एज्युकेशन वर्ल्डच्या अहवालात महाराष्ट्रातून रुपारेल महालविद्यालय पहिल्या क्रमांकावर!
01-Jun-2025
Total Views |
मुंबई : एज्युकेशन वर्ल्ड या संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ' इंडिया हायर एज्युकेशन रँकींग २०२५ - २६' या सर्वेक्षणात माटुंगा इथल्या डी. जी. रूपारेल महाविद्यालयाने महाराष्ट्रातून पहिला क्रमांक पटकावला आहे. ' नॉन ऑटोनोमस एएससी कॉलेज्स, नॅशनल लिग टेबल या विभागात डी. जी. रुपारेल महाविद्यालय १२ व्या क्रमांकावर असून, नेतृत्व, प्रशासन, अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र इत्यादी निकषांवर महाराष्ट्रात सर्वाधिक गुण मिळवले आहेत.
एज्युकेशन वर्ल्ड ' इंडिया हायर एज्युकेशन रँकींग २०२५ - २६' या सर्वेक्षणाचा अहवाल नुकतंच एज्युकेशन वल्डच्या मासिकात प्रकाशित करण्यात आला. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून भारतातील उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन केले जाते. सदर सर्वेक्षणात खाजगी तसेच सरकारी विद्यापीठं, अभियांत्रिकी संस्था, स्वायत्त तथा गैर स्वायत्त महाविद्यालयांचा समावेश आहे. सदर मूल्यांकनामध्ये बहुस्तरीय दृष्टीकोनातून सर्वेक्षण केले जाते. अभ्यासकांचे पुनरावलोकन, शैक्षणिक विदा (डेटा), विद्यार्थ्यांचा अभिप्राय असे अनेक निकष विचारात घेतले जातात. या निकषांच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थांचा गुणात्मक आलेख मांडला जातो. एज्युकेशन वल्ड इंडियाच्या माध्यमातून भारतातील वेगवेगळ्या विद्यापीठांची, महाविद्यालयांची सखोल माहिती मिळते. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून मुंबईच्या अॅड बाळासाहेब आपटे विदी महाविद्यालयाचा ग्रँड ज्युरी पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
अभ्यासक्रमापलिकडे शिक्षणाचा विचार!
डी. जी. रुपारेल महाविद्यालयाच्या या यशावर भाष्य करताना महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप म्हसके म्हणाले की " डी.जी. रुपारेल महाविद्यालयाने महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकवला, याचा आनंदच आहे. परंतु आता प्रगतीची पुढची पायरी गाठण्याचा आमचा विचार आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमाच्यापलिकडे जाऊन, विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्वसमावेशी विचार आम्ही करतो. आता यानंतर राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करण्याचा आमचा मानस आहे"