आलिया भोगासी असावे सादर...

    28-Jun-2021
Total Views | 143

LIFE_1  H x W:
 
आयुष्य आपल्याला आश्चर्यचकित करण्याचे अनेक मार्ग शोधत असते. यामुळे ‘आलिया भोगासी असावे सादर’ या उक्तीप्रमाणे आयुष्याला ते जसे त्पहरी आहे, अकल्पित आहे, तसे स्वीकारल्यास आपण तरी तयार राहू, येणार्‍या कुठल्याही परिस्थितीशी दोन होत करायला.
 
 
आपल्या आयुष्यात आपण सगळेच कधी ना कधी अनिश्चिततेच्या अनुभवातून जात असतो. कधी तो निसर्गाचा कहर असेल, तर कधी तो जागतिक आर्थिक मंदीचा क्रूर फटका असेल. पण, सर्वात महत्त्वाचा आणि आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अनिश्चितता आणणारा प्रसंग असतो तो म्हणजे, आपल्या दुसर्‍यांशी होणार्‍या विचारांची वा कृतीची अदलाबदल वा संवाद. तो आपल्या परिचितांशी असला तरी किंवा अनोळखी माणसांशी असला तरी अनेक अज्ञात गोष्टी त्यात आढळतात. आपण स्वतःला कसं व्यक्त करायचं, दुसर्‍यावर किती विश्वास ठेवायचा, एखादी व्यक्ती नक्की भरवशाची आहे का? आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आपण एखाद्या धोकादायक प्रसंगात भाग घ्यायचा का? एखाद्याला खरचं मदत करायची का? असे नानाविध प्रश्न आपल्या मनात रुंजी घालत असतात. यातून आपल्या मनात साचत जाणारी माहिती काही महत्त्वाच्या कयासावर अवलंबून असते. म्हणूनच एक सामाजिक प्राणी म्हणून आपल्या विधायकतेसाठी, कल्याणासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या या जगातल्या टिकावासाठी आपल्याला सातत्याने या अनिश्चिततेचा अंदाज घ्यावा लागतो. तो कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आतापर्यंतच्या मानसिक आणि सामाजिक संशोधनातून सामाजिक वातावरणात असलेली अनिश्चितता वा अस्थिरता प्रतिकूल आणि व्यापक मानली गेली आहे. या सर्व गोष्टींत आपला मेंदू ज्या पद्धतीने आपल्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे अस्थिरता आणि त्यामुळे असलेला धोका कशाप्रकारे ओळखतो, हे महत्त्वाचे ठरते.
 
 
 
जेव्हा आपण दुसर्‍या व्यक्तीबरोबर संवाद साधत असतो, तेव्हा आपल्या मनात या व्यक्ती कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, त्यांच्या मनात काय आहे इत्यादी गोष्टींबद्दल आपण अनभिज्ञ तरी असतो किंवा आपल्याला त्यांच्याबद्दल पुरेशी खात्री नसते. त्यामुळे ते पुढच्या पायरीवर नक्की काय करणार आहेत, याबद्दल साशंकता असते. उदाहरणार्थ - एखादी व्यक्ती जेव्हा नोकरीनिमित्त मुलाखतीला जाते, तेव्हा त्यांच्या मनात मुलाखत घेणार्‍या व्यक्तीबदल, कंपनीच्या ‘फिलॉसॉफी’बद्दल आणि संस्कृतीबद्दल अनेक प्रश्न असतात. म्हणून त्या मुलाखतीत आपण नक्की कसे वागायचे, काय बोलायचे, याबद्दल अत्यंत सक्षम आणि ज्ञान असलेल्या व्यक्तीसुद्धा गोंधळलेल्या असतात. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने ही अस्थिरता कशी कमी करता येईल, याचा अभ्यास करीत असते. आपल्यापैकी प्रत्येकाची अस्थिर परिस्थिती सहन करायची क्षमता भिन्न असते. काही लोकांना अस्थैर्यातील आव्हान स्वीकारायला आवडतं, तर बर्‍याच जणांना या अस्थैर्यातील स्वैरपणा कठीण वाटतो. तथापि आपल्या सगळ्यांचीच मर्यादा असते, पण एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की, कुठल्याही डळमळीत परिस्थितीत आपण कितीही असाहाय्य आणि हताश असतो, तरी अनियंत्रित वातावरणाला सामोरे जाण्यासाठी काही गोष्टी करु शकतो. आपली विवंचना कमी करू शकतो, अज्ञाताला आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकतो.
 
 
 
आपल्याला जरी पटले नाही, तरी अस्थिर आयुष्य नैसर्गिक आणि अपरिहार्य आहे. ‘कोविड’ काळात आपण मोठ्या कष्टाने हा धडा शिकलो आहोत. आपल्या जीवनातल्या फार कमी गोष्टी पूर्णपणे निश्चित आहेत. आपण बर्‍याच गोष्टी थोड्याफार प्रयत्नांनी नियंत्रित करतो खर्‍या, पण आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नाही, हे त्रिवार सत्य आहे. या अस्थिरतेबद्दल अतिचिंता करण्याने काहीही हाशिल होणार नाही. आपल्याला असं वाटतं की, थोडी चिंता केली की, आपल्याला मार्ग सापडेल. आपण अत्यंत कठोर परिस्थितीचा सामना करू, पण दुर्दैवाने यात तथ्य नाही. पण, काही गोष्टी ध्यान देऊन केल्याने नक्कीच मार्ग सापडू शकतो. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहे, त्यांना नियंत्रित करावं. आपलं लक्ष या गोष्टींकडे केंद्रित केल्याने काही उत्तरं सापडतीलच, पण सगळ्यात महत्त्वाची आणि कौशल्यपूर्ण गोष्ट म्हणजे, आपल्या आपल्या आयुष्यात स्थैर्य असायलाच पाहिजे, या सिद्धांताला आव्हान द्यायला, या पृथ्वीतलावरील माणसं म्हणजे परमेश्वर नाहीत. आपल्यापैकी कोणी आपल्या आयुष्यभराच्या आरोग्याची वा सुखाची खात्री देऊ शकतो का? नक्कीच नाही. पुढच्या २४ तासांत आपल्या ताटात काय वाढून ठेवले आहे, याचीसुद्धा आपल्याला शाश्वती नाही. आपण पैसाअडका साठवतो, धान्य साठवतो, पण या सगळ्यांचा कधीकधी काहीच उपयोग होत नाही. आयुष्य आपल्याला आश्चर्यचकित करण्याचे अनेक मार्ग शोधत असते. यामुळे ‘आलिया भोगासी असावे सादर’ या उक्तीप्रमाणे आयुष्याला ते जसे त्पहरी आहे, अकल्पित आहे, तसे स्वीकारल्यास आपण तरी तयार राहू, येणार्‍या कुठल्याही परिस्थितीशी दोन होत करायला. आखिर जिंदगी इत्त्किफाक हैं!
 

- डॉ. शुभांगी पारकर
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121