‘टाईम कॅप्सूल’

    दिनांक  30-Jul-2020 22:37:42   
|


Time Capsule_1  
 

अयोध्येत राममंदिराच्या बांधकामापूर्वी जमिनीत ‘टाईम कॅप्सूल’ ठेवली जाणार आहे, अशी अफवा उठली होती. मात्र, विश्वस्त मंडळाकडून याविषयीच्या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे. राममंदिराच्या बांधकामापूर्वी कोणतीही ‘टाईम कॅप्सूल’ ठेवली जाणार नाही, हे स्पष्ट करण्यात आलं आहे.


भविष्यात इतिहास लिहिताना आपली दखल घेतली जावी, असे बहुतेकांना वाटते. आपण नसल्यावर आपली कोणीतरी आठवण काढावी, आपल्याविषयी चर्चा व्हावी, अशा स्वरूपाच्या अपेक्षा भावनाविश्वात वावरणार्‍या माणसाच्या असतात. तसेच इतिहासाचा शोध घेताना आपल्याला जसा त्रास झाला, तसा त्रास भावी पिढ्यांना होऊ नये, असेही वाटत असले पाहिजे. त्यातून भविष्यातील पिढ्यांसाठी काहीतरी खुणा, चिन्ह हेतुपुरस्सर मागे सोडावीत असे वाटणे स्वाभाविक. कारण, वर्तमानातील पिढीने मानववंशाचा इतिहास याच साधनांच्या आधारे शोधला आहे. त्यामुळे भविष्यातील इतिहासाच्या अभ्यासाला साहाय्यक होण्यासाठी काही पुरातत्त्व साधने योजनापूर्वक मागे ठेवण्याची कल्पना सुचली असावी. सध्या अयोध्या भूमिपूजनाच्या बातमीत ‘टाईम कॅप्सूल’ हा शब्द चर्चेला आला होता. ‘टाईम कॅप्सूल’ त्याच संकल्पेनाचा भाग आहे.
 

अयोध्येत राममंदिराच्या बांधकामापूर्वी जमिनीत ‘टाईम कॅप्सूल’ ठेवली जाणार आहे, अशी अफवा उठली होती. मात्र, विश्वस्त मंडळाकडून याविषयीच्या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे. राममंदिराच्या बांधकामापूर्वी कोणतीही ‘टाईम कॅप्सूल’ ठेवली जाणार नाही, हे स्पष्ट करण्यात आलं आहे. १५ ऑगस्ट १९८३ रोजी एक ‘टाईम कॅप्सूल’ तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावर पुरली होती. या ‘टाईम कॅप्सूल’मध्ये काय आहे ते कोणालाच कळले नाही. लाल किल्ल्यावरील ‘टाईम कॅप्सूल’चे जीवनमान पाच हजार वर्षे आहे. आयआयटी कानपूरनेदेखील आपल्या ५० वर्षांचा इतिहास सांगणारी ‘टाईम कॅप्सूल’ जमिनीत गाडली होती. जगाच्या पाठीवर अशा अनेक ‘टाईम कॅप्सूल’चा वापर आजवर करण्यात आला आहे.
 
‘पर्थ ऑबजर्व्हेटरी’ या अंतराळ निरीक्षण करणार्‍या संस्थेने २९ सप्टेंबर १८९६ रोजी भूमिपूजनावेळी एक ‘टाईम कॅप्सूल’ जमिनीत ठेवली आहे. त्यात संस्थेने आजवर केलेले संशोधन, संस्थेचा इतिहास अशी माहिती जतन करण्यात आली होती. लीडच्या एका खोक्यात त्याविषयीचे दस्तावेज, कागदपत्रे ठेवली आहेत. आधुनिक जगातील ‘टाईम कॅप्सूल’चा हा पहिला प्रयोग होता, असे म्हणायला हरकत नाही. १९२२ साली असाच एक धातूचा खोका ब्राझीलच्या ‘अ‍ॅण्टिएअर आर्टिलरी’चा इतिहास सांगणारा जमिनीत ठेवण्यात आला होता. कितीतरी वर्षांनंतर कारपोल ग्लुबेरला त्याविषयी एका पुस्तकात संदर्भ सापडला. ‘टाईम कॅप्सूल’चे ठिकाण शोधण्यात आले आणि तो खोका ब्राझील लष्कराला सुपूर्द करण्यात आला. ऑस्ट्रिया देशातील ‘मेमरी ऑफ मॅनकाऊंड’ हा ‘टाईम कॅप्सूल’चाच एक प्रकार म्हटला पाहिजे. २०१२ साली मार्टिन कुझ यांनी हा प्रकल्प सुरू केला. वर्तमानातील मानववंशाच्या जीवनपद्धतीविषयीची सर्व माहिती जतन करण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. ‘मेमरी ऑफ मॅनकाईंड’ मध्ये तुम्ही स्वतः निधी किंवा तपशील, मजकुराच्या स्वरूपात मदत देऊ शकता. वर्षानुवर्षे टिकून राहतील असे छोटे-छोटे खोके जमिनीत गाडण्याच्या योजना आहेत. या मिशनला कोणत्याही स्वरूपाची मदत करणार्‍यांना एक कॉईन दिला जातो. सिरॅमिकचा वापर करून ‘मेमरी ऑफ मॅनकाईंड’ (मॉम) साठी खोके तयार करण्यात आले आहेत. कोरोनासारख्या जैविक धोक्यामुळे, जागतिक तापमानवाढीमुळे मानवजातीला धोका निर्माण झाला, तर त्यातून जीवंत राहणार्‍या मंडळींना ही संस्कृती पुन्हा उभारण्यासाठी सोपे जावे, अशी ‘मॉम’मागील प्रेरणा आहे.
 
काही ‘टाईम कॅप्सूल’ किती वर्षांनी उघडल्या जाणार याची वेळ निश्चित केलेली असते. जसे लाल किल्ल्यातील ‘टाईम कॅप्सूल’ एक हजार वर्षांनी उघडली जाईल, असा निर्णय झाला होता. इंदिरा गांधी सरकारनंतर जनता पक्षाने ती ‘टाईम कॅप्सूल’ उघडण्याचा प्रयत्न केला होता. इंदिराजींच्या त्या कॅप्सूलमध्ये काय होते हे कधीच पुढे आले नाही. ‘अपोलो मिशन’ चंद्रावर गेले, तेव्हाही एक ‘गुडविल मेसेज’ अशारितीने ठेवण्यात आला होता. अंतराळात झालेला ‘टाईम कॅप्सूल’चा तो एक प्रयोग होता. डिजिटल युगात या संकल्पनेचा वेगळा विचार झालेला दिसतो. २०१५ साली एक चित्रपट तयार करण्यात आला आहे. शंभर वर्षांनी १८ नोव्हेंबर,२११५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तूर्त राममंदिरासाठी कोणतीही ‘टाईम कॅप्सूल’ ठेवली जाणार नाही हे निश्चित. त्यामुळे कदाचित राममंदिराची ‘टाईम कॅप्सूल’ ठेवली होती की नव्हती, हा प्रश्न हजारो वर्षांनंतर चर्चेचा रहस्यमय विषय असू शकतो!

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.