दि. 1 जून 1948 रोजी पुणे-अहमदनगर मार्गावर पहिली ‘एसटी’ ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन धावली. या दिवसाला आज 78 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने एका सेवानिवृत्त ‘एसटी’ कर्मचार्याने व्यक्त केलेले हे मनोगत...
सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच ‘एसटी’ गाड्या होत्या. एवढ्या वर्षांनंतर हाच आकडा सुमारे 15 हजारांहून अधिक आहे. आज ‘एसटी’च्या बसमधून तब्बल 55 लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. अशा या ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ’ अर्थात ‘एसटी’चा आज 78वा वर्धापन दिन. ‘एसटी’च्या प्रवासी सेवेला जरी 78 वर्षे पूर्ण झाली असली, तरी ‘लाल परी’ आजही तरुणच आहे. कारण, आजच्या इंटरनेटच्या युगात ‘एसटी’नेही हा बदल स्वीकारून ‘युपीआय’ पेमेंटवरून तिकिटाचे पैसे देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. स्मार्ट कार्डद्वारे पासेसची सुविधासुद्धा आहे. ‘व्हीटीएस’ प्रणालीचा अवलंब करून वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. जर एखादा वाहनचालक बेदरकारपणे अतिवेगाने वाहन चालवीत असल्याचे निदर्शनास आल्यास, त्याच्याशी त्वरित संपर्क साधून वाहनाची गती नियंत्रणात आणून प्रवाशांची सुरक्षितता निश्चित केली जाते. आधुनिकतेचा साज ‘एसटी’ने परिधान केला असून ‘शिवशाही’, ‘शिवनेरी’ यांसारख्या वातानुकूलित वाहनांची सेवा देण्यात येत आहे. यासह प्रदूषणावर मात करण्याकरिता इलेक्ट्रिक वाहने सुरू करण्यात आली आहेत.
‘एसटी’ने सामाजिक बांधिलकी कायमच जपली असून महिलांना तिकीटदरात 50 टक्के सवलत, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, विद्यार्थी व अपंगांसह एकूण सुमारे 43 योजनांच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीटदरात सवलती देण्यात येतात. विविध यात्रा, सोहळे, ऐतिहासिक दिवसांच्या निमित्ताने ‘एसटी’च्या शेकडो गाड्या प्रवासाकरिता सज्ज असतात.
‘कोरोना’ काळातही ‘एसटी’ने मुंबईकरांना मदतीचा हात दिला. ‘कोरोना’च्या जागतिक महामारीत ‘मुंबईची जीवनवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणार्या ‘बेस्ट’चे अनेक कर्मचारी आजारी होते. यावेळेस ‘एसटी’चे चालक, वाहक त्यांच्या मदतीला धावून गेले व मुंबईकरांना दिलासा दिला. तसेच राज्य शासनाने मान्यता दिलेल्या हजारो परराज्यांतील प्रवाशांना त्यांच्या निर्धारित रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचविण्याचे काम ‘एसटी’ने केले. याच ‘कोरोना’ काळात ‘एसटी’ कार्गोच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचा समाजातील तळागाळापर्यंत पुरवठा करण्याचे काम ‘एसटी’ने केले. परंतु, तीच कार्गो सेवा व काही ठिकाणची पार्सल सेवा बंद असल्याची खंत प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
‘एसटी’च्या जडणघडणीत तत्कालीन सर्वच महामंडळ अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, संचालक, अधिकार्यांचे, सर्वच आजी-माजी कर्मचार्यांचे व कामगार संघटना नेत्यांचे मोलाचे योगदान विसरून चालणार नाही. म्हणूनच कामगार नेते अरविंद सावंत, जॉर्ज फर्नांडिस, भाऊ फाटक, विसू भाऊ परब, महामंडळ संचालक यशवंत मोने, तसेच अधिकारी वर्गापैकी ग. मा. चव्हाण, वि. भा. थोरात, जी. जी. फडके, एम. जी. फडतरे, ए. एन. ओगले, एस. एम. जगताप यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. वामन जोग, विजया कुडव, राजन पांचाळ, शिल्पा काकडे यांच्यासारखे नाट्यक्षेत्रातील नामवंत कलाकारही ‘एसटी’ने दिले आहेत.
महामंडळाचे उत्पन्न कितीही कमी-जास्त असले, तरी शेवटच्या प्रवाशाला किफायतशीर व सुरक्षित प्रवास देण्यासाठी ‘एसटी’ सज्ज आहे. त्यामुळेच या आपल्या ‘लाल परी’ची घोडदौड शतकोत्तर व्हावी, हीच अपेक्षा...
संदीप मोने
8698779546