फ्रान्समध्ये चाललंय तरी काय?

    29-May-2025   
Total Views |
फ्रान्समध्ये चाललंय तरी काय?
बाललैंगिक शोषणाचे व्हिडिओ डाऊनलोड केले, म्हणून २००५ साली ले स्कॉर्नेक या फ्रेंच सर्जनला पोलिसांनी अटक केली. मात्र, त्याला सोडून देण्यात आले. पण, हीच मोठी चूक ठरली. कारण, पुढे २०१७ साली बाललैंगिक शोषणाच्या गुन्ह्यासंदर्भात चौकशी दरम्यान त्याने मान्य केले की, गेल्या २५ वर्षांत त्याने २९९ बालकांचे लैंगिक शोषण केले. या सगळ्या विकृतीची नोंद त्याने त्याच्या डायरीमध्ये केली होती. तसेच, डायरीत लिहिलेही होते की, तो खूप विकृत आहे, बाललैंगिक शोषण करणारा आहे, त्यातच तो खूश आहे.


फ्रान्सच्या डझनभर रुग्णालयांत ले स्कॉर्नेकने प्रतिष्ठित सर्जन म्हणून काम केले. १९८९ ते २०१४ सालच्या दरम्यान त्याने अनेक लोकांच्या शस्त्रक्रियादेखील केल्या. शस्त्रक्रियेआधी रुग्णांना बेशुद्धीसाठी अॅनेस्थेशिया दिला जायचा. शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्ण बेशुद्ध असतानाच किंवा अर्धवट शुद्धीत असतानाच ले स्कॉर्नेकने अशा २९९ लोकांवर अत्याचार केले. त्याच्या या विकृतीचा बचाव करताना त्याच्या वकिलाने मॅक्सिम टेस्सियरने न्यायालयात म्हटले की, "ले स्कॉर्नेकने काही गुन्हे नाकारले आहेत. त्याचे म्हणणे आहे की, तो सर्जन होता. बालक, बालिकांना तपासण्यासाठी त्याने योनी किंवा गुदद्वाराला स्पर्श केला असेल. याचा अर्थ त्याने त्यांचे लैंगिक शोषण केले, असा होत नाही.” अर्थात हे धादांत खोटेच!

कारण, स्कॉर्नेकला शेजारच्या सहा वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करण्याच्या गुन्ह्याखाली २०१७ साली अटक करण्यात आली. चौकशीअंती त्याच्या इलेक्ट्रॉनिक डायरीमध्ये तीन लाखांपेक्षा जास्त फोटो व ६५० बाललैंगिक शोषणाचे आणि तत्सम व्हिडिओ सापडले. या डायरीमध्ये त्याने स्वतः केलेल्या बाललैंगिक शोषणाचे तपशील आणि चित्रेही काढली होती. पुढे त्याने मान्य केले की, आजपर्यंत त्याने २९९ व्यक्तींचे लैंगिक शोषण केले असून, त्यात १५८ मुले आणि १४१ मुली होत्या. दुसरीकडे स्कॉर्नेकच्या इलेक्ट्रॉनिक डायरीमध्ये आपले लैंगिक शोषण करतानाचे फोटो असतील, ते उघडकीस येईल, या भीतीने दोनजणांनी आत्महत्याही केल्या. भयंकर!

या घटनेने फ्रान्सचे समाजजीवन अक्षरश: ढवळून निघाले. न्यायालयाने स्कॉर्नेकच्या पत्नी आणि मुलांची चौकशी केली. त्यांनी स्कॉर्नेकबद्दल सांगितले की, "तो अत्यंत चांगला पती आणि उत्तम पिता आहे. त्याचे हे रूप आमच्या आजवरच्या कौटुंबिक नात्यावर टाकलेला अणुबॉम्ब आहे.” अर्थात, हा त्यांचा वैयक्तिक अनुभव. इथपर्यंत ठीक. मात्र, या कुटुंबीयांनी त्यांच्या स्वतःच्या भूतकाळाबद्दल ज्या साक्षी दिल्या, त्या साक्षींमुळे फ्रान्सच्या समाजजीवनाचे भयंकर अंतरंग उघड झाले. स्कॉर्नेकच्या मुलाने फैबियनने साक्ष दिली की, तो लहान असताना त्याच्या आजोबांनी जोसेफ याने त्याचे लैंगिक शोषण केले होते. तर ले स्कॉर्नेकची ७२ वर्षीय बहीण एनी जोबार्डने सांगितले की, ती जेव्हा १४ वर्षांची होती, त्यावेळी दोन मुलांनी तिच्यावर बलात्कार केला होता, तर स्कॉर्नेकच्या पत्नीने सांगितले की, ती बालिका असताना अनेक पुरुष नातेवाईकांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. तसेच, याच चौकशीत कळले की, स्कॉर्नेकने त्याच्या भावाच्या आणि बहिणीच्या मुलांवरही अत्याचार केले होते. इतकेच काय, त्याने त्याच्या नातींवरही अत्याचार केले होते. हे ऐकून त्याची मुले आणि सुना दुःख आणि वेदनेने मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार घेत आहेत. काय म्हणावे? स्कॉर्नेकचा गुन्हा पकडला गेला नसता आणि त्याच्या घरातल्यांची चौकशी झाली नसती, तर त्याच्या कुटुंबातील या व्यक्तींचे झालेले शोषण कधीच जगासमोर आलेही नसते.

काही महिन्यांपूर्वीच फ्रान्समध्ये असेच एक बलात्कार कांड उघडकीस आले. पेलिकॉट या महिलेवर ५१ जणांनी बलात्कार केला आणि या गुन्ह्याचा सूत्रधार तिचा पती डोमिनिक पोलिकॉट हाच होता. त्यावेळी फ्रान्सचे जनजीवन संतप्त झाले होते. आताही लोक रस्त्यावर उतरले आहेत. ७४ वर्षांच्या विकृत स्कॉर्नेकला केवळ २० वर्षांची शिक्षा झाली आहे. ही शिक्षा पुरेशी नाही, असे ते म्हणत आहेत. यामध्ये अत्याचारित मुले, मुलीही सामील झाली आहेत. मुक्ततेचा पराकोटीचा जयघोष करणार्या फ्रान्समध्ये स्कॉर्नेक किंवा पेलिकॉट या विकृतांचे गुन्हे म्हणजे जगाच्या इतिहासात विकृततेचा कळस. म्हणूनच प्रश्न पडतो की, फ्रान्समध्ये नेमकं चाललंय तरी काय?

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.