काँग्रेस हा 'पक्ष' नाही

    25-May-2019   
Total Views | 143


 

 

‘काँग्रेस’ नावाच्या शोषणव्यवस्थेला टिकवून ठेवण्यासाठीची केविलवाणी धडपड होती. आता आपली खरी लढाई काँग्रेस पक्षाशी उरलेली नसून, ‘काँग्रेस’ नावाच्या शोषणव्यवस्थेशी अटीतटीची असल्याचे ओळखूनच मोदी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उतरलेले होते. त्यांना नुसते बहुमत मिळवायचे नव्हते, तर राज्यसभेतील अडवणूकही संपवायची होती आणि त्याचाही पाया याच निवडणुकीने घातला गेला आहे. थोडक्यात यंदाच्या निवडणूक निकालांनी काँग्रेस नावाच्या सत्तर वर्षे जुन्या दुष्ट विकृत प्रवृत्तीला शेवटची घरघर लागलेली आहे.
 
 

यावेळी लोकसभा प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काँग्रेसमुक्त भारत’ असा शब्दही उच्चारला नाही. कारण आता हळूहळू लोकांनाही काँग्रेस म्हणजे एक पक्ष नसून ती एक विकृत मानसिकता असल्याचे लक्षात आलेले आहे. म्हणून तर मतदाराने ज्या पद्धतीने मतदान केले त्यातून नुसती काँग्रेस नाही, तर तिच्या पुनरुद्धाराला पुढे सरसावणार्या विविध पक्षांनाही धूळ चारलेली आहे. मागल्या वेळी मोदींनी बहुमत संपादन केले, तेव्हा अनेकांना तो अपवाद वाटला होता आणि त्या धक्क्यातून सावरताना अनेकांनी वस्तुनिष्ठ परीक्षण करण्याचाही प्रयास केला होता. त्यामध्ये शिव विश्वनाथन नावाच्या प्राध्यापक बुद्धीमंताचा समावेश होता. ‘द हिंदू’ या दैनिकात खास लेख लिहून त्यांनी आपल्या पराभवाची कबुली दिलेली होती. वास्तविक, हे गृहस्थ कुठल्याही पक्षातर्फे निवडणुकीच्या मैदानात उतरलेले नव्हते. मग त्यांनी ‘आपला पराभव मोदींनी केला’ असे कशाला म्हणावे? तर त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा वैयक्तिक पराभव झाला नव्हता. त्यांच्यासारख्या उदारमतवादी लोकांचा मोदींनी त्या निवडणुकीत पराभव केलेला होता. त्याला मोदी जबाबदार नसून खुद्द विश्वनाथन यांच्यासारख्या उदारमतवादी मूर्खांचे वागणेच कसे जबाबदार आहे, त्याचाच पाढा त्यांनी वाचला होता. सामान्य लोक धार्मिक असले तरी धर्मांध नसतात आणि त्यांच्या जीवनशैलीची सतत टवाळी केल्याने असा मोठा समाज पुरोगाम्यांपासून दुरावत गेला. त्याचेच प्रतिबिंब निवडणूक निकालात पडले, असे त्यांनी म्हटलेले होते. पण, निदान नंतरच्या काळात त्यांच्यात सुधारणा झाली का? अजिबात नाही. आधी केलेल्या चुकांची हे गृहस्थ पुनरावृत्ती करीत राहिले आणि त्यांच्या विचारांच्या बुद्धीमंतांनी नेमके त्यांचे अनुकरण केले. त्याचे परिणाम आता २०१९ च्या निकालातून समोर आलेले आहेत. त्यांचा पराभव मोदींनी केला नाही, तर काँग्रेस नावाच्या मनोवृत्ती व प्रवृत्तीने केलेला आहे. कारण तो एक पक्ष नाही, तर ती प्रवृत्ती आहे.

 

मागील सत्तर वर्षांत नेहरूवाद किंवा काँग्रेसची विचारधारा म्हणून खूप काही लिहिले बोलले गेले आहे. पण ती विचारधारा नेमकी कोणती, त्याचा गोषवारा सापडणार नाही. नेहरू, गांधी किंवा आणखी कोणी वेळोवेळी व्यक्त केलेल्या मतांची गोळाबेरीज, म्हणजे ती विचारधारा असे मानायची पद्धत आहे. पण, व्यवहारात बघायचे तर काँग्रेस म्हणजे सत्तर वर्षांतल्या कारभाराचा जनतेला आलेला अनुभव, भोगावे लागलेले परिणाम किंवा दुष्परिणाम, म्हणजे ‘काँग्रेस’ होय. या प्रदीर्घ कालावधीत देशामध्ये जी एक भ्रष्ट, सडलेली वा निरूपयोगी व्यवस्था उभी राहिली, ती म्हणजे ‘काँग्रेस’ होय. पण, ही व्यवस्था एकट्या नेहरूंनी किंवा काँग्रेस पक्षाने उभारलेली नाही किंवा फक्त ‘काँग्रेस’ म्हणजे ती व्यवस्था नव्हे. एकूण सामाजिक आर्थिक शोषणावर पोसली जाणारी व त्यालाच न्याय ठरवणारी व्यवस्था, म्हणजे काँग्रेसप्रणाली असे स्वरूप येत गेले. ज्याने कोणी बंडाचा झेंडा उभारण्याचा प्रयत्न केला, त्याला साम-दाम-दंड-भेद अशा मार्गाने संपविण्यात आले. त्यामुळे ही व्यवस्था ‘काँग्रेस’ नावाने कार्यरत व अबाधित राहू शकली, चालू शकली. ज्यांच्यामुळे तिला खरेखुरे आव्हान उभे राहिले, त्यांना बदनाम बहिष्कृत करण्यात आले किंवा गुन्हेगार घोषित करायचेही डाव यशस्वी करण्यात आले. त्यासाठी आवश्यक असलेल्या संस्था, संघटना, विभाग यांची पक्की रचना करण्यात आली आणि त्यामध्ये प्रत्येकाची सोय लावण्यात आली. विश्वनाथन यांच्यासारख्या बुद्धिमान प्राध्यापकापासून कलावंत साहित्यिक अशा सर्व क्षेत्रांतील लोकांची तिथे सोय होती. त्यांनी शोषणाचे लाभ उठवावेत आणि बंडाची शक्यता दिसली तरी, तिच्या नरडीला नख लावून धोका संपवायचा, इतकीच अशा लोकांची जबाबदारी होती. तेही अपुरे ठरले तर त्यापैकीच कोणीतरी बंडाचे नाटक रंगवून खर्याखुर्या बंडाची उर्मी खच्ची करायची. इतकी ही परिपूर्ण व्यवस्था होती, जिला ‘काँग्रेस’ म्हणतात.

 

मोदींनी सत्ता हाती आल्यावर किंवा त्याच्याही आधीपासून त्या व्यवस्थेलाच सुरूंग लावण्याचा चंग बांधला होता. म्हणून तर भाजप किंवा संघापेक्षाही अशा नेहरूवादाला वा प्रस्थापिताला ‘मोदी’ हा कायम मोठा शत्रू वाटत आला. कारण, मोदींनी पहिल्यापासून या नेहरूवादी काँग्रेसी व्यवस्थेच्या मुळाला हात घातला होता. मागल्या खेपेस त्यांनी ‘काँग्रेस’ नावाच्या पक्षाचा राजकीय पराभव केला होता आणि तेवढ्यावर हा विषय संपणार नाही, याचेही भान त्यांना होते. कारण, सत्तर वर्षे काँग्रेसने देशावर राज्य केले, ती लोकमताच्या बळावर वा लोकांचा विश्वास संपादन करून मिळवलेली सत्ता नव्हती. जनमत आपल्या मुठीत राखणार्या विविध क्षेत्रांतील मठाधीशांचा आशीर्वाद ही काँग्रेसची खरी ताकद होती आणि बदल्यात काँग्रेसच्या नेतृत्वाने अशा मठाधीशांना अनुदाने द्यावी, त्यांचे पोषण करावे, अशी एकूण तडजोड होती. साहजिकच त्या व्यवस्थेच्या मुळाला हात घातला गेल्यावर त्यावर पोसलेल्या बांडगुळांना बिळातून बाहेर पडणे अपरिहार्य होते. मागल्या पाच वर्षांत म्हणूनच अशा सर्वांनाच आपल्या सुरक्षित बिळातून मुखवट्यातून बाहेर यावे लागले, कलाकारांपासून विविध क्षेत्रांतून मोदीविरोधात उमटलेला आवाज, त्यांचे प्रतिनिधीत्व करणारा होता. तिथे काँग्रेसने स्थापन केलेला तो गुळाचा गणपती होता, त्याचा आवाज होता. अशा हजारो लहानमोठ्या गणपतींच्या विसर्जनाचा चंग बांधलेला माणूस फक्त काँग्रेसला हरवून थांबणार नाही, याची प्रत्येकाला शंका होती. पाच वर्षे कारभार चालवताना मोदींनी ती शंका खरी ठरवली. कारण, हळूहळू मोदींनी आपल्या कामातून भ्रष्ट काँग्रेस व्यवस्थेला नेस्तनाबूत करण्याची पावले उचलली होती. देशातला भ्रष्टाचार फक्त कायदे करून वा नुसते सरकार बदलून नष्ट होऊ शकत नाही. ज्या व्यवस्थेने त्याला सुरक्षा बहाल केलेली आहे, ती व्यवस्थाही उद्ध्वस्त करणे भाग होते. ती व्यवस्था म्हणजे खरी ‘काँग्रेस’ आहे. तो पक्ष नाही, ती भ्रष्ट सडलेली व्यवस्था आहे.

 

पहिल्या पाच वर्षांच्या कारभारातून सामान्य जनतेला मोदींनी खूप दिलासा दिला. म्हणून तर त्यांना यावेळी भरघोस मते मिळू शकली. पण, मोदींनी कोणता दिलासा गांजलेल्या जनतेला दिला, कुठे जनतेचे जीवन सुसह्य सुखकर झाले, त्याचा थांगपत्ता बुद्धीमंत, कलावंतांना अजून लागलेला नाही. कारण, सत्तर वर्षे फक्त शोषणावर पोसल्या गेलेल्या या लोकांनी शोषण वा अन्याय म्हणजेच न्याय, अशा प्रचाराचा घोषा लावलेला होता. त्याच नशेत चूर असलेल्या जनतेला प्रथमच सुसह्य जीवन आणि न्यायाची चव चाखता आल्यावर समाजातले भोंदू विचारवंत, कलावंत किंवा भाष्यकार यांचा खोटेपणा लक्षात आला. तिथून मग अशा बदमाशांची खरी घुसमट सुरू झाली. त्यांनी अधिक आक्रमकपणे न्यायालाच अन्याय व ‘शोषणा’लाच ‘पोषण’ ठरविण्यासाठी मागल्या दोन वर्षांत नको इतका धिंगाणा घातला होता. कारण, त्यांनी उभारलेली ‘काँग्रेस’ नावाची भ्रष्ट शोषणव्यवस्था हळूहळू जमीनदोस्त होऊ लागलेली होती. मोदींना आणखी पाच वर्षे मिळाली तर श्वास घ्यायलाही आपल्यात त्राण शिल्लक उरणार नसल्याच्या खात्रीने त्यांना भयभीत करून टाकलेले होते. त्यातून मग आविष्कार स्वातंत्र्य किंवा नानाविध तमाशे सुरू झाले. ते प्रत्यक्षात काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी होते, तितकेच ‘काँग्रेस’ नावाच्या शोषणव्यवस्थेला टिकवून ठेवण्यासाठीची केविलवाणी धडपड होती. आता आपली खरी लढाई काँग्रेस पक्षाशी उरलेली नसून, ‘काँग्रेस’ नावाच्या शोषणव्यवस्थेशी अटीतटीची असल्याचे ओळखूनच मोदी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उतरलेले होते. त्यांना नुसते बहुमत मिळवायचे नव्हते, तर राज्यसभेतील अडवणूकही संपवायची होती आणि त्याचाही पाया याच निवडणुकीने घातला गेला आहे. थोडक्यात यंदाच्या निवडणूक निकालांनी ‘काँग्रेस’ नावाच्या सत्तर वर्षे जुन्या दुष्ट विकृत प्रवृत्तीला शेवटची घरघर लागलेली आहे. २०२० सालात राज्यसभा पादाक्रांत झाल्यावर काँग्रेस प्रवृत्ती मरून पडलेली असेल. पक्ष असेल, पण प्रवृत्ती निपचित पडलेला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 

भाऊ तोरसेकर

लेखक सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121