
नाशिककरांसाठी बिबट्या काही नवीन नाही. शहरात दिवसाआड बिबट्या कुठे ना, कुठे दिसतोच. धार्मिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक, द्राक्ष पंढरी अशी ओळख असलेल्या नाशिकची आता ’बिबट्यांचे शहर’ म्हणून ओळख होऊ लागली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. नागरी वसाहतीत बिबट्या शिरल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली राहत आहेत. शहरात बिबट्या दोन ते तीनच्या संख्येने मुक्त संचार करताना दिसत असल्याने नागरिक सकाळी, संध्याकाळी घराबाहेर पडणे टाळत आहेत; दरम्यान चुकीचे छायाचित्र, चित्रफिती सोशल मीडियावरून व्हायरल होत असल्याने, वन विभागासह रहिवाशांच्याही नाकीनऊ आले आहे. शुक्रवारी शहरातील सावतानगर व गोविंदनगर या ठिकाणी दोन बिबट्यांचा थरार रंगला. पहिला बिबट्या हा सावतानगर परिसरातील विठ्ठल मंदिराजवळ दिसला, तर दुसरा बिबट्या अशोक प्राईड बिल्डिंग, गोविंदनगर येथे आढळून आला. वन विभागाच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही नर बिबट्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मानवी वस्तीत बिबट्या आला की, त्याला पकडायचे आणि जंगलात सोडून द्यायचे. एवढाच काय तो सोपस्कार वन विभागाकडून सुरू आहे. परंतु, यामुळे बिबट्यांचा प्रश्न तात्पुरता सुटत असला तरी कायमस्वरुपी उपायांचे काय? वन विभागाच्या बचाव पथकाचा पुरुषार्थ दाखवून, खरे तर हा प्रश्न गंभीरच होत आहे. शुक्रवारच्या घटनेनंतरही तोच कित्ता गिरविला जात आहे. पण, याने कायमस्वरुपी प्रश्न सुटणार आहे का? जिल्ह्यात ठिकठिकाणी बिबट्यांच्या रुपाने मानव-वन्यप्राणी टोकाचे संघर्ष निर्माण झाले आहे. त्याचे काय? ‘मार्जार’ कुळातील प्राणी असलेल्या बिबट्याच्या अस्तित्वाचा मुद्दा अद्याप गांभीर्याने घेण्यात आलेला नाही. बिबट्याच्या दहशतीने परिसरात येण्या-जाण्याचे कमी केले. यामुळे या ठिकाणावरील दैनंदिन जीवनमानावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अनेक नागरिक परिसरात बिबट्या फिरत असल्याच्या संभ्रमात दिसून येतात, तर अनेक नागरिक बिबट्यांवरच प्रश्न उपस्थितीत करत आहेत. एकूणच काय तर ’बिबट्या आणि मानव’ या संघर्षावर ठोस उपाययोजना करून नागरिकांमध्ये जनजागृतीद्वारे उपाययोजना आखत, हा संघर्ष कसा कमी करता येईल, याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.
नाशिक जिल्ह्यात पेठ, सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या मोठी आहे. जिल्हा परिषदेने ‘कुपोषणमुक्ती’चा संकल्प केला आहे. या पार्श्वभूमीवर सुरगाणा येथील नूतन महाविद्यालयात नुकतेच कुपोषणग्रस्त बालक व पालक यांचा ’किलबिल मेळावा’ घेण्यात आला. कार्यक्रमात सुरगाणा तालुका कुपोषणमुक्त करण्याचा पुनरुच्चार जि. प. सीईओ आशिमा मित्तल यांनी केला. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातर्फे कुपोषणमुक्तीसाठी विविध उपक्रम सुरू आहेत. कुपोषण टाळण्यासाठी केंद्र, राज्य शासनाबरोबरच जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरांवर प्रचार अन् प्रसार सुरू आहे, तर सीईओ मित्तल या कुपोषणमुक्तीसाठी मुंबईतील ’आयआयटी’च्या सहकार्याने स्तुत्य उपक्रम राबवत आहे. कुपोषण रोखण्यासाठी स्थलांतर टाळणे आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे हे दोन सर्वोत्तम उपाय असल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे. त्यात शिक्षणाचा अभाव असल्याचे दिसून येते. परंतु, दशकभरापासून आदिवासीबहुल तालुक्यांत शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे, तर जलसिंचन प्रकल्पांना गती दिल्यास स्थलांतर रोखता येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या ’मिशन भगीरथ’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमास चागंला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आदिवासीबहुल भागात आता बारमाही पिके आणि भाजीपालादेखील करता येणार आहे. परिणामी, राज्यातील विविध भागांत मजुरांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी मोठी मदत होईल. मेळाव्यात सीईओ मित्तल आणि तज्ज्ञांनी ’प्रथिनेयुक्त आहार, कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी बालकांची कशाप्रकारे काळजी घ्यावी’ याविषयी उपयुक्त असे मार्गदर्शन केले. ’पोषण दिंडी’, कडधान्य, तृणधान्य, पालेभाज्या, फळभाज्या, पाककृती प्रदर्शन, बाळ कोपरा, स्तनपान प्रशिक्षण, आहार, आरोग्य व पोषण यांबाबत समुपदेशन करण्यात आले. परंतु, त्यानंतर आता या सर्व बाबी प्रत्यक्षात कृतीत आणणेदेखील महत्त्वाचे असून, त्यादृष्टीने शासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे. आरोग्य विभागामार्फत मेळाव्यामध्ये सर्व बालके, स्तनदा माता व पालक यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कुटुंब नियोजन याबद्दल समुपदेशन करण्यात आले. अशा प्रकारच्या मेळाव्यामध्ये सातत्य ठेवण्याची अपेक्षादेखील ग्रामस्थांनी व्यक्त केली.
गौरव परदेशी