'महाराजा'ची तुंगारेश्वर सफारी; ओलांडतोय रेल्वे ट्रॅक आणि रस्ता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2021   
Total Views |
akshay _1  H x
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बोरिवलीच्या ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’त महिनाभरापूर्वी ‘सॅटेलाईट कॉलर’ लावलेल्या दोन बिबट्यांचा प्रवास समोर आला आहे. यामधील ‘सावित्री’ नामक बिबट्याने उद्यानातील तुळशी तलावाला एका रात्रीत प्रदक्षिणा घातली, तर ‘महाराजा’ नामक बिबट्याने महिनाभरात तीन वेळा ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ ते ‘तुंगारेश्वर अभ्यारण्य’ असा प्रवास केला आहे. या प्रवासाकरिता ‘महाराजा’ हा रस्ता आणि रेल्वे मार्गिकाही ओलांडत असल्याचे उघड झाले आहे.
 
 
 
गेल्या महिन्यापासून राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांच्या गळ्यामध्ये ‘सॅटेलाईट कॉलर’ बसवून त्यांचा भ्रमणमार्ग आणि अधिवासक्षेत्र समजून घेण्याच्या अभ्यासाला सुरुवात झाली. या अंतर्गत 20 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय उद्यानाच्या दक्षिणेकडील तुळशी वनपरिक्षेत्रात ‘सावित्री’ (वय-तीन वर्षे) नामक मादी बिबट्याला ‘सॅटेलाईट कॉलर’ लावून सोडण्यात आले. उद्यानाच्या उत्तरेकडील वसई खाडीपलीकडे असलेल्या नागला वनपरिक्षेत्रातील ‘महाराजा’ (वय- सात ते आठ वर्षे) नामक नर बिबट्याला 22 फेब्रुवारी रोजी कॉलर लावून सोडण्यात आले. या बिबट्यांच्या महिनाभरातील प्रवासाची नोंद वन्यजीव संशोधक डॉ. विद्या अत्रेय, निकीत सुर्वे आणि वन अधिकार्‍यांनी केली. त्यानुसार सावित्री बिबट्याने 17 मार्चच्या रात्री तुळशी तलावाला पूर्ण प्रदक्षिणा मारल्याची माहिती तुळशी वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश देसले यांनी दिली. 4.57 किमीचा प्रवास तिने साधारण 11 तासांमध्ये पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तिने कुत्र्यांचे एक पिल्लू मारून खाल्ल्याचीही माहिती आम्हाला सर्वेक्षणादरम्यान मिळाल्याचे, ते म्हणाले. महिनाभरापासून ती तुळशी वनपरिक्षेत्र आणि त्याला लागून असलेल्या आसपासच्या परिसरात वावरत आहे.
 
 
 
 
नागला वनपरिक्षेत्रामध्ये अधिवास करणारा ‘महाराजा’ तीन वेळा ‘तुंगारेश्वर अभयारण्या’पर्यंतचा प्रवास करून पुन्हा आपल्या मूळ अधिवासक्षेत्रामध्ये परतल्याचे समजले आहे. पहिल्या फेरीमध्ये त्याने नागला-तुंगारेश्वर-नागला हा 62 किमीचा प्रवास सहा दिवसांमध्ये पूर्ण केल्याची माहिती वन्यजीव संशोधक निकीत सुर्वे यांनी दिली. 62 किमीच्या प्रवासादरम्यान त्याने तुंगारेश्वरमधील सर्वोच्च उंच ठिकाण सर केले आणि आठ तासांचा प्रवास दिवसा, तर 54 किमीचा प्रवास रात्री पूर्ण केला. त्यानंतर दोन्ही फेर्‍यांमध्ये तुंगारेश्वरच्या काही भागांमध्ये जाऊन तो पुन्हा नागला वनपरिक्षेत्रात परतला. महत्त्वाचे म्हणजे, त्याने या प्रवासादरम्यान दिवा-पनवेल रेल्वे मार्गिका आणि चिंचोटी-भिवंडी रस्ता ओलांडल्याचे सुर्वे यांनी सांगितले. रेल्वे मार्गिका ओलांडताना त्याने वेगवेगळ्या ठिकाणांचा वापर केला. मात्र, रस्ता ओलांडण्यासाठी त्याने तिन्ही खेपेला एकाच ठिकाणाचा वापर केल्याचे सुर्वेंनी अधोरेखित केले आहे. यापूर्वी याच ठिकाणावर रस्ते अपघातात काही बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. म्हणूनच, या परिसरात वन्यजीवांकरिता ‘ओव्हरपास’ पूल बांधण्यात येणार आहे.
 
 
भ्रमणमार्गे सुरक्षेसाठी ओव्हरपास
 
‘राष्ट्रीय उद्याना’च्या उत्तरेकडील सीमेलगत तीन विकास प्रकल्प नियोजित आहेत. या ठिकाणी दिवा-पनवेल रेल्वे मार्गिका आणि चिंचोटी-भिवंडी रस्ता असून, नव्याने दिवा-पनवेल मालवाहतूक मार्गिका, आठपदरी विरार-अलिबाग बहु-उद्देशीय मार्ग आणि बुलेट ट्रेन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. या परिसरात राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर अभयारण्याची सीमा निमुळत्या स्वरूपात जोडली जाते. याच भागातून मोठ्या प्रमाणात वन्यजीवांची हालचाल होते. त्यामुळे दोन्ही संरक्षित क्षेत्रांना जोडून वन्यजीवांची हालचाल सुकर करण्यासाठी 30 मीटर लांब ‘ओव्हरपास पूल’ बांधण्यात येणार आहे. या परिसरातून जाणार्‍या बहु-उद्देशीय मार्ग आणि बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मार्गिका उन्नत स्वरूपात बांधण्यात येतील. अशा स्थितीत दिवा-पनवेल रल्वे व मालवाहतूक मार्गिका आणि भिवंडी-चिंचोटी रस्त्यावरून हा वन्यजीव ‘ओव्हरपास पूल’ बांधण्यात येईल. त्यानंतर हा पूल बहु-उद्देशीय आणि बुलेट ट्रेन उन्नत मार्गिकेच्या खालून जाईल.
 
 
 
प्रस्तावित असलेल्या वन्यजीव ‘ओव्हरपास पुला’च्या परिसरामधूनच बिबटे हे रेल्वे आणि रस्ता ओलांडत असल्याचे ‘सॅटेलाईट कॉलर’च्या अभ्यासामुळे समजले आहे. या पुलाच्या बांधणीसाठी सर्व परवानगी मिळाल्या असून ‘ओव्हरपास’ बरोबरीनेच प्रकल्पांखालून वन्यजीवांना जाण्यासाठी ठिकठिकाणी कलवट बांधण्याच्याही सूचना आम्ही प्रकल्प निर्माण प्राधिकरणांना दिल्या आहेत. - जी. मल्लिकार्जुन, वनसंरक्षक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

@@AUTHORINFO_V1@@