राऊत आले हो...

    09-Nov-2022   
Total Views |
RAUT

संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जामीन मिळाला आणि अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये एकच जल्लोषाचे वातावरण उफाळून आले. काहींनी तर चक्क फटाके फोडून, मिठाई वाटून वाजगाजत आनंद साजरा केल्याची दृश्ये आपण वृत्तवाहिन्यांवर पाहिलीच. त्यामुळे हल्ली जामिनावर उजळमाथ्याने बाहेर पडणार्‍यांचेही असेच भव्य-दिव्य रॅल्या काढत स्वागत होत असेल, तर महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कुणीकडे जातेय, त्याचा अंदाज यावा. कारण, गुंड-मवाली, तुरुंगात खितपत पडून शिक्षा भोगलेल्यांनी बाहेर येताच, बेटकुळ्या फुगवणे हे तर उत्तर प्रदेश-बिहारचे चित्र.
 
परंतु, गेल्या काही वर्षांत तपास यंत्रणांकडून चौकशीसाठी बोलवणे असो, अटक असो किंवा अशी जामिनावर सुटका, त्यातही एक प्रकारचे ओंगळवाणे शक्तिप्रदर्शन महाराष्ट्राला पाहायला मिळाले. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील तुरुंगवास, चौकशा भोगून आलेली व्यक्ती जशी ‘हिरो’ होऊ शकते, तर मग आपणही का मागे राहा, असा विचार उद्या इतर जामिनावर सुटलेल्या कैद्यांनी करुन अशा रॅल्या, मोर्च्या काढले तर कदापि आश्चर्य वाटायला नको.


गेले १०० दिवस तुलनेने शांत असलेल्या वृत्तवाहिन्यांना आता राऊतांच्या नावाने त्यांचा कैवारीही पुन्हा मिळाला. त्यामुळे सकाळी ९च्या ठोक्याला राऊत बोलणार आणि त्यावर रात्री ९ वाजेपर्यंत आता आरोप-प्रत्यारोपांच्या राजकीय मालिकेचे चर्वितचर्वण रंगणार. खोके-बोके, गद्दार म्हणून हिणवणारे नाट्य कमी होते की काय, म्हणून आता त्यातच राऊतांच्या अरेरावीची पडलेली भरही महाराष्ट्राला पुन्हा ‘ब्रेकिंग न्यूज’च्या नावाखाली पचवावी लागेल, हे आपलेच दुर्दैव! 
 
संजय राऊतही म्हणा एकदम ‘टायमिंग’ साधून सुटले म्हणायचे. कारण, त्यांचे दिल्लीतील दोस्त आणि काँग्रेसचे युवराज राहुल गांधी अनायसे ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत आहेत. तेव्हा, राऊतांची पावले आता अवघ्या काही दिवसांत या यात्रेकडेही आपसुकच वळतीलच! म्हणजे एकीकडे ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणी जामिनावर बाहेर असलेले राहुल गांधी आणि दुसरीकडे आताच सुटलेले संजय राऊत, हातात हात घालून गांधीगिरीचे जनतेला फुकटचे डोस पाजणार. असे हे आजच्या भ्रष्ट राजकारण्यांच्या उद्दातीकरणाचे निलाजरे चित्र पाहिले की, ‘तरुणाईने राजकारणात यावे’ म्हणणार्‍यांनी आपण त्यांच्यासमोर कोणता आदर्श समोर ठेवतोय, तेही तपासावे.


ही तीच का शिवसेना?


संजय राऊत तुरुंगात गेले तेव्हाची शिवसेना आणि राऊत तुरुंगातून जामिनावर बाहेर आले, ती शिवसेना यातही म्हणा जमीन-आसमानाची तफावत. कारण, संजय राऊत तुरुंगात गेले तेव्हा माध्यमांमध्ये ठाकरे गटाचा किल्ला कोण कट्टर शिवसैनिक लढविणार म्हणून काही नावे समोर आलीसुद्धा. पण, वर्षानुवर्षे शिवसेनेमध्ये हयात घालवलेल्यांपैकी सगळे कडवे शिवसैनिक एकनाथ शिंदेंच्या गोटात गेल्याने ठाकरेंना मात्र यासाठीही ‘आऊटसोर्सिंग’ करावे लागले. म्हणूनच मग सुषमा अंधारेंसारख्या हिंदुत्वाची खिल्ली उडवणार्‍यांपासून ते कम्युनिस्टांपर्यंत ठाकरेंनी जो येईल, जसा येईल, जेवढ्यांना सोबत म्हणून घेऊन येईल, त्यांची अक्षरश: खोगीरभरती केली. त्यामुळे शिंदेंच्या बंडानंतरही निष्ठेपोटी ठाकरेसोबत राहिलेले शिवसैनिकही दुखावले. तसेच आधी शिवसेनेचा चेहरा असलेले नेतेही या शर्यतीत मागेच राहिले. 
सुषमा अंधारेंना तर महाप्रबोधन यात्रेसाठी ठाकरे पितापुत्र राज्यभर फिरवत आहेत. म्हणजे जी धुरा संजय राऊतांच्या खांद्यावर होती, ती यादरम्यान अंधारेंच्या अंगावर टाकण्यात आली. त्यामुळे शिवसेनेतील अरविंद सावंत, अनिल देसाई, नीलम गोर्‍हे यांसारखी अन्य ज्येष्ठ नेतेमंडळी दुर्लक्षितच राहिली. पण, आता संजय राऊत पुन्हा सक्रिय होणार असल्यामुळे सुषमा अंधारे आणि त्यांच्यासारख्या आयात केलेल्या काही महिन्यांच्या शिवसैनिकांचे काय होणार, हा प्रश्न मात्र नेतृत्वासमोर उपस्थित होणे साहजिकच.त्यामुळे राऊतांनाही तुरुंगातून बाहेर आल्यावर, आपण मागे सोडून गेलो होतो ही तीच शिवसेना आहे ना, असा प्रश्न पडला नाही म्हणजे मिळवले. कारण, ठाकरेंच्या शिवसेनेेचा चेहरामोहरा आता पूर्णपणे बदलला आहे. हिंदुत्वद्वेष्ट्यांना आणि वाचाळवीरांनाच इथे पहिल्या पायरीवर उभे केले जाते. ठाकरे कुटुंबाची तळी उचलणारे आणि माध्यमांमध्ये त्यांचे उच्चरवाने गोडवे गाता येतील, हाच सध्या तिथे प्रवक्ते आणि नेते होण्यासाठीचा एकमेव निकष. त्यामुळे शिवसेनेत तुम्ही किती हयात घालविली, किती रक्ताचे पाणी केले, बाळासाहेबांशी तुमचे संबंध किती जिव्हाळ्याचे वगैरे होते, हे मुद्दे गौण ठरावेत. त्यामुळे राऊतांची खुर्ची भर सभेत रिकाम्या ठेवणार्‍या ठाकरेंकडून राऊतांना पूर्वीसारखाच मान-सन्मान बहाल केला जाईल की, १०० दिवसांच्या शिवसैनिकांशी राऊतांचाच ‘सामना’ रंगेल, ते पाहायचे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची