संस्कृतीचा पुनर्शोध

    02-Jun-2025   
Total Views |
guatemala and the maya culture
पुरातत्त्वशास्त्र म्हणजे एक चिरंतन शोधयात्राच. या यात्रेमध्ये आपल्याला, आपल्याच इतिहासाची नव्याने भेट होते. या इतिहासाच्या माध्यमातूनच वर्तमानातील भोवतालाचे सूक्ष्म आकलन आपल्याला घडते. प्राचीन काळातील संस्कृतींच्या अवशेषांमुळे आपल्याला आपल्या समृद्ध वारशाची माहितीही मिळते. परंतु, त्याचसोबत इतिहासातील प्रगतीच्या पाऊलखुणासुद्धा कळतात. मध्य अमेरिकेतील ग्वातामेला प्रांतामध्ये, इतिहासाचा असाच एक नवीन अध्याय उलगडतो आहे. प्राचीन संस्कृतीमध्ये आपल्या अस्तित्वाची वेगळी छाप ज्या सभ्यतेने सोडली ती म्हणजे माया संस्कृती. याच माया संस्कृतीच्या पुनर्शोधाला आता वेग आला आहे. पुरातत्त्वशास्त्रज्ञांनासुद्धा कोड्यात टाकणारे अनेक शोध यावेळी उत्खननादरम्यान लागले आहेत.


ग्वातामेला प्रांताच्या उत्तरेचा भाग हा जंगलांनी व्यापलेला आहे. याच जंगलांमध्ये विस्मृतीत गेलेल्या इतिहासाची पाने आपल्याला आढळतात. मेसोअमेरिकन संस्कृतीचा शोध घेत असताना, पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या हाताला काही नव्या गोष्टींचा उलगडा झाला आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, लॉस एब्युलोस या नव्या शहराची माहिती त्यांना या ठिकाणी मिळाली. पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या मते, ही जागा किमान तीन हजार वर्षे जुनी असावी. या जागेतील सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इथे आढळणारे नगरांचे नियोजन. त्याचबरोबर काही प्राचीन देवतांची बांधलेली पूजा, विशेष विधीसाठी उभारण्यात आलेले घाट, यामुळे या जागेला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

माया संस्कृतीचा अभ्यास करणार्‍या अभ्यासकांच्या मते, मागच्या दहा वर्षांमध्ये लागलेला हा सर्वांत महत्त्वाचा शोध आहे. युएक्सॅक्टन या सुप्रसिद्ध शहरापासून 21 किमी दूर असलेल्या या जागेवर, अजूनही उत्खननाचे काम सुरूच आहे. या परिसरामध्येच त्यांना 33 मीटर उंचीचे पिरॅमिडही सापडले. अद्याप तरी इतक्या मोठ्या उंचीचे मनोरे तिथे अवतीभवती सापडलेले नाहीत. ग्वातामेला इथल्या सांस्कृतिक मंत्रालयाने यावर भाष्य करताना म्हटले की, “या जागेवरील वास्तुशिल्प आणि नगरांचे नियोजन पाहता, प्रतिमांची अद्वितीय निर्मिती इथे करण्यात आली आहे, असेच म्हणावे लागेल.”

“सदर जागेवर आढळलेले शिल्प, त्या शिल्पावर कोरलेली चिन्हे यांमुळे इथे एक विशिष्ट सामाजिक आणि राजकीय व्यवस्था कार्यरत होती, असे म्हणण्यास वाव आहे,” असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले. अशी व्यवस्था जी यापूर्वी सापडलेल्या माया संस्कृतीच्या अवशेषांमध्ये आपल्याला आढळत नाही. या जागेला लॉस एब्युलोस हे नाव कसे पडले, या मागचा किस्सासुद्धा गमतीशीर आहे. लॉस एब्युलोस म्हणजे आजी-आजोबा. या जागेवर दोन छोटेखानी मानववंशीय शिल्प आढळली, म्हणून हे नाव त्या जागेला देण्यात आले. ही दोन शिल्पं इसवी सन पूर्व 500 ते 300 या कालावधीतील असल्याचा दावा, अभ्यासकांकडून करण्यात आला आहे. या शिल्पांच्या प्राथमिक अभ्यासावरून असे लक्षात आले की, ही शिल्पं प्राचीन देवतेची असावी. माया संस्कृतीचा समृद्ध वारसा सांगणारी ही शिल्पं ज्या ठिकाणी आढळली, त्यावरूनच त्या जागेच्या सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची प्रचिती येते.

या जागेवर एक अशी संस्कृती बहरली होती, जिथल्या लोकांचे भौतिक जीवन प्रगतिशील होते असे म्हणता येते. नगरांची निर्मिती, नगरांमध्ये असणारा संस्कृतीचा अधिवास या सगळ्याच गोष्टींच्या जडणघडणीची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असते. लॉस एब्युलोस या जागेवर सुरू असलेले उत्खनन, याच दिशेने आपल्या माहितीमध्ये आणि माया संस्कृतीकडे बघण्याच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल घडवून आणू शकते.

माया संस्कृतीचा काळ बहुदैववादाचा काळ होता, असे अनुमानही काही काळापूर्वी लावण्यात आले होते. त्या अनुषंगाने नंतरच्या काळात झालेल्या संशोधनामुळे, पुढे याच विचाराला पुष्टीही मिळाली. माया संस्कृतीचा विचार करता आपल्याला केवळ इतिहासातील एका काळाचे यानिमित्ताने आकलन होत आहे असे नसून, वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये असलेली बहुविधता, संस्कृतीमध्ये असलेली साम्यस्थळे, यांचेसुद्धा आकलन होत असते. संस्कृतीच्या या पुनर्शोधामुळे आपल्याला आपल्याच मुळांची पुन्हा एकदा नव्याने ओळख होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.



मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.