“चहा विकणारा देशाचा पंतप्रधान आणि कॅन्टीन चालवणारा राज्यपाल झाला, असे आचार्य म्हणत असत. आचार्य माझे जीवश्चकंठश्च मित्रच नव्हे, तर तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शकदेखील होते. माझ्या आयुष्यात त्यांचा प्रवेश झाला, तो त्यांच्या अंतापर्यंत टिकून होता. मला ते कशापेक्षाही श्रेष्ठच होते. संघ विचार, राष्ट्र प्रथम हा बोलण्याचा नाही, तर आचरणात आणायचा विषय आहे, याचा परिपाठ त्यांच्या माध्यमातून मला आयुष्यभरात उपयोगात आला. संघ जीवनात उतरवण्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतात. ते सोपे काम नाही. ते केले की पद्मनाभ आचार्यांना श्रद्धांजली वाहिल्यासारखेच आहे,” असे सांगून पद्मनाभ आचार्य यांच्याशी घनिष्ठ स्नेह असलेल्या नाशिकच्या राजाभाऊ मोगल यांनी आचार्य यांच्या स्मृतींना या लेखातून दिलेला हा उजाळा...
नुकतेच नागाभूमीचे माजी राज्यपाल पद्मनाभ बाळकृष्ण आचार्य यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने मी माझा अगदी जीवश्चकंठश्च मित्र गमावला. “चहा विकणारा देशाचा पंतप्रधान आणि कॅन्टीन चालवणारा राज्यपाल झाला,” असे आचार्य म्हणत असत. आचार्य माझे जीवश्चकंठश्च मित्रच नव्हे, तर तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शकदेखील होते. माझ्या आयुष्यात त्यांचा प्रवेश झाला, तो त्यांच्या अंतापर्यंत टिकून होता. मला ते कशापेक्षाही श्रेष्ठच होते.
डिसेंबर, १९६० साली जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रथम वर्षाला मी प्रवेश घेतला. मी आणि पद्मनाभ आचार्य दोघेही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत असल्याने पुढे ओळखीचे रुपांतर घनिष्ठ मैत्रीत होत गेले. अरूण साठे विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून आसामला कार्य करण्यासाठी गेले. त्यांच्यामुळेच पद्मनाभ आचार्य यांच्याशी माझी ओळख झाली. आचार्य, दिलीप परांजपे, अरविंद वैशंपायन, अरूण साठे, सुरेश साठे आणि मी असा आमचा ग्रुप तयार झाला होता. आचार्य उडुपी येथील कार्यकर्ते होते. मुंबईत आल्यानंतर त्यांनी मिलमध्ये काम केले. रात्रशाळेत जाऊन जे. जे.मध्ये प्रवेश घेतला. चरितार्थासाठी १९५९ साली रुपारेल कॉलेजचे कॅन्टीन चालवायला घेतले. याच ठिकाणी अभाविपच्या अनेक बैठका व आंदोलनांची रूपरेषा ठरवली जायची. त्यांनी पत्रकारितेचेही शिक्षण घेतले होते. आचार्य यांच्या पहिल्या कार्यालयातील इंटेरिअरचे काम मीच केले होते. त्यांच्या डोक्यात विलक्षण कल्पना होत्या. त्यामुळे अनेक उपक्रम ते राबवत असत. स्वा. सावरकर, वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयी फारशी माहिती लोकांना नव्हती. त्यामुळे ‘द मेन व्हू इन्स्पायर अस’ या मोहिमेअंतर्गत मी आणि आचार्यांनी राष्ट्रपुरुषांची छायाचित्रे विविध महाविद्यालयांमध्ये लावण्याचा उपक्रम हाती घेतला. माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासोबतही पुढे काम करण्याचा योग आला. अभाविपचे काम करत असताना आपल्या संघटनेत विद्यार्थिनी का नाही, असा प्रश्न समोर आला. त्यामुळे आचार्य, दिलीप परांजपे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या बहिणींना विद्यार्थी परिषदेच्या कामासोबत जोडून घेतले. हळूहळू शेकडो महिला परिषदेसोबत जोडल्या गेल्या.
१९६४ साली मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुंबई शाखेचा मंत्री होतो. याच साली नाशिक येथील रुंग्टा हायस्कूलमध्ये तीन दिवसीय पश्चिमांचल अधिवेशन पार पडले. यावेळी पद्मनाभ आचार्य, बाळ आपटे, मधु गुजराथी, यशवंतराव केळकर हेदेखील नाशिकला आले होते. त्यावेळी सर्वांची व्यवस्था शाळेच्या वर्गांमध्येच करण्यात आली होती. १९६६ साली आचार्य आणि दिलीप परांजपे पूर्वोत्तर भागातील समस्या समजून घेण्यासाठी गेले. तेथील लोक त्यांना ‘यु इंडियन्स’ म्हणून हाक मारत. त्यामुळे पूर्वोत्तर भागाला राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी ‘माय होम इज इंडिया’ अंतर्गत पुढे ४० मुलं आचार्यांनी मुंबईत आणली आणि ४० जणांना प्रत्येक मुलाची जबाबदारी सोपवली होती. यातील अनेक मुलं पुढे यशस्वी झाल्यानंतर आपापल्या राज्यातही परतली. आचार्य २०१४ साली राज्यपाल झाल्यानंतर तेथील अनेकांनी ‘आम्ही तुमच्याच मार्गदर्शनाखाली तयार झालो,’ अशी पोचपावतीही दिली. ‘स्टुडंट एक्सपिरीयन्स इन इंटरेस्टेड लिविंग’ हा उपक्रमही त्यांनी राबविला. ‘इंडियन नॅशनल फेलोशिप सेंटर’ची सुरूवातही केली.
१९६३ साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अधिवेशन दिल्लीतील बिर्ला मंदिरात होते. मला जाणे शक्य नसल्याने मी जाणार्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी मला त्यांनी त्यांच्यासोबत आहे, त्या अवस्थेत दिल्लीला अधिवेशनाला नेले. तिथे मी आठ दिवस अधिवेशनाला होतो. खिशात फक्त एक रूपयाची नोट होती. मात्र, सोबतच्या कार्यकर्त्यांमुळे ती खर्च करण्याचीही वेळ आली नाही. ही नोट आजपर्यंत मी जपून ठेवली आहे. या अधिवेशनातून मला बर्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. पुढे १९६६ नंतर मी जनसंघाचे काम सुरू केले.
दि. ११ जुलै, १९६७ साली पद्मनाभ आचार्यांच्या विवाहाला आम्ही सर्वजण मुंबईहून गाडी करून उडुपीला गेलो होतो. त्यानंतर दि. २२ जून, १९६९ साली माझा मित्र अरविंद वैशंपायन याच्या लग्नात जवळपास ६० ते ७० कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कल्याण येथे उच्चविद्या विद्यार्थी संघ चालविणार्या निशिगंधा या कार्यकर्तीसोबत आचार्यांनी ओळख करून दिली. नुसती ओळख नाही, तर तिथेच समोरासमोर लग्नाची बोलणी करून घेतली. अशाप्रकारे निशिगंधा आणि माझे लग्नही त्यांनीच निश्चित केले. त्यानंतर दि. २० जुलै, १९६९ साली दिलीप परांजपेचे लग्न झाले आणि लगेचच दुसर्या दिवशी म्हणजे दि. २१ जुलै, १९६९ ला निशिगंधा आणि माझा विवाह सोहळा पार पडला. यावेळी आचार्यांसह रा. स्व. संघ आणि अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दर दीड-दोन महिन्यांनी आचार्य आणि आम्ही सर्व मित्रगण खार जिमखान्यात एकत्र भेटायचो. सुरेश साठे यांनी मेसेज केला की, सर्वांनी एकत्रित येणे हा अलिखित नियमच होता. माजी आमदार मधु देवळेकर आणि आम्ही सर्व मित्रगण यावेळी गप्पागोष्टी, विचारपूस आणि अनेक विषयांवर चर्चा करायचो. त्यामुळे आमची मैत्री आणखी ताजीतवानी व्हायची. नंतर सत्तरच्या दशकात नाशिकला स्थायिक झालो, तरीही फोर्ट येथे माझे कार्यालय असल्याने २००० सालापर्यंत माझे मुंबईला येणे-जाणे सुरूच असायचे. ज्यावेळी एखाद्या कार्यक्रमासाठी वा उपक्रमासाठी माझी आवश्यकता भासेल, तेव्हा आचार्य मला आवर्जून बोलवून घेत असत.
समृद्ध आणि पुष्कराज या माझ्या दोन्ही मुलांच्या मुंजे कार्यक्रमालाही आचार्य सपत्नीक आले होते. १९९०च्या दरम्यान ते मित्रांसह माझ्या घरी आले होते. रामभाऊ मंत्री यांच्या अर्धपुतळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमातही त्यांची भेट झाली.
२०१४ नंतर मणिपूर वगळता पूर्वोत्तर राज्ये शांत होती. आपण प्रथम भारतीय आहोत, ही भावना तिथे रूजवण्यात आचार्य यशस्वी झाले. राजभवनातील सर्व कंत्राटी कर्मचार्यांना त्यांनी नोकरीत कायम केले. स्वयंपाकघरातही त्यांचे विशेष लक्ष असे. नागाभूमीचे राज्यपाल असताना २०१५ साली ते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकला आले होते. तीन दिवस ते गेस्ट हाऊसला होते. त्र्यंबकेश्वरलाही त्यांनी भेट दिली. नागाभूमीचे राज्यपाल असल्याने त्यांनी कुंभमेळ्यातील नागासाधू कोण आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी नागा साधूंच्या प्रमुखांची भेट घेतली. त्यावेळी मीदेखील त्यांच्यासोबत होतो. नागा साधू येतात, त्यांचे फोटो काढले जातात, एवढ्याच गोष्टीसाठी माध्यमांमध्ये त्यांची चर्चा होते. मात्र, खर्या अर्थाने त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि त्यांची जीवनशैली जाणून घेण्यासाठी आचार्य व मी नागा साधूंना भेटलो होतो.
पहाटे २ वाजता ते रामकुंडावर स्नानाकरिता गेले होते. त्यावेळी माझा मुलगा समृद्ध हादेखील त्यांच्यासोबत होता. बालाजी मंदिरामध्येही आचार्य आले होते. ते हाडाचे कार्यकर्ते होते. कुंभमेळ्यानंतर भेट भले झाली नसेल. मात्र, दूरध्वनीद्वारे आम्ही नेहमी संपर्कात होतो. फोनवर बोलताना विषय कधीही घरगुती नसायचा. नेहमीच सामाजिक विषयांवर आमची चर्चा व्हायची. शेवटचं बोलण झालं, तेव्हा आमची मणिपूर विषयावर चर्चा झाली होती. तेव्हा आपण काम करत असताना इतके शांत असलेले मणिपूर नंतर इतके कसे पेटले, असा प्रश्न विचारल्यानंतर यामागे ड्रग्ज माफिया असल्याचे त्यांनी सांगितले होते. राज्यपाल झाल्यानंतर त्यांच्या शपथविधीला जाणे शक्य झाले नाही. मात्र, अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल असताना मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला मला त्यांनी बोलावले होते. त्यावेळी मी चार दिवस नागाभूमीला होतो.
दि. १० सप्टेंबरला आचार्य अत्यंत आजारी असल्याचा निरोप आला आणि मी व निशिगंधा तातडीने टॅक्सी करून अंधेरीतील घरी भेटण्यासाठी गेलो. यावेळी मृत्यूपंथावर असतानाही आचार्यांनी मित्रमंडळी, अभाविप, रा. स्व. संघ आणि सामाजिक विषयांवर चर्चा आणि विचारपूस केली. आचार्य आणि माझे ऋणानुबंध शेवटपर्यंत घट्ट होते. संघ विचार, राष्ट्र प्रथम हा बोलण्याचा नाही, तर आचरणात आणण्याचा विषय आहे. याचा परिपाठ त्यांच्या माध्यमातून मला आयुष्यभरात उपयोगात आला. रा. स्व. संघ जीवनात उतरवण्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतात. ते सोपे काम नाही. ते केले की पद्मनाभ आचार्य यांना श्रद्धांजली वाहिल्यासारखेच आहे.
पद्मनाभ आचार्य यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजताच राजाभाऊ मोगल आणि त्यांच्या पत्नी निशिगंधा मोगल यांनी दि. १० सप्टेंबर रोजी आचार्य यांची अंधेरी येथील निवासस्थानी भेट घेतली होती.
राजाभाऊ मोगल
(लेखक रा. स्व. संघाचे माजी नाशिक विभाग सहकार्यवाह आणि ’शंकराचार्य न्यासा’चे माजी अध्यक्ष आहेत.)
शब्दांकन ः पवन बोरस्ते (७०५८५८९७६७)