एकजुटीने उभे राहण्याची ही वेळ – सद्गुरू जग्गी वासुदेव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-May-2021
Total Views |
pu_1  H x W: 0


‘हम जितेंगे – पॉझिटीव्हीटी अनलिमेटेड’ व्याख्यानमालेस प्रारंभ
 
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : भय, नैराश्य, क्रोध यांना विसरून एकजुटीने उभे राहण्याची आणि करोना संकटाचा सामना करण्याची ही वेळ आहे, असे प्रतिपादन अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांनी ‘हम जितेंगे – पॉझिटीव्हीटी अनलिमिटेड’ या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रात मंगळवारी केले.
 
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने कोव्हिड रिस्पॉन्स टीम, धार्मिक आणि सामाजिक संघटना व सर्वसामान्य नागरिकांनी हम जितेंगे – पॉझिटीव्हीटी अनलिमिटेड या विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. करोना काळातस मनातील नकारात्मकता दूर व्हावी, या हेतूने ही व्याख्यानमाला आहे. व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी सद्गुरू जग्गी वासुदेव आणि जैन मुनीश्री प्रमाणासागर यांनी संबोधित केले. व्याख्यानमालेचा समारोप १५ मे रोजी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या संबोधनाने होणार आहे.
 
 
 
यावेळी जग्गी वासुदेव म्हणाले, भय, नैराश्य, क्रोध यापैकी एकही गोष्ट मानवाची मदत करू शकत नाही. त्यामुळे मनात सकारात्मक विचार ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे. दुसऱ्यांना दोष देण्याची ही वेळ नसून राष्ट्र तसेच समाजाच्या रूपात एकजुटीने उभे राहण्याची सध्याची वेळ आहे. करोना संकट मोठे असले तरी रोजचे व्यवहार पूर्णपणे बंद करणे परवडणारे नाही. कारण तो काही या संकटापासून वाचण्याचा उपाय नाही. कारण तसे केल्यास देशावर आणि समाजावरर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल. त्यामुळे परस्परांच्या संपर्कात न येता आणि बाधित न होता आपापले काम सुरू ठेवणे ही सध्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, असेही जग्गी वासुदेव यांनी नमूद केले.
 
 
 
जैन मुनीश्री प्रमाणासागर म्हणाले, सध्या करोनाने बाधित झालेल्या आणि उपचार घेणाऱ्यांनी आपल्या मनात सकारात्मक विचार आणणे महत्वाचे आहे. करोनाचा संसर्ग झाला म्हणजे मृत्यूच येईल, असे अजिबात नाही. त्यामुळे प्रथम हा विचार मनातून काढून टाकणे गरजेचे आहे. मन खंबीर असेल तर कोणत्याही आजाराचा सामना करणे सहजशक्य असते. त्यामुळे आजाराला आपल्या मनात घर करू देऊ नका. त्यासोबतच रुग्णांच्या नातेवाईकांनीदेखील घाबरून न जाता धैर्य बाळगणे गरजेचे आहे, असेही प्रमाणसागर यांनी यावेळी नमूद केले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@