विहंगवेडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2019   
Total Views |

 


बालपणी जडलेल्या पक्ष्यांच्या शिकारीचा नाद सोडून विहंगवेडे झालेले आदेश शिवकर आज भारतातील प्रसिद्ध तज्ज्ञ पक्षीअभ्यासक व निरीक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांच्याविषयी...


मुंबई ( अक्षय मांडवकर ) -  जिम कॉर्बेट, बिली अर्जुनसिंग हे पूर्वाश्रमीचे वन्यजीव शिकारीच. मात्र, अपराधीपणाची भावना मनी जागृत झाल्यानंतर अरण्यजीवांना शरण जात, त्यांनी वन्यजीव संवर्धनाला हातभार लावला. मुंबईतल्या एका प्रसिद्ध पक्षीअभ्यासकाचा प्रवासही असाच काहीसा. एकेकाळी हा व्यक्ती आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे पक्षीनिरीक्षणाकरिता दुर्बीणही खरेदी करू शकत नव्हता. सद्यपरिस्थितीत तो पक्ष्यांची भम्रंती करून देणारी देशातील सर्वात विश्वसनीय कंपनी चालवितो. निसर्गाला सर्वस्व मानत पक्षीनिरीक्षणाच्या सफरीला शिस्त आणि नियमांची चौकट आखून दिलेला हा माणूस म्हणजे 'आदेश शिवकर.'
 
 
 
 
 
शीव कोळीवाड्यातील सर्वसामान्य कोळी कुटुंबात आदेश यांचा दि. १३ एप्रिल, १९७५ साली जन्म झाला. शिवकर कुटुंबीय हे मुळचे मुंबईचे. आदेश यांचे आजोळ मुंबईतल्या नाहूरचे. त्यांच्या आजोबांची मोठी भातशेती होती. शिवाय ते शिकारीदेखील होते. पक्ष्यांच्या शिकारीचा त्यांना विशेष नाद. त्यामुळे हा नाद आदेश यांनाही जडला. सुट्टीच्या दिवसात आजोबांच्या शेतावर जाऊन बेचकीने नेम धरत पक्ष्यांची शिकार करण्यामध्ये त्यांना आनंद मिळायचा. यातूनच का होईना, पण निसर्गाची आवड शिवकरांच्या मनात कुठेतरी खोलवर रुजली. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी आदेश रुईया महाविद्यालयात दाखल झाले. निसर्गाच्या आवडीखातर ते रुईयाच्या 'नेचर क्लब'मध्ये सहभागी झाले. एकदा या 'नेचर क्लब'ची सहल 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त गेली होती. त्या सहलीचा मार्गदर्शक शिवकरांना झाडावर बसलेल्या तांबट पक्ष्याविषयी माहिती देत होता. मात्र, शिवकरांचे मन त्यांना पोखरून खात होते. कारण, काही दिवसांपूर्वीच शिवकरांनी तांबट पक्ष्याची शिकार केली होती. त्यावेळी शिवकर अपराधीपणाच्या भावनेने खचून गेले आणि शिकार बंद करून पक्ष्यांसाठी काम करण्याचा त्यांनी निश्चय केला.

 
 
 

मात्र, पक्षीनिरीक्षणाची दृष्टी शिवकरांकडे नव्हती. ती दृष्टी निर्माण करणारा मार्गदर्शक त्यांच्यापाशी नव्हता. पक्ष्यांविषयी ज्ञानार्जन करणारी पुस्तकं नव्हती वा त्यांना पाहण्यासाठी दुर्बीण. अशा परिस्थितीत त्यांनी केवळ आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवत पक्षीनिरीक्षणाला सुरुवात केली. महाविद्यालयातील पहिली तीन-चार वर्ष पक्षीनिरीक्षण केले. पक्षी पाहिल्यानंतर त्याचे चित्र काढून त्यांची वैशिष्ट्ये लिहून ठेवण्याचे काम ते करायचे. महिनाभर या पद्धतीने नोंद केल्यानंतर शिवकर 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या (बीएनएचएस) ग्रंथालयात जाऊन वहीत नोंदवलेल्या पक्ष्याविषयी माहिती मिळवायचे. या सगळ्यात त्यांना बाहेर भटकून पक्षी भम्रंती करता येत नव्हती. कारण, घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे शिवकरांनी टपाल कार्यालयात काम करून महाविद्यालयात पायी जात, बसचे पैसे साठवून मुंबईच्या पक्षी भ्रमंतीला सुरुवात केली. विविध शाळांमध्ये जाऊन पक्ष्यांविषयी प्रबोधनाचे काम केले. त्यासाठी 'बीएनएचएस'कडून पक्ष्यांच्या कृष्णधवल स्लाईड ते भाड्याने घेत. या सगळ्यात शिवकर पक्ष्यांमध्ये गुरफटत गेले. १९९५ साली त्यांची ओळख नयन खानोलकर यांच्याशी झाली. पुढे या ओळखीचे रुपांतर घट्ट मैत्रीत झाले. खानोलकर एका अर्थी त्यांचे मार्गदर्शक झाले. त्यांच्यासमवेत शिवकरांनी पक्षीनिरीक्षणाच्या अनेक भ्रमंत्या केल्या.

 

 
 

बीएसस्सीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरच्या परिस्थितीमुळे शिवकरांनी एका कंपनीत वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून नोकरीला सुरुवात केली. मात्र, पक्षीनिरीक्षणाचा छंद त्यांची पाठ धरूनच उभा होता. २००० साली 'बर्ड ऑफ बॉम्बे' हा ग्रुप सुरू झाला. शिवकर त्यामध्ये सहभागी झाले. पुढे शिवकर 'बीएनएचएस'च्या सहलीला मार्गदर्शक म्हणून जाऊ लागले. तेव्हापासून ते पक्षीअभ्यासक म्हणून नावारुपास आले. पुढे २००२ साली त्यांनी संजय मोंगा, के. बी. सिंग, नितीन जमादार या मित्रांसमवेत 'मुंबई बर्ड वॉचर क्लब'ची सुरुवात केली. या दरम्यान नोकरीच्या ठिकाणी जबाबदार्‍या वाढत होत्या. त्यामध्ये शिवकरांची घुसमट होत होती. सरतेशेवटी शिवकरांनी स्थिर पगाराच्या नोकरीवर पाणी सोडत पक्षीनिरीक्षणामध्येच आयुष्य घालविण्याचा निर्णय घेतला.

 

 
 
वर्षभर भारतभर फिरून त्यांनी पक्ष्यांच्या अनोख्या विश्वाचा आस्वाद लुटला. त्यासाठी साठवलेली पुंजी खर्च केली. मात्र, जगण्यासाठी पैसे लागतात. त्यामुळे आपल्या पक्ष्यांच्या छंदमय आयुष्यालाच अर्थाजनाचे साधन बनविण्यासाठी त्यांनी २००८ साली 'नेचर इंडिया' या कंपनीची स्थापना केली. या संस्थेच्यावतीने आजवर त्यांनी पाचशेहून अधिक निसर्ग सहली राबवून पक्ष्यांच्या रंजक दुनियेचा आनंद लोकांना दिला आहे. यामध्ये शिवकरांना मंदार खाडीलकर या गृहस्थांची साथ मिळाली आहे. शिस्त आणि नियम ही या कंपनीची ओळख. आज समाजमाध्यमांच्या युगात या कंपनीचे अस्तित्व कुठल्याच समाजमाध्यमांवर नाही. केवळ मौखिक प्रसिद्धीच्या बळावर शिवकरांनी इथवर मजल मारली आहे. शिवकरांनी सामाजिक भान जपत कंपनीच्या नफ्यामधील काही भाग हा वन कर्मचारी किंवा पक्षीनिरीक्षणामध्ये रस असणार्या एखाद्या नवख्याला साहित्य खरेदी करून देण्याकरिता राखीव ठेवला आहे. पक्ष्यांसंदर्भात प्रबोधनाचे कामही ते कटाक्षाने करतात. अशा विहंगवेड्या माणसाला दै. 'मुंबई तरुण भारत' कडून शुभेच्छा !
 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat


 
@@AUTHORINFO_V1@@