'कोरोना'लढ्याचा 'तैवान पॅटर्न'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2020   
Total Views |

taiwan_1  H x W

 


 

जी भीषण परिस्थिती इटली, स्पेन आणि अमेरिकेमध्ये उद्भवली, तेवढे गंभीर स्वरुप सुदैवाने या देशांमध्ये कोरोनाने धारण केले नाही. तैवानही त्यापैकीच एक.

 
 

काही हाताच्या बोटावर मोजण्याइतके देश सोडल्यास आज संपूर्ण जगभरात कोरोनाने कोहराम माजवला आहे. या कोरोना विषाणूचे उगमस्थान म्हणजे चीनमधील वुहान शहर. साडेतीन हजार नागरिक एकट्या चीनमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडले. त्यामुळे साहजिकच चीनशी भौगोलिकदृष्ट्या नजीकच्या देशांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सर्वाधिक धोका होता. यामध्ये प्रामुख्याने उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, जपान यांसारखे देश, तर तिबेट, हाँगकाँग आणि तैवान हे 'वन चायना पॉलिसी'अंतर्गत चीनच्या अधिपत्याखाली असलेले, परंतु स्वतंत्र राष्ट्राची मागणी करणारे प्रदेशही सामील आहेत. या क्षेत्रांमध्ये कोरोना विषाणूचा फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु, जी भीषण परिस्थिती इटली, स्पेन आणि अमेरिकेमध्ये उद्भवली, तेवढे गंभीर स्वरुप सुदैवाने या देशांमध्ये कोरोनाने धारण केले नाही. तैवानही त्यापैकीच एक.

 

तैवानला चीन आपलाच एक मुख्य भूमीपासून दूर असला तरी स्वायत्त प्रांत मानतो. म्हणूनच जागतिक पातळीवर आजही तैवानला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा चिनी दबावामुळे प्राप्त झालेला नाही. चीन आणि तैवानमधील अंतर अवघे ११० किमी. तसेच राजनैतिक, व्यापारी संबंधही अगदी घनिष्ट. पण, असे असूनसुद्धा तैवानमध्ये आजवर केवळ ३०० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून केवळ तीनजण मृत्यमुखी पडल्याची नोंद आहे. त्यामुळे साहजिकच प्रश्न पडतो की, चीनशी इतके निकटचे संबंध असूनदेखील तैवानने कोरोनाला नियंत्रणात कसे ठेवले?

 

सर्वप्रथम हे समजून घ्यायला हवे की, तैवान हा आरोग्य क्षेत्रातील सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. त्यामुळे केवळ आपल्या सीमा बंद करुन कोरोनाला अटकाव घालता येणार नाही, याची तैवानने वेळीच दखल घेतली. कुठल्याही प्रकारचे राष्ट्रीय 'लॉकडाऊन' जाहीर न करता नागरिकांना घराबाहेर मास्क लावून फिरण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या. 'सोशल डिस्टन्सिंग'चे काटेकोरपणे पालन करण्यात आले आणि सरकारचे नियम पायदळी तुडवणार्‍यांना, अफवा पसरवणार्‍यांना कठोर शिक्षा देऊन त्यांच्याही मुसक्या आवळल्या. तैवानच्या या सगळ्या लढाईचे केंद्र होते ते 'नॅशनल हेल्थ कमांड सेंटर.' (एनएचसीसी) या सेंटरमधील प्रशिक्षित अधिकारी, डॉक्टरवर्गाने कोरोनाशी संबंधित सर्व प्रकारचा डेटा जसे की, कोरोनावरील औषधोपचार, रुग्णांची माहिती, त्यांचे संपर्क, त्यांनी केलेला प्रवास इत्यादी प्रत्येक बारीकसारीक गोष्टींची माहिती संकलित केली. या माहितीच्या आधारे तैवानला अशा संशयित, संक्रमित रुग्णांपर्यंत वेळीच पोहोचून त्यांना समाजापासून विलग करणे सोयीचे ठरले. तसेच १२४ सूत्रीय धोरणाचे तैवानने काटेकोरपणे पालन केले आणि ते नागरिकांकडूनही करवून घेतले, हे विशेष. सर्व सार्वजनिक इमारतींमध्ये हॅण्ड सॅनिटायझर आणि शरीरातील तापमान मोजणी अनिवार्य करण्यात आली. त्यामुळे तैवानला वेळीच कोरोनाचा अटकाव करणे सहज शक्य झाले.

 

स्वयंपूर्ण तैवानने आता युरोपीय देशांसह इतर मित्रराष्ट्रांनाही एक कोटींपर्यंत मास्कची निर्यात करण्याचे कबूल केले आहे. यावरुन आपण अंदाज बांधू शकतो की, तैवानही उद्योगधंदे, उत्पादनक्षमतेच्या बाबतीत चीनपेक्षा तसूभरही मागे नाही. परंतु, केवळ चीनच्या दबावापोटी स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा प्राप्त न झाल्यामुळे तैवान जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य नाही. म्हणूनच कोरोनाशी दोन हात करताना तैवानने राबविलेल्या वैद्यकीय उपाययोजना फारशा प्रकाशझोतात आल्या नाहीत की जगाच्या दृष्टीने दखलपात्र ठरल्या नाहीत.

 

खरंतर तैवानची ही तत्परता कटू पूर्वानुभवातून आलेल्या शहाणपणाची देण म्हणावी लागेल. 'सार्स', 'मार्स' यांसारख्या विषाणूंनी कोणे एकेकाळी तैवानमध्येही हैदोस घातला होता. शेकडो लोकांचा बळी गेल्यानंतर तैवानने मात्र आपल्या आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणले. आज त्याच बदलांच्या परिणामस्वरुप चीनशी जवळीक असूनही तैवान कोरोनापासून अंतर राखून आहेच. तेव्हा विकसनशील भारत असो, महासत्ता अमेरिका अथवा विकसित युरोपीय राष्ट्रं, कोरोनाच्या निमित्ताने का होईना, आपल्या आरोग्य व्यवस्था किती कुचकामी ठरु शकतात, याची ही जागतिक प्रचिती होती. आता तरी कोरोनाच्या कहरातून प्रत्येक राष्ट्राने धडा घेऊन आरोग्य सोयीसुविधांना प्राथमिकता द्यावी, हीच अपेक्षा!




@@AUTHORINFO_V1@@