॥श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र॥

    15-Jan-2025
Total Views | 41

श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र
 
असुरांच्या निर्दलनासाठी रौद्र रुप धारण करणारी जगदंबा, प्रत्यक्षात मात्र विश्वमोहिनी आहे. तिचे स्वरुप जितके दिव्य आहे, तितकेच तिचे रुपही मोहक असेच आहे. तिच्या अनुपमेय सौंदर्यापुढे विश्वातील अवघे विश्वाचे सौदंर्यच फिके आहे. जगदंबेच्या या सौंदर्य आणि अंगीभूत गुणांचे यथोचित वर्णन आद्य शंकराचार्य यांनी महिषासुरमर्दिनी स्तोत्रामध्ये केले आहे. देवीच्या मनमोहक रुपाचे वर्णन करणार्‍या श्लोकांचा हा भावनुवाद..!!
 
श्लोक क्रमांक 14
 
कमलदलामलकोमलकान्तिकलाकलितामलभाललते
सकलविलासकलानिलयक्रमकेलिचलत्कलहंसकुले ।
अलिकुलसंकुलकुन्तलमण्डलमौलिमिलद्बकुलालिकुले
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥14॥
 
पदच्छेद :
 
कमलदल = कमळाची पाकळी, अमल = विशुद्ध, कोमल = नाजूक, कान्ति = तेज, प्रभा, कलाकलित = चंद्राच्या कला धारण केलेली, अमल = पवित्र, भाललते = ललाट पटल, कपाळ, सकल = संपूर्ण, विलासकला = मनोविनोद, ललितकला, निलय = निवास, क्रम = चाल, केलि = क क्रीडा, चलत = गतीशील, कलहंस = राजहंस, कुले = कुलं अर्थात समुदाय. अलि = भुंगा, भ्रमर, कुल = समुदाय, संकुल = सघन, कुन्तलमण्डल = केशसंभार, मौलि = शिरोभाग, मिलद = सघन, बकुल = पुष्प, अलिकुले = भुंग्यांच्या झुंडी जिच्या सभोवताली आहेत, जय जय हे = तुझा विजय असो, महिषासुरमर्दिनी = महिषासुर नामक दैत्याचा संहार करणारी, रम्य = सुंदर, कपर्दिनी = जटाधारी, शैलसुते = हिमालयाची कन्या.
 
शब्दार्थ :
 
कमळाच्या पाकळीप्रमाणे सुंदर आणि अमल त्वचा असलेली, चंद्राच्या कलेप्रमाणे प्रकाशमान, सर्व ललित कलांना धारण करणारी, हंसगामिनी चाल असणारी, जिच्या सभोवती हंस कारंडव करत आहेत अशी, बकुळ पुष्प माळलेला सुगंधी केशसंभार असणारी, ज्याच्यामुळे लब्ध होऊन भुंगे, जिच्या सभोवती गुंजारव करत आहेत आणि रम्य केशसंभार असणारी हे देवी, तुझा सतत विजय असो.
 
भावार्थ :
 
कमल पुष्पाची पाकळी ही अत्यंत नाजूक, सुंदर, मृदू आणि स्निग्ध असते. तिच्या स्निग्धतेमुळे ती मलीन होत नाही. देवीची त्वचा तशीच सुंदर आणि अमल आहे. देवीने मस्तकावर अष्टमीचा चंद्र धारण केला आहे. चंद्राच्या या कलेची आभा कपाळावर पडल्याने, तिचे मुखमंडल अत्यंत तेजस्वी दिसते आहे. चंद्राच्या सर्व कला हे देवीचेच रूप आहे.
 
सर्व ललित कलांची स्वामिनी देवी भगवती आहे. तिच्या निवासस्थानी परमहंस अर्थात संत, विभूती, ज्यांना देवीच्या सायुज्य मुक्तीचा लाभ झाला आहे, ते राजहंसाच्या रूपात निवास करतात. ते ललितादेवीच्या पदविभ्रमाचे अनुसरण करत, डौलदार चालतात. अर्थात ते देवी भगवतीच्या चालीची नक्कल करत असतात. संपूर्ण विश्वात, हंसाची चाल सर्वाधिक मोहक आणि डौलदार मानली जाते. परंतु, ती त्यांची नसून ते देवी भगवतीच्या चालीची नक्कल करत असतात.
 
देवीचा केशसंभार काळाभोर, घनदाट आणि अत्यंत आकर्षक आहे. तिने आपल्या मस्तकी बकुळीची फुले माळली आहेत. तिच्या केसांचा आणि तिच्या केशापाशातील बकुळीच्या गजर्‍याच्या सुगंधाने मोहित होऊन, भ्रमर अर्थात भुंगे तिच्याभोवती फिरत आहेत.
उन्मत्त अशा महिषासुराचे जिने अवतार घेऊन निर्दालन केले आणि आपल्या या सर्व विशेषणांना सार्थ केले, अशा जगदंबे तुझा सतत जय असो.
 
श्लोक क्रमांक 15
 
करमुरलीरववर्जितकूजितलज्जितकोकिलमंजुमते
मिलितमिलिन्दमनोहरगुंजितरंजितशैलनिकुंजगते ।
निजगणभूतमहाशबरीगणरंगणसम्भृतकेलिरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥15॥
 
पदच्छेद :
 
कर = हात, मुरली = बासरी, रव = ध्वनी, वर्जित = परित्याग केलेला, कूजित = कु कु असा ध्वनी ऐकू येतो आहे, लज्जित = लज्जेने ग्रस्त, कोकिल = कोकीळ, मंजुमते = प्रीतिकर भाव ठेवणारी, मिलित = एका ठिकाणी एकत्र, मिलिन्द = भुंगे, मनोहर = मनमोहित करणारे, गुंजित = गुंजायमान, रंजित = रंगलेले, शैलनिकुंजगते = पर्वतावरील पुष्करणीमध्ये विचरण करणारी, निजगण = स्व गण, भूत = भूत, पिशाच्च, महाशबरीगण = शबरी नावाचा भिल्ल समुदाय, रंगण = नृत्य, गायन आदी कला, सम्भृत = युक्त, केलिरते = आमोद क्रीडांच्यामध्ये निमग्न देवी, जय जय हे = तुझा विजय असो, महिषासुरमर्दिनी = महिषासुर नामक दैत्याचा संहार करणारी, रम्य = सुंदर, कपर्दिनी = जटाधारी, शैलसुते = हिमालयाची कन्या.
 
शब्दार्थ :
 
जिच्या हातातील मुरलीच्या सुमधुर ध्वनीने लज्जित होऊन, कोकीळ पक्ष्यांनी आपले गान थांबवून ते मौन झाले आहेत, या मौन कोकिळांच्या प्रतीसुद्धा जिचा वात्सल्यभाव आहे, जिचे विचरण अशा पर्वतावर आहे, जिथे अत्यंत सुंदर अशा पुष्पलता आहेत आणि ज्यांच्या सभोवती भुंगे गुंजारव करत आहेत, आपल्या अनुयायी भूतगण व शबरीसारखे अन्य आदिवासी जनजातींसह जी क्रीडा करते आहे आणि आनंदाने विचरण करते आहे आणि रम्य केशसंभार असणारी हे देवी तुझा सतत विजय असो.
 
भावार्थ :
 
या श्लोकात देवीच्या पर्वतविनोदिनी स्वरूपाचे वर्णन आहे, अर्थात जी पर्वतावर निवास करते. वनातील समस्त पशुपक्षी यांच्या सान्निध्यात विचरण करणारी, विभिन्न आदिवासी जनजातींच्या सह नृत्य गायन यांचा आनंद घेणारी, त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवणारी देवी या स्वरूपात हे वर्णन केले गेले आहे.
 
देवी आपल्या बोटांनी मुरलीचे अत्यंत सुमधुर स्वर निर्माण करते आहे. या मधुर सुरांच्या तरंगांनी संपूर्ण आसमंत मंत्रमुग्ध होतो आहे. वनातील कोकिळांना या सुमधुर स्वरांना ऐकून, आपले गायन अत्यंत रुक्ष वाटते आणि ते मौन होतात. देवीला मात्र या लज्जित होऊन मौन झालेल्या कोकिळांबद्दल सुद्धा प्रेम वाटते आहे. कोकिळांचे गायन हे क्षणिक आनंद निर्माण करणारे असून, देवीच्या मुरलीचा स्वर मात्र दीर्घकाळ आसमंतात गुंजत राहतो आणि सर्वांना आनंद प्रदान करतो.
 
देवी कुमारिका अवस्थेत असताना, हिमपर्वत हे तिचे क्रीडास्थळ होते. या पर्वतावर विभिन्न पुष्पलता, वेली या उमललेल्या असतात. अत्यंत सुंदर पुष्प्करणींनी व्यापलेल्या या भूमीवर, वातावरणात फुलांचा सुगंध दरवळत असतो. या सुगंधाने लुब्ध होऊन भुंगे सर्वत्र गुंजारव करत वावरत आहेत. या भूमीवर देवी अत्यंत आनंदाने बागडते आहे.
 
पर्वतावर राहणार्‍या शबरीप्रमाणे विभिन्न जनजातीतील आदिवासी युवक युवती,देवीचे अनुयायी आणि साहाय्यक असणारे भूत गण, हे तिच्या सभोवताली नृत्य गायन आदी मनोरंजन करत आहेत. त्यांच्या या कलेचा देवी अत्यंत आनंदाने आस्वाद घेते आहे. उन्मत्त अशा महिषासुराचे जिने अवतार घेऊन निर्दालन केले आणि आपल्या या सर्व विशेषणांना सार्थ केले, अशा जगदंबे तुझा सतत जय असो.
 
श्लोक क्रमांक 16
कटितटपीतदुकूलविचित्रमयूखतिरस्कृतचण्डरुचे
जितकनकाचलमौलिमदोर्जितगर्जितकुंजरकुम्भकुचे
प्रणतसुर ऽसुरमौलिमणिस्फुरदंशुलसन्नखचन्द्ररुचे
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥16॥
 
पदच्छेद :
 
कटितट = कंबर, पीतदुकूल = पितांबर, विचित्र = विविध रंगी, मयूख = किरण, तिरस्कृत = लपवणारी, चण्डरुचे = सूर्याच्या तेजाला निष्प्रभ करणारी. जित = ज्याने विजयप्राप्त केला आहे तो, कनक = सुवर्ण, अचल: = पर्वत, मौलि: = शिखर, मदोर्जित = मदमस्त, गर्जित = चित्कार, कुंजर: = हत्ती, कुम्भ = गंडस्थळ, कुचे = उन्नत स्तन असणारी देवी. प्रणत = प्रणाम करण्यासाठी झुकलेले, सुर = देवगण, असुर = राक्षसगण, मौलि = मस्तक, मणि = रत्न, स्फुरद = दाही दिशा फाकणारी, अंशुल = प्रकाश किरणे, सद = सुंदर, नख = नख, चन्द्ररुचे = चंद्राप्रमाणे रेखीव आणि तेजस्वी. जय जय हे = तुझा विजय असो, महिषासुरमर्दिनी = महिषासुर नामक दैत्याचा संहार करणारी, रम्य = सुंदर, कपर्दिनी = जटाधारी, शैलसुते = हिमालयाची कन्या.
 
शब्दार्थ :
 
जिने आपल्या कमरेवर धारण केलेल्या सोनसळी विविधरंगी वस्त्रांमधून निघणार्‍या तेजस्वी किरणांच्यापुढे, सूर्याची किरणेही फिकी पडत आहेत, मेरू पर्वतावरील मदोन्मत्त हत्तीच्या गंडस्थळापेक्षाही जिची स्तनयुग्मे पुष्ट आणि उन्नत आहेत, जिच्या नखांच्या तेजापुढे, तिच्या चरणी लीन होणार्‍या देवांच्या मौल्यवान रत्नजडित मुकुटांचे तेजसुद्धा फिके पडते आहे आणि रम्य केशसंभार असणारी हे देवी तुझा सतत विजय असो.
 
भावार्थ :
 
या श्लोकामध्ये देवीच्या सौंदर्याचे आणि सामर्थ्याचे वर्णन केले आहे. देवीने कमरेवर धारण केलेले सोनसळी वस्त्र रंगीबेरंगी आहे. या वस्त्रावर पडणारा सूर्याचा प्रकाश, या वस्त्रांना एक वेगळीच झळाळी प्रदान करतो आहे. या वस्त्रांचे तेजस्वी रूप जणू सूर्यकिरणांना लाजवते आहे.
 
देवीची स्तनयुग्मे अत्यंत पुष्ट आणि उन्नत आहेत. कवी देवीच्या सौंदर्याचे वर्णन करताना, मेरूपर्वतावरील मदोन्मत्त हत्तीच्या उन्नत अशा गंडस्थळांची त्यांची तुलना करतो आहे. उन्नत आणि पुष्ट असे पयोधर स्तनयुग्म, देवीच्या जगन्माता या रुपाला सार्थक करतात.
 
श्री ललितादेवी ही शुद्ध चेतना असून, ती सर्व देवांनादेखील उपास्य आणि पूज्य आहे. त्यामुळे देव तिच्या चरणी नतमस्तक असतात. इंद्रादी देव ज्यावेळी देवीच्या दर्शनार्थ जातात, त्यावेळी देवीच्या पायाच्या नखांच्या पुढे त्यांच्या मुकुटातील रत्नमाणकांचे तेजदेखील फिके जाणवते. देवी आपल्या नखांच्या तेजाद्वारे आपल्या सर्व सूर आणि मानवी उपासकांच्या सर्व कामनांची पूर्तता करते आहे, इतके तिच्या नखांचे तेज प्रभावी आहे.
 
उन्मत्त अशा महिषासुराचे जिने अवतार घेऊन निर्दालन केले आणि आपल्या या सर्व विशेषणांना सार्थ केले, अशा जगदंबे तुझा सतत जय असो.
 
सुजीत भोगले 
अग्रलेख
जरुर वाचा
कोकणचा आर्थिक विकास, शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी सरकारने ‘वॉटर ग्रीड’ तयार करावे : आ. प्रविण दरेकर यांची मागणी

कोकणचा आर्थिक विकास, शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी सरकारने ‘वॉटर ग्रीड’ तयार करावे : आ. प्रविण दरेकर यांची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यासाठी “मराठवाडा वॉटर ग्रीड” संकल्पना मांडली, त्यावर कामही सुरू आहे. वीज निर्मितीसाठी वापरले जाणारे ६७ टीएमसी पाणी वीज निर्मितीनंतर बोगद्यातून वशिष्ठ नदीला सोडले जाते आणि हे पाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते. हे ६७ टीएमसी पाणी जर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला मिळाले, पाईपलाईनद्वारे हे पाणी तिन्ही जिल्ह्यात फिरवले तर कोकणातील पाणीटंचाई कायमची दूर होईल. त्यामुळे मराठवाड्याप्रमाणे कोकणच्या समृद्धीसाठी कोकण वॉटर ग्रीड होणे अत्यंत गरजेचे आहे. कोकणाच्या आर्थिक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121