गांधारीची शापवाणी

    दिनांक  01-Jan-2020 22:43:27
|

gandhari_1  H xजसे ‘नारायणास्त्र’ पांडवांच्या डोक्यावरून निघून गेले, तसाच गांधारीचा रागही निघून गेला. परंतु, गांधारीच्या मनात श्रीकृष्णाबद्दल तीव्र कोप खदखदत होता. पांडवांची लीनता व नरमाई पाहून ती शांत झाली. मात्र, दुर्दैवी द्रौपदीसाठी तिला दुःखही होत होते. तिने द्रौपदीला जवळ घेऊन तिचे सांत्वन केले. कुंतीच्या कुशीत द्रौपदी हुंदके देऊन रडत होती. कुंती तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करत होती. ते सर्व रणभूमीवर गेले. गांधारीने द्रौपदीला जवळ घेऊन म्हटले, “बाळा, माझ्याकडे पाहा व तुझे मन शांत कर! तुझे व माझे दुःख सारखेच आहे! हे सर्व आपल्या दोघींचे प्राक्तन व भोग आहेत! विदुरांनी हे भवितव्य या पूर्वीच सांगितले होते. श्रीकृष्ण युद्धापूर्वी हस्तिनापुरात येऊन गेला तेव्हा त्यानेही हेच सांगितले. परंतु, तेव्हा कोणी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. तेव्हा सारे आंधळे व बहिरे झाले होते. आता निरर्थक शोक करू नकोस. तुझ्या व माझ्या शूर पुत्रांना स्वर्गात प्रवेश मिळाला आहे. या सर्व वंशक्षयाला मीसुद्धा तेवढीच कारणीभूत आहे. मी माझ्या पुत्रांना आवर घातला नाही. हे त्यामुळेच घडून गेले.” गांधारी रणभूमीवर आली. तिच्या डोळ्यांवर पट्टी होती, तरी ती तपसामर्थ्याने खरे काही पाहू शकत होती. गांधारी दुर्योधनाच्या कलेवरापाशी आली. तिने त्याच्या डोळ्यांवरून हळुवार हात फिरवला. कृष्ण निःशब्द उभा राहून सारे पाहत होता. दुःखाने गांधारीला भोवळच आली. तो एक भयंकर अनुभव होता. अचानक गांधारीचा क्रोध उफाळून आला. कृष्णाकडे वळून ती म्हणाली, “कृष्णा, तू हे सारे थांबवू शकत होतास. तुझे दुर्लक्ष या नाशाला कारणीभूत झाले. तू नि:पक्षपाती भूमिका घेतली नाही. म्हणून हा एवढा नरसंहार झाला. माझ्या तपसामर्थ्याने जर मला शक्ती प्राप्त झाली असेल तर कुरू घराण्याचा असा विनाश केल्याबद्दल मी तुला शाप देते. आजपासून ३६ वर्षांनी अगदी असाच कुलक्षय तुम्हा वृष्णीकुलाचा होईल व तू तो पाहशील. ते आपसात युद्ध करून एकमेकांना संपवतील. आज जशा कुरुकुलातील स्त्रिया आक्रोश व विलाप करत आहेत, तशा वृष्णी कुटुंबातील स्त्रियाही रडतील. हा माझा तुला शाप आहे.”


गांधारीची शापवाणी ऐकून श्रीकृष्ण गोड हसला व म्हणाला
, “माते, संपूर्ण वृष्णी कुळाचा विनाश करण्याचे सामर्थ्य माझ्यातच आहे. तू सांगतेस तसेच होणार. हेही मला ठाऊक आहे. तू माझे काम मात्र सोपे करून टाकलेस. हा शाप देऊन तू एकप्रकारे मला मोठी मदतच केलीस! माझा प्रश्न सुटला याचा मला आनंदच होतोय. कारण, एक वृष्णीच दुसर्‍या वृष्णीचा नाश करू शकतो. त्यांना दुसरा देवही दुखापत करू शकत नाही. तू खरंतर मला शाप न देता हे वरदान दिले आहेस! आशीर्वाद दिले आहेस. शिवाय तुझ्या क्रोधाला ही वाटपण मिळाली. आता तुझा क्रोधही शमेल व फक्त प्रेमभाव उरतील. मी या पांडवांसाठी काहीही करायला तयार आहे. त्यांच्या सुखासाठी जर माझ्या कुटुंबाचा विनाश आवश्यक असेल तर तो नाश मी आनंदाने स्वीकारतो. मात्र, या माझ्या प्रिय पांडवांना मी अंतर देणार नाही. ते माझा जीवप्राणच आहेत!” गांधारीची शापवाणी सर्व पांडवांनी ऐकली. तो आपल्यासाठी एवढा मोठा त्याग करत आहे हे पाहून ते भारावून गेले.


कृष्ण गांधारीला म्हणाला
, “माते, तू धर्माला मान देतेस. तुझी धर्मभावना अशीच जागी ठेव. शोक आवर. हे सारे घडवणारी तुही नाही व मीपण नाही. तुझा पुत्र दुर्योधन याचे तुम्ही खूप लाड केले. जेव्हा जेव्हा तो अहंकाराने वागला, तेव्हाच तुम्ही त्याला आवरले नाही. तुझा बंधू शकुनी तू त्याला घरात शिरकाव करू दिलास. तू त्याला चांगलाच ओळखत होतीस. तो तुझा घरभेदी ठरला. पांडवांना दुर्योधन लाक्षागृहात जाळणार आहे, हे तुला आधीच माहिती होते ना? मग का नाही आवरलं आपल्या पुत्राला? तू व तुझ्या पतीने दुर्योधनाला बिघडवलं. आता या प्रचंड नरसंहाराचे खापर माझ्या डोक्यावर फोडते आहेस. तुम्ही तुमच्या पुत्रावर प्रेम केलं ही एकप्रकारे तुमच्या डोळ्यांवर झापडच आली होती. हा धृतराष्ट्राचा दोष नाही का? तू तर सदाचरणी, सुस्वभावी होतीस. तू पण त्याला व पतीला आवर नाही घातलास. या कौरवांच्या नाशाला ते स्वतःच कारणीभूत आहेत. त्यांना त्यांच्या लायकीपेक्षा खूप काही अधिक मिळाले. खरं तर त्यांनी इतकी पापे केलीत की ते नरकात जायला हवेत. परंतु, आताही मृत्युनंतर दुर्योधनास स्वर्गप्राप्ती झाली. मेल्यानंतरही त्याने या पांडवांना फसवलंय. पण त्यांना स्वर्गप्राप्ती झाली म्हणून तुला आनंद झाला. या तुझ्या आनंदात मीपण सहभागी आहे. त्यांनाही स्वर्गप्राप्ती केवळ तुझ्या चांगुलपणामुळेच मिळालीय. तेव्हा आता सर्व दुःख दूर फेकून दे. दुर्योधन तुझ्याकडे युद्धात विजयी होण्यासाठी आशीर्वाद मागत होता तेव्हा तू काय म्हणालीस ते आठव. तू म्हणालीस, जिथे धर्म आहे, तिथेच विजय आहे. तू अन्यायाचे युद्ध लढणार आहेस. तुला विजय नाही मिळणार. पण तरीही मी तुला आशीर्वाद देते. जा उत्तम लढ, तुझा मृत्यू गौरवशाली असेल. तुला स्वर्गप्राप्ती होईल. हे तुच मला सांगितले ना?” श्रीकृष्णाचे हे बोल ऐकून गांधारी एकदम शांत झाली. ती काहीच बोलू शकली नाही.

- सुरेश कुळकर्णी

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.