीण आशाताई सारुकते यांना देतात. सध्या ते त्यांच्या आईसमवेत घोटी येथे भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत. दीपक यांचे वडील हयात असून, त्यांनी दीपक यांच्या जन्मापूर्वीच पुनर्विवाह केला. पण, त्यांच्या आई अजिबात खचून न जाता, संसाराचा गाडा हाकत, अगदी हलाखीच्या परिस्थितीतही दीपक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. दीपक यांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभे केले. आईला वडिलांची साथ नसल्याने व दीपक हे दृष्टिबाधित असल्याने त्यांच्या आईला खूप संघर्ष करावा लागला. याचे मनस्वी खूप वाईट वाटत असल्याचेही ते सांगतात. पुढील आयुष्यात आईसाठी त्यांना विशेष काही तरी करण्याची प्रचंड इच्छा आहे.
गंगापूर रोड येथील केटीएचएम महाविद्यालयामध्ये दीपक यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. दीपक यांचा अगदी प्रारंभीपासूनच संगीत क्षेत्राकडे अधिक कल होता. त्यांनी संगीत क्षेत्रातच करिअर करायचे, असे ठरवले होते; परंतु आर्थिक आणि शारीरिक परिस्थितीमुळे त्यांना संगीत क्षेत्रात जास्त काही करता आले नाही, याची खंत असल्याचेदेखील ते सांगतात. दीपक यांना गाणे ऐकणे, गाणे म्हणणे, ढोलकी व इतर वाद्य वाजवणे, क्रिकेटचे समालोचन ऐकणे, क्रिकेट खेळणे असे विविध प्रकारचे छंद आहेत. कुठेही जागरण-गोंधळ असो वा कोणत्याही शाळेत समूहगीत कार्यक्रम असो, दृष्टिबाधित असूनही हार्मोनियम, ढोलकी वाजविण्यासाठी दीपक यांना आवर्जून आमंत्रित केले जाते. त्यातून मिळणार्या मानधनातून दीपक हे आपल्या गरजा भागवतात. शालेय जीवनात आईला हातभार लागावा म्हणून रेल्वेत चणे, फुटाणे, बिस्कीटदेखील विकल्याचे ते सांगतात.
”केवळ आईच्या अथक परिश्रमांमुळेच मी अंध असूनदेखील शिकू शकलो आणि केवळ शिक्षणामुळेच मी आज माझे आयुष्य सुकरपणे जगू शकतो,” असे दीपक आवर्जून अधोरेखित करतात. दीपक हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ मानले जाणार्या नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील वणी येथील श्री सप्तश्रृंग गडावर आतापर्यंत ४० वेळा चढून गेले आहेत. तसेच महाराष्ट्रातील सर्वांत उंच कळसूबाई शिखर हे जवळ-जवळ १०० वेळेस उत्तम प्रकारे त्यांनी सर केले आहे.
“युवकांनी कुठल्याही परिस्थितीत हार न मानता, न डगमगता आपले प्रामाणिक प्रयत्न सुरु ठेवायला हवे. आपल्याकडे जे नाही, त्याचा बाऊ न करता आपल्याकडे जे आहे, त्याचा सदुपयोग करून परिस्थितीवर कशी मात करता येईल, याकडे लक्ष केंद्रित करायला हवे व एक एक पावलाने प्रगती केली पाहिजे. आपल्या प्रयत्नांना नक्कीच कुठे ना कुठे फळ मिळते,” असे आत्मविश्वासाने सांगत ते युवकांना मोलाचा सल्ला देतात. परमेश्वराने जे काही त्यांच्या आयुष्यात वाढून ठेवलं आहे, त्याबद्दल त्याची काहीच तक्रार नाही. नशिबाने आणि कष्टाने जे काही मिळालं आहे, त्यात ते समाधानी असून त्यांच्यासारख्या दृष्टिबाधितांसाठी काही तरी कार्य करण्याची त्याची मनस्वी इच्छा आहे. “स्वतः जवळ नसलेल्या गोष्टीचा बाऊ न करता संघर्षमय जीवनाची वाटचाल सुरू आहे व यापुढे ही येणार्या परिस्थितीला तोंड देण्याची शक्ती आहे. निसर्गाने प्रत्येकाला एक सुंदर आयुष्य दिले आहे.
परमेश्वराचे आभार मानून प्रत्येकाने मानव जीवन हे सत्कर्मी लावायला हवे. आपण समाजाचे देणे लागत असून, परोपकारी भावनेने कार्य करत राहिले पाहिजे. तसेच गरजूंना शक्य तेवढी उमेद अन् साथ देऊन त्यांचा जीवनाप्रति आदरभाव बाळगायला हवा,” असा संदेशही द्यायला दीपक अजिबात विसरत नाहीत. दीपक गवारी यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे हार्दिक शुभेच्छा!
गौरव परदेशी